Wednesday, May 22, 2019

विद्यापीठाच्‍या ब्‍लॉगला उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार

ब्‍लॉगचे चार लाख वेळेस वाचन केवळ ऐंशी (80महिण्‍यात
वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने सप्‍टेबर 2012 मध्‍ये promkvparbhani.blogspot.com हा ब्‍लॉग सुरू करून ऐंशी (80) महिने पुर्ण झाले असुन हा ब्‍लॉग चार लाख वेळेस पाहीला व वाचला गेला, ही एक मोठी उपलब्‍धी आहे, या वाचकात इतर देशातील वाचकांचाही समावेश आहे. पहिल्‍या चाळीस (40) महिण्‍यात एक लाख वेळेस वाचन झाले, पुढील केवळ चाळीस महिण्‍यात तीन लाख वेळेस वाचन झाले, म्‍हणजेचे दर महिण्‍यास साधारणत : सात ते आठ हजार वेळेस वाचन होते.

या ऐंशी महिन्‍यात विद्यापीठाच्‍या साधारणत: बाराशे बातम्‍या, पोस्‍ट, घडामोडींची माहिती छायाचित्रासह ब्‍लॉगवर प्रसिध्‍द करण्‍यात आल्‍या, यास वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेषत: या विविध बातम्‍यास प्रसारमाध्‍यमाच्‍या प्रतिनिधींनी आपआपल्‍या दैनिकात, साप्‍ताहिक, मासिक तसेच इलेक्‍ट्रानिक माध्‍यमात मोठी प्रसिध्‍दी दिली. सदरिल प्रसिध्‍द केलेल्‍या पोस्‍ट या विद्यापीठातील विविध घडामोडी, कृषि तंत्रज्ञान, कृषि सल्‍ला, कृषि हवामान अंदाज, कृषि संशोधन, विद्यापीठ उपलब्‍धी आदींशी संबंधीत आहेत. सदरिल ब्‍लॉगचा शेतकरी, विद्यार्थी, सामान्‍य नागरीक ही ब्‍लॉगचा वाचक असुन विद्यापीठ तंत्रज्ञान त्‍वरित शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यास मदत होत आहे.

ब्‍लॉग अविरत कार्यरत राहण्‍यास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, विस्‍तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक, संशोधन संचालक व कुलसचिव यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्‍साहन लाभले. तसेच विद्यापीठांतर्गत असलेले विविध महाविद्यालये, संशोधन केंद्रे व विविध कार्यालये येथील अधिकारी, कर्मचारी, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांचेही मोठे योगदान आहेच.

गेल्‍या ऐंशी महिन्‍यातील विद्यापीठाच्‍या विविध घडामोडीचा ब्‍लॉग हे साक्ष असुन आजही कोणतीही मागील घडामोडी व बातम्‍या छायाचित्रासह आपण पाहु शकतो, हे सर्वांच्‍या सहकार्यामुळेच शक्‍य होऊ शकले. विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने सर्वांचे शतश: आभार, या पुढेही आपला असाच प्रतिसाद व सहकार्य लाभो, हीच अपेक्षा

धन्‍यवाद

आपला स्‍नेहांकित

जनसंपर्क अधिकारी,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

Saturday, May 18, 2019

शेतक-यांना गटशेतीशिवाय पर्याय नाही....राज्‍याचे कृषी सचिव मा श्री एकनाथराव डवले

वनामकृवित आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन


मार्गदर्शन करतांना राज्‍याचे कृषी सचिव मा श्री एकनाथराव डवले

शेती व शेतक-यांपुढे अनेक समस्‍या आहेत, या समस्‍या सोडविण्‍याकरिता शेतक-यांना संघटीत होणे गरजेचे असुन गटशेती शिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे बाजारातील शेतक-यांची सौदाशक्‍ती वाढीस लागेल, असे प्रतिपादन राज्‍याचे कृषी सचिव मा श्री एकनाथराव डवले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४७ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे शनिवार रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर विशेष अतिथी म्‍हणुन माजी कृषि आयुक्‍त तथा महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक मा श्री उमाकांत दांगट हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक महेश कुलकर्णी, लातुर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री एस बी आळसे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री सागर खटकाळे आदींची प्रमु़ख उपस्थिती होती.
कृषी सचिव मा श्री एकनाथराव डवले पुढे म्‍हणाले की, आज पारंपारिक शेती किफायतशीर राहीली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच शेती करावी लागेल, अनेक तरूण आधुनिक शेतीकडे वळत आहेत, आजच्‍या शेतक-यांचा तंत्रज्ञानकडे ओढा वाढत आहे, ही चांगली बाब आहे. परभणी कृषि विद्यापीठातील तुर, ज्‍वार, सोयाबीन आदी पिकांची वाण शेतक-यांपर्यंत पोहचली आहेत. येणा-यां वर्षात हवामान अंदाजाकरिता महावेध योजना राज्‍यात कार्यान्‍वीत करण्‍यात येणार असुन त्‍यामुळे शेतक-यांना अचुक हवामान अंदाज व कृषि सल्‍ला मिळणार आहे. कीड व रोग प्रादुभार्वाचा अचुक अंदाजाने पिक संरक्षण करण्‍यास शेतक-यांना मदत होणार आहे. येणा-या खरिप हंगामात मक्यावरील लष्‍करी अळी, कापसावरील गुलाबी बोंडअळीहुमणी आदी कीडीच्‍या व्‍यवस्‍थापनावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.
मा श्री उमाकांत दांगट आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, देशाची अर्थव्‍यवस्‍था पुर्णपणे शेती अर्थव्‍यवस्थेवरच अवलंबुन आहे. जागतिकरणाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनात शेतीक्षेत्राचा वाटा कमी झाला आहे, परंतु आजही रोजगारासाठी 60 टक्के लोकसंख्‍या आजही शेतीवरच अवलंबुन आहे. बदलत्‍या हवामानात ज्ञान व तंत्रज्ञानाच्‍या आधारेच शेती करावी लागेल.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील शेतीपुढे अनेक प्रश्‍न आहेत, येणा-या हंगामात विविध पिकांवरील कीडींच्‍या प्रादुभार्वाचे आव्‍हान शेतक-यांपुढे राहणार आहे, परंतु या किडींच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग शेतक-यांना तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ देईल. दुष्‍काळ परिस्थितीत शेतक-यांच्‍या फळबागा अडचणीत आल्‍या, विशेषत: हलक्‍या जमीनीवरील मोसंबी बागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे हलक्‍या ते मध्‍यम जमीनीत डाळिंब, सिताफळ, अॅपल बोर आदी फळपिक शेतक-यांनी घ्‍यावीत. शेतक-यांमध्‍ये मोठी मागणी असलेला कापसाचा विद्यापीठ विकसित नांदेड-44 हा वाण बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन येणा-या खरिप हंगामात या वाणाचे बियाणे मर्यादित प्रमाणात महाबिज उपलब्‍ध करणार आहे. या वाणाचे बियाणे पुढील वर्षी मोठया प्रमाणात उपलब्‍ध होईल, असे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व डॉ अरूण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्‍यात शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतक-यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तसेच विद्यापीठ मासिक शेतीभाती, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका, घडीपत्रिका आदींचे विमोचन करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारीत दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 
तांत्रिक सत्रात हुमणी कीड, गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनावर डॉ पी आर झंवर यांनी मार्गदर्शन केले तर लष्‍करी अळी व्‍यवस्‍थापनावर डॉ बी व्‍ही भेदे, मोसंबी बागाचे कमी पाण्‍यात संरक्षण यावर डॉ एम बी पाटील, कापुस लागवडीवर डॉ अे जी पंडागळे, सोयाबीन लागवडीवर डॉ यु एन आळसे, तुर लागवडीवर डॉ एस बी पवार, हवामान अनुकूल शेतीवर डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ एम एस पेंडके, ज्‍वार लागवडीवर डॉ प्रितम भुतडा, रेशीम उद्योगावर डॉ सी बी लटपटे, फळबाग लागवडीवर डॉ शिवाजी शिंदे, कडधान्य पिक लागवडीवर डॉ पी ए पगार आदींनी मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या कृषि विषयक प्रश्‍न व शंकाचे शास्‍त्रज्ञानी निरासरन केले. विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही करण्‍यात आले. मेळाव्‍यास व कृषि प्रदर्शनीस शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला.

मेळाव्‍यात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आलेले शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकरी
जालना जिल्‍हयातील उध्‍दवराव खेडेकर (मु शिवनी पो नेर), जयकिशन शिंदे (मु वरूडी पो गेवराई बाजार ता बदनापुर), पुंजाराम भुतेकर (मु हिवरडी, पो पिंपळगाव), औरंगाबाद जिल्‍हयातील भरत आहेर (मु टोणगांव पो कुंभेफळ), विजय चौधरी (खुल्‍ताबाद), संतोष देशमुख (औरंगाबाद), उस्‍मानाबाद जिल्‍हयातील त्र्यंबक फंड (मु जळकोटवाडी पो वडगांव काटी, ता तुळजापुर), विकास थिटे (मु बावची ता परांडा), बीड जिल्‍हयातील बालाजी तट (मु पो आपेगांव ता अंबेजोगाई), रमेश सिरसाट (मु पो आरणगांव ता केज), संतोष राठोड (मु वसंतनगर तांडा, ता परळी), लातुर जिल्‍हयातील बाबासाहेब पाटील (मु पो हेर ता उदगीर), अनिल चेळकर (मु पो किल्‍लारी ता औसा), परभणी जिल्‍हयातील सदाशिव थोरात (मु सारोळा खुर्द ता पाथरी) आदी शेतक-यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
मार्गदर्शन करतांना मा श्री उमाकांतजी दांगट
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटन करतांना

मेळाव्‍या निमित्‍त आयोजित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना


कापुस संशोधन केंद्राच्‍या प्रदर्शनी दालनास मान्‍यवरांची भेट 
उस्‍मानाबाद जिल्‍हयातील मौजे बावची येथील उद्यान पंडित पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकरी विकास थिटे यांचा सत्‍कार करतांना 

Saturday, May 11, 2019

वनामकृवित खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४७ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १८ मे शनिवार रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उदघाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि सचिव मा श्री एकनाथराव डवले यांच्‍या हस्‍ते होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण हे राहणार आहेत. कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन माजी कृषि आयुक्‍त तथा  महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक मा श्री उमाकांत दांगट हे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ खरीप पिक लागवड व व्‍यवस्‍थापन तसेच शेती पुरक जोडधंदे याविषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतक-यांच्‍या कृषि विषयक प्रश्‍न व शंकाचे शास्‍त्रज्ञ निरासरनही करणार आहेत. याप्रसंगी कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारी दालनाचा समावेश राहणार आहे. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही होणार आहे. सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजयकुमार पाटील यांनी केले आहे.

Monday, May 6, 2019

वनामकृवित हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा प्रशिक्षण संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि परभणी आत्मा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा प्रशिक्षकांचे पाच दिवसीय प्रशिक्षणाचे दिनांक 29 एप्रिल ते 4 मे दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले होते. प्रशिक्षणाचे उदघाटन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांच्या हस्‍ते करण्‍यात आले होते, तर प्रशिक्षणाची सांगता दिनांक 4 मे रोजी झाली. सांगता कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख हे होते, तर परभणी आत्माचे उप-प्रकल्प संचालक श्री के आर सराफ, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करतांना श्री के आर सराफ यांनी कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग आणि आत्मा यांच्याकडून मिळालेले तांत्रिक माहितीचा उपयोग शेतक-यांच्‍या समस्‍या सोडवितांना करण्‍याचा सल्‍ला दिला. अध्‍यक्षीय भाषणात डॉ. प्रशांत देशमुख म्‍हणाले की, प्रक्षेत्रावर कार्य करतांना येणा-या अडचणी समर्थपणे पेलण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा व आपले कौशल्य वृध्दींगत करावे तर डॉ यु एन आळसे यांनी शेतीशाळा प्रशिक्षकांनी प्रक्षेत्रावर काम करतांना गरजेवर आधारीत ज्ञानाचा प्रसार करण्‍याचा सल्‍ला दिला. यावेळी प्रशिक्षणार्थीनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले तर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ एस जी पुरी यांनी केले. सदरिल प्रशिक्षणात विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतीमध्ये यांत्रीकीकरण, मुख्य पिकांवरील किडी व रोग ओळखणे, त्यावरील उपाय, हवामान बदलानुसार होणारे रोगांचे व किडी प्रमाण हवामान बदलाशी निगडीत विविध शेती तंत्रज्ञान, तसेच लोकव्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सुविधा संभाषण कौशल्य, मौखीक सादरीकरण कौशल्य आदीबाबत सखोल मार्गदर्शन केले.

Friday, May 3, 2019

वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांची मौजे मांडाखळी येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्राला भेट व मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी इंगोले, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी आर देशमुख, श्री पी एस चव्हाण आदींनी दिनांक 01 मे रोजी मौजे मांडाखळी (ता जि परभणी) येथे शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतीनिष्ठ शेतकरी श्री. रमेश राऊत, शेख मोबीन, श्री. शिळवणे, अ. नय्युम व श्री. पंडीत थोरात (खानापुर) आदींची उपस्थिती होती.
दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यात मौजे मांडाखळी येथील शेतकरी शेख मोबीन यांनी टरबुजाचे व श्री मुंजाजी शिळवणे यांनी ऊसामध्ये खरबुजाचे आंतरपीक घेवून विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल डॉ. इंगोले साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजीपाला उत्पादक शेतकरी श्री. रमेश राऊत यांच्‍या शेततळेमुळे एक हजार संत्रा व सीताफळाची झाडे जगवत असल्याचे सांगितले. श्री. राऊत यांनी एवढ्या कमी पाण्यातही संत्रा बागेत त्याच पाण्यावर कारली, दोडके, गवार, मिरची, कोथिंबीर आदी पिकांचे आंतरपीक घेऊन निव्‍वळ नफा वाढवता येतो याचे उत्‍तर उदाहरण सादर केले.
मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले म्हणाले की, शेतक-यांनी उन्हाळी पिके व फळबागा वाचविण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा, जेणे करून जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल जमीन थंड राहील. विद्यापीठ आपल्या पाठीशी असुन तांत्रिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. आळसे मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, मांडाखळी व परिसरात संत्रा पिकाची लागवड वाढत आहे, परंतु या परिसरातील ज्‍या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, त्‍या जमिनीतील संत्रा बागा जास्त काळ टिकणार नाही, मातीपरीक्षण करून चुनखडीचे प्रमाण 12 टक्के पेक्षा कमी असेल तरच लागवड करावी, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. सेंद्रिय शेतीकडे असलेला शेतकऱ्यांचा कल पाहता सेंद्रिय निष्ठा घरच्या घरी उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे सेंद्रिय खते बाजारातून विकत घेणे परवडत नाही त्यासाठी पशुधन जोपासणे गरजेचे असल्याचे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले. श्री. चव्हाण म्हणाले की शेतीला फळबागेची जोड असणे आवश्यक असल्‍याचे सांगितले. परिसरातील विविध शेतक-यांच्‍या शेतीस मान्‍यवरांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

वनामकृविच्‍या शिक्षण संचालक पदावर डॉ प्रदीप इंगोले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांच्‍याकडे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) पदाचा पदभार देण्‍यात आला आहे. दिनांक 30 एप्रिल रोजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील सेवानिवृत्‍त झाले, त्‍यामुळे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी डॉ इंगोले यांच्‍याकडे शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्‍त पदभार दिला.

वनामकृवितील निकरा उपक्रमास हैद्राबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. पी. विजयाकुमार यांची भेट

हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्‍था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍प अंतर्गत राष्‍ट्रीय नानिव्‍यपूर्ण हवामानावर संवेदनक्षम शेती (निकरा) परभणी तालुक्‍यातील मौजे उजळांबा येथील शेतक-यांच्‍या शेतावर राबविण्‍यात येत असलेल्‍या प्रात्‍यक्षिकास हैद्राबाद येथील  केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्‍थाचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. पी. विजयाकुमार यांनी नुकतीच भेट दिली. बदलत्‍या हवामानास अनुकूल कोरडवाहू शेतीच्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्‍यक्षिके शेतक-यांच्‍या शेतावर प्रायोगिक स्‍वरूपात घेण्‍यात येत आहेत. यामध्‍ये शेतक-यांना हवामान बदलास अनुकूल पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज, आपत्‍कालीन परिस्थिती, पिकांचे नियोजनासाठी कृषि हवामान सल्‍ला पत्रिका देण्‍यात येते. संशोधनात्‍मक बाबींवर प्रात्‍यक्षिके शेतक-यांच्‍या शेतावर रा‍बविण्‍यात येतात. या प्रात्‍यक्षिकास हैद्राबाद येथील क्रीडा संस्‍थेचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. पी. विजयाकुमार यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी अधिकारी डॉ. कैलास डाखोरे, कृषि सहायक शेख ए आर, संशोधन सहयोगी प्रमोद शिंदे, अशोक निर्वळ, वायपी, वरीष्‍ठ संशोधन फेलो यादव कदम, डॉ. हनुमान गरूड, प्रगतशील शेतकरी राजाभाऊ रगड, सरपंच भिमराव मोगले, आदीसह शेतकरी उ‍पस्थित होते.