Thursday, February 28, 2019

कृषि यांत्रिकीकरणासाठी कृषि उद्योजक, शेतकरी व कृषि अभियंते यांच्‍यात समन्वयाची आवश्‍यकता...... कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृविकृषि अवजारे प्रदर्शन व मेळाव्‍यास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
वाढती शेत मजुरी व हंगामात मजुरांची कमतरता यामुळे पिक लागवडीचा एकुण खर्च वाढत असुन कृषि यांत्रिकीकरणाला पर्याय नाही. परंतु अल्‍पभुधारक, मध्‍यम व मोठे भुधारक शेतकरी यांची कृषि औजारे व यंत्राची गरज वेगवेगळी आहे. कृषि यांत्रिकीकरणामूळे पिक लागवडीचा खर्च कमी होवुन शेतक-यांच्‍या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे शक्‍य आहे. कृषि यांत्रिकीकरणाकरिता कृषि यंत्र उद्योजक, शेतकरी व कृषि अभियंते यांच्यात समन्‍वयाची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने कृषी यांत्रिकीकरण दिनानिमित्‍त दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बैल व ट्रॅक्टर चलीत सुधारीत औजारांचे प्रदर्शन व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, परभणी आत्माचे प्रकल्प संचालक श्री. के. आर. सराफ, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ यु एम खोडके, तालुका कृषि अधिकारी श्री. पी. बी. बनसावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी शेतक-यांचा व विद्यापीठ शास्त्रज्ञांंच्या समन्वयातून कृषि यांत्रिकीकरणाची चळवळ गतिमान झाली पाहीजे असे सांगितले तर शेतक-यांनी गटशेतीच्‍या माध्‍यमातुन कृषि यांत्रिकीकरण बळकट करून उन्नती साधावी असे मत आत्मा प्रकल्प संचालक श्री के. आर. सराफ यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यापीठातील उर्जा उद्यानामध्ये आयोजित सुधारीत कृषि अवजारे, अपारंपारीक उर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्याक्षिकाचे उद्घाटनही कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 
कृषि अवजारे प्रदर्शनात विविध मोठ्या प्रमाणात  कंपन्यांची
ट्रॅक्टर चलीत अवजारेसौरचलीत अवजारेसुधारीत बैल चलित अवजारांचे प्रात्याक्षिकांचे सादरीकरण केले. तांत्रिक सत्रात सेंद्रीय शेती, रेशीम उद्योग, पशुधन संगोप, अपारंपारीक उर्जा स्त्रोत आदींविषयावर डॉ सी बी लटपटे, डॉ अे. के. गोरे, डॉ डि. एस. चव्हाण, डॉ आर. टी. रामटेके आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्‍पाच्‍या संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोलंकी यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार प्रा. डी. डी. टेकाळे यांनी मानले. मेळाव्‍यास मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी मोठया संख्‍येनी सहभागी झाले होते. 

Saturday, February 23, 2019

पोषण सुरक्षेसाठी फळ उत्‍पादनावर भर द्यावा लागेल.....भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक मा डॉ. डब्‍ल्‍यु एस धिल्लन

वनामकृवित कोरडवाहू फळे संशोधन राष्‍ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन
देश अन्‍नधान्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपुर्ण झाला, अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य केले. परंतु पोषण सुरक्षा साध्‍य करण्‍यासाठी फळ व भाजीपाला उत्‍पादनावर भर द्यावा लागेल. देशातील शेतीक्षेत्राचा विकास दर दोन टक्केच्‍या आसपास आहे, तर फळे व भाजीपाला उत्‍पादन विकास दर पाच टक्के आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या मानांकानुसार भारतीय लोकांचे दरडोई आहारातील फळांचा समावेश कमी असुन देशातील 60 टक्के लोकसंख्‍या शाकाहारी आहे, त्‍यामुळे अन्‍न पोषणासाठी आपणास फळपिक लागवडीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक मा डॉ. डब्‍ल्‍यु एस धिल्लन यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि भारतीय कृषि संशोधन परिषदे अंतर्गत असलेल्‍या बिकानेर (राजस्‍थान) येथील कोरडवाहू फळे मध्यवर्ती संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरडवाहू फळे संशोधनाच्या राष्‍ट्रीय वार्षिक कार्यशाळेचे आयोजन दि. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले असुन कार्यशाळेच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. शोक ढवण हे होते तर बिकानेर येथील कोरडवाहू फळे संशोधन संस्‍थेचे प्रभारी प्रकल्प समन्वयक डॉ. बी डी शर्मा, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, डॉ. विश्‍वनाथ खंदारे, डॉ गोविंद मुंडे, प्रगतशील शेतकरी श्री कांतराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा डॉ. डब्‍ल्‍यु एस धिल्लन पुढे म्‍हणाले की, देशातील व विदेशातील बाजारपेठेत दर्जेदार फळांची मोठी मागणी आहे. फळपिकांतील विविध वाण निर्मितीसाठी दिर्घ संशोधन कालावधी लागतो, जलद संशोधनाची गरज असुन फळपिकांतील वाण चाचणीचा कालावधी कमी करावा लागेल. उच्‍च प्रतीच्‍या व दुष्‍काळी परिस्थितीत तगधारणा-या फळापिकांच्‍या खुंटाचा शोध घ्‍यावा लागेल. देशात फळाच्‍या काढणी पश्‍चात साधारणत: 30 टक्के नासाडी होते, त्‍यासाठी काढणी पश्‍चात तंत्रज्ञानावर संशोधनाची मोठी गरज आहे. जे काही तंत्रज्ञान विकसित आहे, ते फळ उत्‍पादकांपर्यंत पोहचविण्‍याचे प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयात सातत्‍याने पडणा-या दुष्‍काळामुळे मोसंबी उत्‍पादक शेतकरी कोरडवाहु फळपिके सिताफळ, डाळींब, बोर, आवळा आदी लागवडीकडे वळत आहेत. फळ लागवडीतुन मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते यात रोपवाटीका, काढणी पश्‍चात प्रक्रिया, फळ प्रक्रिया उद्योग आदीसाठी मोठया मनुष्‍यबळाची आवश्‍यकता लागते. फळ लागवडीच्‍या माध्‍यमातुन पोषण सुरक्षेसोबतच शेतकरी उपजीविका सुरक्षाही साध्‍य करता येईल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
माजी कुलगुरू मा डॉ तुकाराम मोरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, देशात व राज्‍यात शेती ही मुख्‍यत: कोरडवाहुच असुन कोरडवाहु फळपिकांच्‍या उत्‍पादन वाढीतुन देशात दुसरी हरित क्रांती साध्‍य करू शकु. तर डॉ. बी डी शर्मा आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, देशातील डाळींब लागवडी क्षेत्रापैकी 80 ते 85 टक्के क्षेत्र हे राहुरी कृषि विद्यापीठ विकसित भगवा जाती खाली आहे.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ विश्‍वनाथ खंदारे यांनी मानले. सदरिल तीन दिवसीय कार्यशाळेत देशातील कोरडवाहू फळे संशोधनाशी निगडीत मध्‍यप्रदेश, पंजाब, उत्‍तर प्रदेश, गुजरात, राजस्‍थान, तामिळनाडु, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र आदी राज्‍यातील अठरा संशोधन केंद्रातील 70 पेक्षा जास्‍त शास्त्रज्ञ सहभागी झाले असुन प्रगतीशील शेतकरीही सहभागी होऊन कोरडवाहु फळपिकांतील अनुभव मांडणार आहेत. सदर कार्यशाळेत विविध तांत्रिक चर्चासत्रात संशोधनाचे निष्कर्ष सादर करण्यात येणार असुन वर्षभरातील संशोधन कार्याचा आढावा व पुढील संशोधनाची दिशा निश्चित करण्‍यात येणार आहे.

Friday, February 22, 2019

वनामकृवित कृषि यांत्रिकीकरण प्रदर्शन व मेळावाचे आयोजन

परभणी : अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशुशक्तीचा कृषि क्षेत्रात योग्य वापर भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि यांत्रिकीकरण दिनानिमित्त दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता पशुशक्तीचा कृषि क्षेत्रात योग्य वापर संशोधन केंद्रात कृषि अवजारे प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीत विविध कृषि अवजारे तसेच अपारंपारिक उर्जा उपकरणे मशिनरी संबंधी कंपन्या विक्रेते सहभागी होणार असुन मेळाव्‍यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, तरी शेतकरी बांधवानी मेळाव्याजास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन संशोधन अभियंता प्रा. एस. एन. सोलंकी यांनी केले आहे.

Thursday, February 21, 2019

वनामकृवित कोरडवाहू फळे संशोधनावरील राष्ट्रीय वार्षिक कार्यशाळेचे आयोजन

कार्यशाळेत देशातील विविध राज्‍यातील कोरडवाहु फळपिक शास्‍त्रज्ञ होणार सहभागी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि संशोधन परिषद - कोरडवाहू फळे मध्यवर्ती संशोधन संस्था, बिकानेर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरडवाहू फळे संशोधनाच्या राष्ट्रीय वार्षिक कार्यशाळेचे आयोजन दि. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले असुन कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते दि. 23 फेब्रवारी रोजी होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदे डॉ. डब्‍ल्‍यु एस धिल्लन बिकानेर येथील कोरडवाहू फळे संशोधन संस्थेचे संचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. पी. एल. सरोज राहणार असुन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे हे विशेष अतिथी राहणार आहेत. कार्यशाळेत देशातील कोरडवाहू फळे संशोधनाशी निगडीत 70 हून जास्‍त शास्त्रज्ञ सहभागी होणार असुन प्रगतीशील शेतकरीही सहभागी होऊन कोरडवाहु फळपिकांतील आपले अनुभव मांडणार आहेत. सदर कार्यशाळेत विविध तांत्रिक चर्चासत्रात संशोधनाचे निष्कर्ष सादर करण्यात येणार असुन वर्षभरातील संशोधन कार्याचा आढावा व पुढील संशोधनाची दिशा निश्चित करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेचे आयोजन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन आयोजक सचिव फळ संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. विश्‍वनाथ खंदारे हे आहेत.

वनामकृवित दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील बीड, उस्‍मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्‍हयातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रृंखलेतील बीड व उस्मानाबाद जिल्हयासाठीचा सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन दि. 21 फेब्रुवारी रोजी झाले. कार्यक्रमास नवी मुंबई येथील टाटा जागृती फाऊंडेशनचे संचालक श्री. विद्येश जोशी, मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. एस. टी. शिराळे, श्री. हर्षल जैन आदींची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे होते. सदरिल प्रशिक्षण कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत.
मार्गदर्शनात डॉ. आनंद गोरे म्‍हणाले की, सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना असुन या कोणत्याही एक घटकावर अवलंबून न राहता विविध घटकांचा एकात्मिकपणे विचार करणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीवापरण्यात येणाऱ्या निविष्‍ठांचा वापर करतांना योग्‍य तांत्रिक माहिती घेणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेती ही एक दिर्घकालीन चालणारी प्रक्रिया असून यामध्ये यश मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी संयम व सातत्य या बरोबरच तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगीतले. श्री. हर्षल जैन यांनी सेंद्रीय शेतीप्रमाणीकरणास अतिशय महत्व असून त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्‍याचे सांगितले तर मृदाशास्त्रज्ञ डॉ. एस.टी. शिराळे यांनी जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी दिर्घकालीन कार्यक्रम राबविण्याची गरज असल्‍याचे सांगीतले.
तांत्रिक सत्राडॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, डॉ. एस. टी. शिराळे यांनी सेंद्रीय पध्दतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन, श्री. विद्येश जोशी यांनी सेंद्रीय बाजारपेठ व्यवस्थापन, श्री. हर्षल जैन यांनी सेंद्रीय प्रमाणीकरण, डॉ. सुनिल जावळे यांनी जैविक खतांची निर्मिती व उपयोग यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिल जावळे यांनी केले. सूत्रसंचालन सतिश कटारे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कदम यांनी केले. कार्यक्रमास बालाजी मोरे, श्रीनिवास देशपांडे, राजाभाऊ चाळक, संजय वाटवडे, प्रभाकांत गोडसे, दत्तात्रय पाटील आदीसह बीड व उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद गायकवाड, शितल उफाडे, बाळू धारबळे, भागवत वाघ, सचिन रणेर, नागेश सावंत, दिपक शिंदे, व्दारका काळे आदींनी परिश्रम घेतले.