Friday, December 25, 2020

वनामकृविच्‍या वतीने हॉर्टसॅप अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

राज्‍यातील विविध जिल्‍हयातील कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने फळपिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत ठाणे, जळगाव, पुणे, सातारा, अकोला व भंडारा जिल्हयातील कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, किड सर्वेक्षक,किड नियंत्रक आदीकरिता कोरोना रोगाच्‍या पार्श्वभुमीवर दिनांक २३ डिसेंबर रोजी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्‍या उद्घाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर हे होते तर दापोली कृषि ि‍वद्यापीठाचे किटकशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ. आनंद नरंगलकर तसेच ठाणे, जळगाव, पुणे, सातारा, अकोला व भंडारा चे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडल कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थ‍ित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. देवराव देवसरकर यांनी शेतक-यांना वेळेत सल्ला देणे गरजेचे असल्‍याचे सांगुन भेंडी कीड-रोगाचे सर्वेक्षण अचूक वेळेत करावे अशा सुचना कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचा-यांना दिल्या. विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड यांनी हॉर्टसॅप हा महाराष्ट्रातील अभिनव प्रकल्प असून भेंडी पिकावरील कीड-रोगाचे सुरवातीपासून व्यवस्थापन करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. तर डॉ. आनंद नरंगलकर यानी भाजीपाला पिकामधे भेंडी हे पीक महत्वाचे असून एकात्मिक किड रोग व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला

तांत्रिक सत्रात डॉ. बस्वराज भेदे यांनी भेंडी पिकावरील कीडीची ओळख व व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तर भेंडी पिकावरील रोग व्यवस्थापनावर डॉ. चंद्रशेखर अंबडकर यांनी, भेंडी लागवड तंत्रज्ञानाबाबत डॉ. राहूल बघेले यांनी तर डॉ. संजोग बोकन यांनी नमूना तक्त्यातील नोंदणी व किडींचे सर्वेक्षण व श्री. निलेश पटेल यांनी ऑनलाईन प्रपत्राच्या नोंदीची याबाबत मार्गदर्शन केले.

क्रॉपसॅप प्रकल्पाचे समन्वय अधिकारी डॉ. अनंत बडगुजर यांनी प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले तर आभार डॉ. संजोग बोकन यांनी मानले. ऑनलाईन कार्यक्रमाला ठाणे, जळगाव, पुणे, सातारा, अकोला व भंडारा जिल्हयातील कृषि विभागाचे साधारणत ९५ अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थ‍ित होते. प्रशिक्षण यशस्‍वीतेकरिता डॉ. राजरतन खंदारे, गणेशराव खरात व दिपक लाड आदींनी परिश्रम घेतले. 

Monday, December 21, 2020

वनामकृवित रक्‍तदान शिबिर संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने  राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक 21 डिसेंबर रोजी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर शासकीय रक्‍तपेढीचे प्रमुख डॉ उदय देशमुख, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जयश्री झेंडे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, डॉ जगदीश जहागिरदार, डॉ कल्‍याण आपेट आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरास कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी प्रत्‍यक्ष भेट देऊन रक्‍तदात्‍यांना प्रोत्‍साहीत केले.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, रक्‍तदान हे सर्वश्रेष्‍ठ दान असुन एक रक्‍तदाता तीन व्‍यक्‍तीचे प्राण वाचु शकतो. सद्यस्थिती राज्‍यात रक्‍ताचा तुडवटा जाणवत आहे, परिस्थितीत राज्‍यभर रक्‍तदान शिबीरांचे आयोजन करण्‍यात येत आहे, परंतु विविध संस्‍थांनी एकाच वेळी रक्‍तदान शिबिर न ठेवता, टप्‍प्‍याटप्‍पानी विद्यापीठानेही रक्‍तदान शिबिर घेतल्‍यास नियमित रक्‍त पुरवठा होईल. सामाजिक बांधिलकी म्‍हणुन ज्‍यांना शक्‍य असेल त्‍यांनी रक्‍तदान करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

डॉ उदय देशमुख म्‍हणाले की, रक्‍त देण्‍याची गरज नियमितपणे थॅलेसेमिया, गरोदर महिला, अनेमिया, अपघातात जखमी आदी रग्‍नांना जास्‍त असते. त्‍यामुळे वर्षभर नियमित रक्‍ताची गरज पाहता, वारंवार व नियोजनबध्‍दपणे रक्‍तदान शिबिर आयोजित करणे आवश्‍यक आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा संजय पवार यांनी केले तर आभार डॉ महेश देशमुख यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील 75 पेक्षा जास्‍त अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी रक्‍तदान केले.

अंबाजोगाई कृषि महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

अंबाजोगाई वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात दि.21 डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष डॉ.अरूण कदम, डॉ.प्रताप नाळवंडीकर, रक्त संकलन अधिकारी डॉ.सुजित तुमोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्‍हणाले की, रक्तदानातून राष्ट्रसेवा आणि समाजसेवेबरोबरच निःस्वार्थ आणि निरपेक्ष अशी रक्तांची नाती तयार होवू शकतात. तसेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून खरे जीवनदान आहे. सामाजिक जाणिवेतून समाजसेवा आणि राष्ट्रसेवा या भूमिकेत कृषिचे विद्यार्थी नेहमीच अग्रेसर असतात. सद्यस्थितीत कोव्हिड-19 सारख्या जागतिक महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणेत रक्ताचा तुटवडा वेळीच भरून काढण्यासाठी अशी रक्तदान शिबीरे महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात असे मत त्यांनी व्यक्त केले. 

डॉ. ठोंबरे यांनी सर्वप्रथम स्वतः रक्तदान करून शिबीराची सुरूवात केली.  रक्तदान शिबीरात 50 जणांचे रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली व 10 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी केले. सुत्रसंचालन कवि राजेश रेवले यांनी केले तर आभार डॉ.सुहास जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. सुनिल गलांडे, डॉ.नरेश जायेवार, डॉ.विद्या तायडे, डॉ.नरेंद्र कांबळे, अनंत मुंडे, सुनिल गिरी, स्वप्निल शिल्लार, मायादेवी भिकाणे व पुजा वावरगिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आवाहनानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून व संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनानुसार रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.



Thursday, December 17, 2020

परभणी कृषि विद्यापीठाचे संशोधनात्‍मक कार्य कौतुकास्पद ........ मा श्री राजेंद्र पवार

बारामती कृषि विकास प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा श्री राजेंद्र पवार यांची वनामकृविस सदिच्‍छा भेट

शेती व शेतकरी विकासाकरिता कृषि संशोधनाला पर्याय नाही. मर्यादित निधीमुळे संशोधनाचा प्राधान्‍यक्रम आपणास ठरवावा लागतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित कोरडवाहु शेतीस अनुकूल विविध पिकांचे वाण व इतर तंत्रज्ञान निश्चितच उपयुक्‍त असुन विद्यापीठाचे संशोधनात्‍मक कार्य कौतुकास्‍पद आहे. आहारात बाजरी, ज्‍वारी, जवस आदी दुय्यम कडधान्‍याचे महत्‍व वाढत असतांना परभणी विद्यापीठाने या पिकांचे चांगले वाण विकसित केले आहेत. विद्यापीठ विकसित तुरीचा बीडीएन ७११, ज्‍वारीचे परभणी सुपर मोती, परभणी शक्‍ती, करडईचा पीबीएनएस १२ हे वाण चांगले उत्‍पादनक्षम असुन बीडीएन ७११ वाणापासुन अनेक कोरडवाहु शेतकरी बांधवाचे उत्‍पन्‍न वाढण्‍यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन बारामती बारामती कृषि विकास प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा श्री राजेंद्र पवार यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या संशोधन कार्याची माहिती घेण्‍याकरिता दिनांक १७ डिसेंबर रोजी त्‍यांनी सदिच्‍छा भेट दिली, त्‍याप्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी विद्यापीठ संशोधन कार्याची माहिती दिली. भेटी दरम्‍यान शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ जयश्री झेंड, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्रगतशील शेतकरी श्री संभाजीराव धांडे, बारामती कृषि विज्ञान केंद्राचे डॉ संतोष कारंजे, डॉ डॉ के टी जाधव आदींसह विद्यापीठातील संशोधक व अधिकारी उपस्थित होते.

मा श्री राजेंद्र पवार म्‍हणाले की, पश्चिम महाराष्‍ट्रातील कोरडवाहु क्षेत्रात परभणी विद्यापीठ विकसित अनेक कृषि तंत्रज्ञानाचा चांगला लाभ होऊ शकतो. विद्यापीठाने शेतकरी बांधवाच्‍या गरज लक्षात घेऊन विकसित कृषि अवचारे व यंत्रे यात बैलचलित तसेच सौर उर्जावरील अवचारे, बीबीएफ यंत्र याचा निश्चितच शेतकरी बांधवाना लाभ होणार आहे. परभणी येथील गृहविज्ञानाशी संबंधीत एकमेव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय ग्रामीण महिला, बालविकास व किशोरवयीन मुलींच्‍या विकासाकरिता कार्य करत आहे. विद्यापीठ विकसित कृषि तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत चांगल्‍या प्रकारे पोहचले पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

यावेळी त्‍यांनी विद्यापीठातील कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प, बायोमिक्‍स प्रकल्‍प, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्र महाविद्यालय आदी प्रकल्‍पास भेट देऊन संशोधनाची माहिती घेतली. भेटी दरम्‍यान बांबु लागवड संशोधनाबाबत डॉ डब्लु एन नारखेडे, कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञानाबाबत डॉ मदन पेंडके, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर तंत्रज्ञान व कृषि औजाराबाबत डॉ स्मिता सोळंकी, सौर उर्जेचे वापराबाबत डॉ राहुल रामटेके, गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबत डॉ जयश्री झेंड, प्रक्रिया अन्‍न पदार्थाबाबत डॉ अरविंद सावते, विद्यापीठ विकसित बॉयोमिक्‍स बाबत डॉ कल्‍याण आपेट यांनी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ ऋषिकेश औंढेकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील संशोधक व अधिकारी उपस्थित होते.




Monday, December 7, 2020

शाश्वत शेती विकासाकरिता पुस्तकी ज्ञान शेतक­यांच्या बांधावर पोहचविणे गरजेचे ... डॉ. सुरेशकुमार चौधरी

मृदा आरोग्‍य राष्‍ट्रीय ऑनलाईन व्‍याख्‍यानमालेचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा - परभणीच्या वतीने बदलत्या हवामानातील अद्यावत शेतीत मृदा आरोग्य व्यवस्थापनाचा नाविण्यपुर्ण दृष्टीकोन या विषयावर ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन दि. सप्टेंबर ते ५ डिसेंबर दरम्‍यान दर रविवारी करण्यात आले होते, या व्‍याख्‍यानमालेचा समारोप दिनांक ६ डिसेंबर रोजी संपन्‍न झाला. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद उपमहासंचालक डॉ. सुरशेकुमार चौधरी, हैद्राबाद येथील इक्रीसॅट संस्‍थेचे माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी, अध्यक्ष, भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा-परभणी चे अध्‍यक्ष तथा प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, सचिव डॉ. प्रविण वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. सुरेशकुमार चौधरी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत निर्मीतीमध्ये ग्रामस्तरावर मृदा, पाणी, वनस्पतीचे शिक्षण, संशोधने पोहचविणे हे शाश्वत शेतीचे महत्वाची धोरणे आहे. शाश्वत मृदा आरोग्‍य व्यवस्थापनाकरिता संशोधन होणे गरजेचे आहे. कृषि संशोधन व विस्तार संबंधीत पुस्तकरुपी ज्ञान प्रत्यक्षात शेतक­यांच्या बांधावर पोहचण्‍यासाठी प्रभावी विस्तार कार्य आवश्यक आहे. खतांची  कार्यक्षमता वाढवून प्रति हेक्टरी रासायनीक खताचा वापर कमी करण्यास वाव असल्‍याचे मत त्‍यांना व्‍यक्‍त केले. तर डॉ. एस.पी. वाणी यांनी मृद शास्त्रज्ञानी संशोधना बरोबर कृषि विस्तार कार्यामध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक असुन कृषि संशोधन व कृषि विस्तार या दोन गोष्टींना प्राध्यान्य देणे गरजेचे असल्‍याचे म्‍हणाले.  

अध्‍यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावात  आयोजित व्याख्यानमालेमुळे मातीचे आरोग्‍याबाबत शेतकरी, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्‍यांना निश्चितच उपयुक्‍त माहिती मिळाली. शाश्वत शेती क्षेत्रात हवामनावर अधारीत स्मार्ट तंत्राचा शेतक­यांनी योग्य उपयोग केल्यास उत्पादना वाढ होईल असे मत व्यक्त केले. व्याख्यानमालेचे सर्व लेख संकलीत करुन विद्यापीठाच्या सुर्वण जयंती वर्ष २०२१ मध्ये पुस्तकरुपात प्रकाशीत करण्याच्या मानस केला.

कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय डॉ. सय्यद इस्माईल यांनी करून दिला तर प्रास्ताविक भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा-परभणी चे सचिव डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. सुत्रसंचालन सहसचिव डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. प्रविण वैद्य यांनी मानले.

सदरिल व्याख्यानमालेत देश विदेशातुन १९० शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी शेतकरी यांनी सहभाग नोंदविला. व्याख्यानमालेत देशातील नामांकित संस्थांचे शास्त्रज्ञ डॉ. डी.के. पाल, डॉ. एस.पी. वानी, डॉ. ए.के. पात्र, डॉ. पी. चंद्रशेखरराव, डॉ. च. श्रीनिवासराव, डॉ. डीएलएन राव, डॉदिपक रंजन बिसवास, डॉ. देबाशीस चक्रबोर्ती, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. सुरेशकुमार चौधरी आदींची व्‍याख्‍याने झाली. व्याख्यानमालेच्या यशस्वीततेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. स्वाती झाडे, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. स्नेहल शिलेवंत व डॉ. शशिशेखर जावळे, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी संजय तोडमल, अक्षय इंगोल, राकेश बगमारे आदींनी  सहकार्य केले.

Sunday, December 6, 2020

वनामकृवित जागतिक मृदा दिन दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृदा विज्ञान संस्‍था शाखा परभणी, जालना व हिंगोली येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक ५ डिसेंबर रोजी जागतिक मृद दिन साजरा करण्‍यात आला. या निमित्‍त ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्‍यात आले होते, मातीची सजिवता जपण्‍याकरिता जैव ि‍वविधतेचे रक्षण यावर विभाग प्रमुख तथा मृदा शास्‍त्रज्ञ डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी मार्गदर्शन केले.  वेबिनार मध्‍ये दोनशे पेक्षा जास्‍त शेतकरी, विद्यार्थी, संशोधक व कृषि विस्‍तारक सहभागी झाले होते. मार्गदर्शनात डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, पर्यावरणातील माती, जीव जंतु, वनस्‍पती व मानव यांचे परस्‍पर संबंध असुन कृषि उत्‍पादन वाढीत महत्‍वाची भुमिका आहे. माती हे संजीव घटक असुन ही संजीवता जपण्‍यासाठी जैव विविधतेत वृध्दी करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले.  जागतिक मृदा दिनानिमित्‍त मौजे नांदखेड ये‍थील शेतक-याच्या बांधावर जैव विविधता आणि प्रयोग क्षेत्र भेट देऊन मृदा विज्ञान शाखेतील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमात डॉ. अनिल धमक, डॉ आर एन खंदारे, डॉ एस पी झाडे, डॉ जावळे, डॉ शीलेवंत, तोडमल, इंगोले, बगमारे आदी सहभाग घेतला.

Friday, December 4, 2020

वनामकृविच्‍या वतीने जागतिक मृदा दिनानिमित्‍त ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्‍था, परभणी शाखा, खरपुडी (जालना)  व तोंडापुर (हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्र यांचे संयुक्‍त विद्यमाने जागतिक मृदा दिनानिमित्‍त दिनांक 5 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी 10.30 वाजता एक दिवसीय वेबिनार चे आयोजन करण्‍यात आले आहे. वेबिनार मध्‍ये मातीची सजीवता जपण्‍यासाठी जैवविविधतेचे रक्षण याविषयावर विभाग प्रमुख तथा मृद शास्‍त्रज्ञ डॉ सय्यद इस्‍माईल हे मार्गदर्शन करणार आहेत. सदरिल वेबिनार झुम मिटिंगच्‍या माध्‍यमातुन होणार असुन झुम मिटिंग आयटी 677 598 6291 असुन पासवर्ड 12345 आहे. तरि जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधव, कृषिचे विद्यार्थ्‍यी व कृषि विस्‍तारकांनी सहभागी होण्‍याचे आवाहन आयोजकाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Thursday, December 3, 2020

वनामकृवित वृक्षलागवड करून कृषि शिक्षा दिन व पर्यावरण जागृकता दिन साजरा

परभणीचे पोलिस अधिक्षक मा श्री जयंत मीना यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने कै. डॉ राजेंद्र प्रसाद यांचा जन्‍म दिवस कृषि शिक्षा दिवस व पर्यावरण जागृकता दिवसाचे निमित्‍त साधुन दिनांक 3 डिसेंबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्‍यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन परभणी जिल्‍हयाचे पोलिस अधिक्षक मा श्री जयंत मीना हे उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जयश्री झेंड, प्राचार्य डॉ तुकाराम तांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पोलिस अधिक्षक मा श्री जयंत मीना यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. यावेळी मा श्री जयंत मीना म्‍हणाले की, पर्यावरण संतुलनाकरिता वृक्षलागवड करणे गरजेचे असुन परभणी कृषि विद्यापीठाचा परिसर अत्‍यंत स्‍वच्‍छ, सुंदर व वृक्षांनी नटलेले आहे. विद्यापीठाने हाती घेतलेल्‍या हरित विद्यापीठ संकल्‍प निश्चितच अत्‍यंत स्‍तुत्‍य उपक्रम असुन विविध वृक्षांनी नटलेले विद्यापीठ परिसर पाहुन मनास शांतता मिळते, असे ते म्‍हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, देशाचे पहिले राष्‍ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांचा जन्‍म दिवस कृषि शिक्षा दिवस म्‍हणुन साजरा करतो. गेल्‍या दोन वर्षापासुन विद्यापीठाने हरित विद्यापीठ, स्‍वच्‍छ विद्यापीठ व सुरक्षीत विद्यापीठ उपक्रम हाती घेतला असुन विद्यापीठात हजारो वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्‍यात येत आहे. विविध रंगांची फुले, विविध प्रकारच्‍या वृक्षांची लागवड करण्‍यात आली असुन वृक्षलागवड करतांना जैव विविधतेचे संतुलनाच्‍या दृष्‍टीने विशेष लक्ष ठेवण्‍यात आले आहे. तसेच मधमाश्‍या व पक्षांचे वास्‍तव्‍य वाढीचा विचार करण्‍यात आला आहे. परभणी कृषी विद्यापीठात देशातील विविध राज्‍यातील विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यीनी शिक्षणाकरिता येतात, त्‍यांचे आईवडील मोठया विश्‍वासाने त्‍यांना परभणीस पाठवितात, हे विद्यापीठ त्‍यांच्‍या करिता सुरक्षीत वाटले पाहिजे, यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील असल्‍याचे त्‍यांनी सांगुन परभणी पोलिस प्रशासनाचे आम्‍हास चांगले सहकार्य लाभते, असे म्‍हणाले.   

प्रास्‍ताविकात डॉ हिराकांत काळपांडे विद्यापीठ परिसरात करण्‍यात आलेल्‍या वृक्ष लागवड उपक्रमाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी केले तर आभार डॉ जयकुमार देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास डॉ राजेश क्षीरसागर, डॉ राजेश कदम, डॉ गजानन गडदे आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.