Saturday, May 27, 2023

राजकोट (गुजरात) ये‍थे आयोजित गौ टेक २०२३ एक्‍सपो प्रदर्शनीत वनामकृविच्‍या पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या दालनास अभुतपुर्व प्रतिसाद

सुधारित बैलचलित अवजारांचा वापर काळाची गरज-केंद्रीय मंत्री श्री. पुरुषोत्तम रुपालाजी यांचे प्रतिपादन

राजकोट (गुजरात) येथे राष्‍ट्रीय स्‍तरीवरील गौ-टेक २०२३ एक्‍सपो प्रदर्शनीचे दिनांक २४ मे ते २८ मे दरम्‍यान करण्‍यात आले असुन यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत पशूशक्तीचा योग्य वापर योजनेने विकसित केलेले सुधारित बैलचलित अवजारे व तंत्रज्ञानाचे प्रदर्शनीचे दालन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार लावण्‍यात आले आहे. गौ-टेक 2023 एक्सपोचे आयोजन ग्‍लोबल कन्‍फेडरेशन ऑफ काऊ बेस्‍ड इंडस्‍ट्रीजचे संस्थापक डॉ. वल्लभभाई कथारिया यांनी केले आहे. सदर प्रदर्शनीचे उदघाटन भारत सरकारचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मत्स्य विभागाचे केंद्रीय मंत्री माननीय श्री पुरुषोत्तमजी रुपाला यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. माननीय श्री पुरुषोत्तमजी रुपाला आणि केरळचे माननीय राज्‍यपाल मा श्री अरिफ मोहम्‍मद खान यांनी वनामकृविच्‍या बैलचलित अवजारे व तंत्रज्ञान प्रदर्शनी दालनास भेट देउन पाहणी केली.

प्रकल्पाच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी अवजारे व तंत्रज्ञान बद्दल माहिती देतांना सांगितले की, या प्रकल्पांतर्गत ३०-३२ बैलचलित अवजारे विकसित करण्यात आली असुन हे तंत्रज्ञान देशातील शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न आहे. या सुधारित अवजारामध्ये बैलचलित टोकन यंत्र, धसकट गोळा करणे यंत्र, कापूस टोकण यंत्र, प्लास्टिक अंथरणी यंत्र , हाळदीस व उसास माती लावणे यंत्र, बैलचलित सोलार फवारणी यंत्र, एक बैलाच्या आधारे चालविली जाणारी अवजारांचा संच, आजारी पशु उभा करणे यंत्र, सुधारित जू, हळद काढणी यंत्र, इत्यादी अवजारांचा समावेश आहे. ही अवजारे पर्यावरण पूरक, कमी खर्चाची पेट्रोल व डिझेल ची आवश्यकता न लागणारी वेळेची बचत कृषी निविष्ठांची बचत व पशु व मानवास लागणारे श्रम करण्याचे यंत्र आहेत. अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी योजनेद्वारे शेतकरी मेळावे, प्रदर्शनी, चर्चासत्रे व प्रात्यक्षिके आणि तांत्रिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

दालनाची पाहणी करतेवेळी मा. श्री पुरुषोत्तमजी रुपाला यांनी प्रकल्‍पाव्‍दारे विकसित केलेल्‍या अवजारे यांचे कौतुक करून देशभरातील शेतकरी, गौशाळा चालक व पशुचालकांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन सेंद्रिय शेती ची कास धरून उत्पन्न वाढवण्‍याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधव व गौशाळा चालक यांनी मा. मंत्री महोदयाकडे बैलचलित सुधारित अवजारावर शासनातर्फे सबसीडी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

आयोजक डॉ .वल्लभभाई कथारिया यांनी वनामकृविचे प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविल्‍याबद्दल कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांचे आभार व्यक्त केले. प्रकल्प समन्वयीका डॉ. स्मिता सोळंकी, पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, अपारंपारिक ऊर्जा विभाग प्रमुख डॉ .राहुल रामटेके, इंजि. अजय वाघमारे व सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले.









Friday, May 26, 2023

मौजे नावकी येथे पर्यावरण पुरक जीवन पध्‍दती कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने पुर्णा तालुक्यातील मौजे नावकी येथे दिनांक २६ मे रोजी बदलत्या वातावरणाशी निगडीत “पर्यावरण पुरक जीवन पध्दती” या विषयाावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमास सरपंच श्रीमती मुक्ताबाई भुसारे, प्रगतशील शेतकरी श्री. केशवराव भुसारे, सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र चे सदस्य शास्त्रज्ञ उपस्थित होते.

मार्गदर्शनात सदस्य शास्त्रज्ञ (मृदाशास्त्र) डॉ. पपिता गौरखेडे यांनी पर्यावरणाशी संतुलीत शेती पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच माती परीक्षणावर भर देवून खतांचा काटेकोर वापर करून मातीचे आरोग्य जोपासने अत्यंत गरजेचे असल्‍याचे सांगुन एकात्मिक शेती पध्दती व विविध सेंद्रीय निविष्ठा बददल सखोल असे मार्गदर्शन केले.

कृषि विद्यावेत्ता डॉ. प्रितम भुतडा यांनी खरीप पिक व्यवस्थापन व आंतरपिक पध्दती, पर्यावरण पुरक शेतीसाठी एकात्मिक पिक पध्दती, लागवड खर्च कमी लागणारे पिक म्हणुन भरड धान्याचे शेतीमध्ये व आरोग्यासाठी उपयोग याबददलही मागदर्शन केले.

सदस्य शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) डॉ. मिनाक्षी पाटील यांनी पर्यावरण पुरक शेती पध्दतीसाठी जैविक निविष्ठाचा वापर करणे आवश्यक आहे व पर्यावरणाचा ऱ्हास होवु नये यासाठी रासायनिक घटकांचा वापर जसे तणनाशक, बुरशीनाशके व किडनाशके यांचा वापर कमी करावा असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. शेषराव भुसारे यांनी केले तर आभार श्री. मारोती भुसारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ संशोधन सहयोगी डॉ. सुनील जावळे, श्री. अनंता भुसारे, श्री. डिगंबर कोराडे, श्री. गंगाधर सातपुते, श्री. माऊली भुसारे आदींनी परिश्रम घेतले.

मौजे सोन्‍ना येथे पर्यावरण पुरक जीवन पध्‍दती कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पांतर्गत असलेला हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत परभणी तालुक्यातील मौजे सोन्ना येथे दिनांक २५ मे रोजी बदलत्या वातावरणाशी निगडीत “पर्यावरण पुरक जीवन पध्दती” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न झाली. कार्यक्रमात कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदशास्त्र) डॉ. जी. आर. हनवतेकनिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. जी. आर. हनवते यांनी दैनंदीन जीवनातील वापरात असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा व वाहनांचा पर्यावरणावर व मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, मातीचे आरोग्‍य हे मानवाच्‍या आरोग्‍यावर परिणाम करते. शेतात सेंद्रीय निविष्ठांचा वापर वाढविण्यात भर देणे आवश्‍यक असुन यामुळे मानवी जीवन निरोगी सदृढ होण्यास मदत होईल.

डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी पर्यावरणातील होणाऱ्या बदलाचा मातीवर होणारे अनिष्ठ परिणाम व त्यावरील उपाययोजना सुचविल्या तसेच त्यांनी एकात्मिक पध्दतीने पिकांवर होणाऱ्या कीड व रोगांचा नायनाट करण्यावर भर देण्यास सुचविले व रासायनिक खतांचा, कीड व रोग नाशकांचा वापर हा कमी प्रमाणात करावा असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री एम. डब्ल्यू. राठोड, यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. एस. एस. सुर्यवंशी, माजी पोलीस पाटील आवडाजी गमे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मौजे सोन्ना या गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.  




Thursday, May 25, 2023

कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना विविध क्षेत्रात संधी ....... प्राचार्य डॉ. उदय खोडके

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाच्‍या विद्यार्थ्‍यांचा निरोप समारोह संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील बी. टेक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारोह दिनांक २३ मे रोजी संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके हे होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. बालाजी नांदेडे, डॉ. सुभाष विखे, डॉ. संदीप पायाळ आदी उपस्थित होते.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयास गौरवशाली परंपरा असुन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी देश-विदेशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्या करित आहेत. कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी समाजाच्या व देशाच्या विकासात हातभार लावावा. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेच्या नावलौकिकासाठी कार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, संरक्षित शेती, सौर व इतर उर्जा, रोबोटिक्स आदी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या व त्याद्वारे येणाऱ्या काळात कृषि क्षेत्राचा शाश्‍वत विकास करण्याची संधी कृषि अभियंत्यांना असल्याचे त्यांनी सांगितले.  

राष्ट्रीय संशोधन संस्थेत कृषी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांचे अधिक प्रमाण असून त्यांचे कृषि शिक्षण व संशोधन कार्यात भरीव योगदान दिले हि अत्यंत अभिमानाची बाब असल्‍याचे डॉ. बालाजी नांदेडे म्‍हणाले तर कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी त्यांच्या ज्ञानाचा वापर शेतकरी बांधवासाठी करून राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावण्‍याचे आवाहन डॉ व्ही. डी. पाटील यांनी केले.

कार्यक्रमात अंतिम वर्षाच्या आर्यन खंडागळे, गोविंद खुळे, प्रकाश पतंगे, रणजित पाटील, रुतुजा पाटील, श्रुती राजपूत आणि आकाश शेगावकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पाल्य प्राध्यापक डॉ. सुभाष विखे, डॉ. संदीपान पायाळ यांची ही मार्गदर्शनपर भाषणे झाली. प्रास्‍ताविक प्रा. विवेकानंद भोसले यांनी केले. सूत्रसंचालन सौरभ काळे आणि शाहजाद हाश्मी यांनी केले तर आभार मयूर अरक याने मानले. कार्यक्रमास डॉ. मधुकर मोरे, डॉ. पंडित मुंढे, डॉ. सुमंत जाधव, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. विशाल इंगळे, डॉ. श्याम गरुड, प्रा. दतात्रय पाटील, डॉ. सुजाता मुस्तापुरे आदि प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम येशस्वी करण्यासाठी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. 

मौजे मटक-हाळा येथे शेतक-यांना मार्गदर्शन

माती परीक्षणाच्या आधारे करा खताचे व्यवस्थापन …… डॉ गजानन गडदे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि रिलायंस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी तालुक्यातील मौजे मटक­हाळा येथे दिनांक २४ मे रोजी खरीप हंगामाच्या पुर्वनियोजनाच्या दृष्टीने शेतक­यांसोबत फेस टु फेस मिटींग हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी शेतक­यांच्या मातीपरीक्षण अहवालानुसार पिकांना खतांची मात्रा देण्‍याचे आवाहन केले. त्‍यांनी यावेळी येणा­या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व तुर पिकाच्या खत व्यवस्थापन, सोयाबीनचे वाण एमएयुएस-७२५, एमएयुएस-६१२, एमएयुएस-१५८, एमएयुएस-१६२ व एमएयुएस-७१, तुर पिकाचे बिडीएन-७११, बिडीएन-७१६, गोदावरी आदी वाणाबाबत माहिती देऊन बीजप्रक्रिया, रूंद वरंबा सरी पद्धत, आंतरमशागत, तणनाशके, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, शंखी गोगलगाय आदी विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राने प्रकाशित केलेले सोयाबीन व तुर पिकाची घडीपत्रिका शेतक­यांना वाटप करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिलायंस फाऊंडेशनचे श्री रामा राऊत, मनोज काळे व विद्यापीठाचे नितीन मोहिते यांनी परीश्रम घेतले.

Saturday, May 20, 2023

तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक ...... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या वतीने राष्‍ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा

११ मे, १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या प्रगतीचे प्रतीक म्‍हणुन देशात राष्‍ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या वतीने ११ मे रोजी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ ऑनलाईन पद्धतीने कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या विशेष व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते.

मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक असुन सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आणि शारीरिक क्षमतेच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक प्रगतीचे एकामागोमाग अनेक टप्पे गाठले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेले प्रगती आणि त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बहुमूल्य योगदानाचे स्मरण राहावे या उद्देशाने राष्‍ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. एका बाजूने सूक्ष्मतम अणूतील ऊर्जा आपल्या कामी आणली आहे आणि दुस-या बाजूला अनंत अवकाशात भरारी घेतली आहे. यावेळी त्‍यांनी विज्ञानातील अनेक दाखले देऊन तंत्रज्ञानाची पायाभरणी विज्ञानातून कशी होते हे सांगितले. जसे वाफेचे, डिझेलचे इंजिने वापरात आल्यानंतर कालांतराने त्यांच्या कार्यामागची तत्त्वे सांगणारे उष्मागतिशास्त्र सांगितले. त्यांनी प्रकाश, ध्वनी, विद्युतशस्त्रांची कृषी व दैनंदिन जीवनातील उपयोगिता विषद केली. तसेच भारतातील अलीकडील वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती दर्शविणाऱ्या महाराष्ट्रात बांधले जाणारे लिगो-इंडिया प्रकल्‍प हे भारतातील पहिले इंटरफेरोमीटर बद्दल माहिती दिली.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाची या वर्षीची थीम 'स्कूल ते स्टार्टअप्स - इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट' या बद्दल माहिती विषद केली. सूत्रसंचालन व समन्वयन डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. संतोष फुलारी यांनी केले तर आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास मराठवाड्यातील विविध कृषी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. हेमंत पाटील, प्राचार्य डॉ. जहागीरदार, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. राकेश अहिरे, डॉ. वाघमारे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. जया बंगाळे, डॉ. भगवान असेवार आदीसह विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल कृषी तंत्रज्ञान विस्‍ताराकरिता वनामकृवि व ॲडराईज इंडिया यांच्‍यात सामंजस्य करार

शेतकऱ्यांमध्ये डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता शेतकऱ्यांना शास्त्रोक्त कृषी शिक्षण व अचूक तांत्रीक माहिती देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ, परभणी व ॲडराईज इंडिया यांच्‍या दिनांक १५ मे रोजी सामंजस्य करार करण्यात आला. शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने शास्त्रोक्त व अधिकृत शिक्षण देणे हि काळाची गरज असून त्यासाठी विद्यापीठ कायमच अग्रेसर असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. तंत्रज्ञानाच्या वापराने ‘वंदे किसान’ ह्या मोबाईल ॲप द्वारे शेतकऱ्यांपर्यंत नव्या संधी पोहचवत त्यांचा आत्मविश्वास देखील वाढवला जाईल, असेही ते म्हणाले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी समर्पित विशेष प्रकल्प लवकरच राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती ॲडराईज इंडियाचे व्यवसाय प्रमुख श्री प्रसाद कुलकर्णी ह्यांनी दिली. यावेळी विस्तार संचालक डॉ. देवराव देवसरकर, विस्तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रविण कापसे उपस्थित होते.

Thursday, May 18, 2023

विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याचे लक्ष ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित आयोजित खरीप पिक परिसंवादास  मोठा प्रतिसाद

शेतकरी बांधवांचे कठोर परिश्रमशासनाचे धोरण व कृषी तंत्रज्ञान यांच्‍या आधारे देश अन्‍नधान्‍यात आत्‍मनिर्भर झाला असुन अन्‍नपोषण सुरक्षा देशाचे लक्ष आहे. शेतकरी व शेतीचा विकास म्‍हणजेचे देशाचा विकास आहे. शेतकरी हा समाजाकरिता देवच असुन शेतकरी देवो भव: असे मी मानतो. परभणी कृषि विद्यापीठ निर्मित बियाणास शेतकरी बांधवाची मोठी मागणी असुन यावर्षी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याचे लक्ष निश्चित करण्‍यात आले आहे. विद्यापीठाची गेल्‍या काही वर्षापासुन लागवडीखाली नसलेली एक हजार एकर जमीन लागवडी योग्‍य करण्‍यात आली आहे. या प्रक्षेत्रावर सोयाबीन, ज्‍वारी, तुर आदी पिकांचे पैदासकार बियाणे उत्‍पादन घेतले जाणार आहे. परिणामी विद्यापीठाचे बीजोत्‍पादनात दुप्‍पट वाढ होईल. विद्यापीठात जलसंधारण व संरक्षित सिंचनाकरिता प्रक्षेत्रावर प्रत्‍येकी १ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे सहा शेततळयाची निर्मिती केली जात आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षाचे औचित्‍य साधुन विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप पिक परिसंवाद कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन अमेरिकेतील कनेक्‍टीकट विद्यापीठाचे अधिष्‍ठाता तथा संचालक मा प्रा इंद्रजीत चौबे यांच्‍या हस्‍ते झाले. व्‍यासपीठावर अहमदाबाद (गुजरात) येथील बन्‍सी गीर गोशाळेचे अध्‍यक्ष मा श्री गोपालभाई सुतारीया, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कृषि अधिकारी श्री रवि हारणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, शेतीक्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाकरिता विद्यापीठ पुढाकार घेत असुन विद्यापीठ ड्रोन तंत्रज्ञान प्रसाराकरिता प्रयत्‍न करित आहे. ड्रोन स्‍कुल तसेच भाडेतत्‍वावरील ड्रोन केंद्र सुरू करण्‍यात येणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान शेतक-यांमध्‍ये लोकप्रिय करण्‍यासाठी संपुर्ण मराठवाडयात ड्रोन यात्रा काढण्‍यात येणार आहे. मराठवाडा विभागात कृषि यांत्रिकीकरणाकरिता विद्यापीठाने न्‍यु हॉलंड कंपनीशी सामंजस्‍य करार केला असुन यावर्षी दीड हजार शेतकज्‍यांना कृषी यंत्राचा कार्यक्षम वापराचे प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. विद्यापीठाने टाफे कंपनीशी करार केला असुन याव्‍दारे परभणी येथे महाराष्‍ट्र यांत्रिकीकरण केंद्र स्‍थापन करून यांत्रिकीकरण व सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. सौरऊर्जेच्‍या वापरावर भर देण्‍याकरिता प्रयत्‍न केला जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असुन विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षण व संशोधनासाठी प्रयोगशाळांचे बळकटीकरण केले जात आहे. नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाचे २६ विद्यार्थी थायलंड, स्पेन येथे प्रशिक्षण घेऊन आले असुन जास्‍तीत जास्‍त विद्यार्थी व प्राध्‍यापकांना देश-विदेशात प्रशिक्षण देण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. यावर्षी जागतिक भरड धान्‍य वर्ष साजरे केले जात असुन भरड धान्‍य प्रसारात परभणी कृषि विद्यापीठाची भुमिका महत्‍वाची राहणार आहे, कारण परभणी विद्यापीठाने परभणी शक्‍ती' हा ज्‍वारीचा देशातील पहिला जैव-संपृक्‍त वाण विकसित केला असुन बाजरा पिकांचे दोन वाण विकसित केले आहेत, यात लोह व जस्‍ताचे प्रमाण सर्वसाधारण वाणापेक्षा जास्‍त आहे, यामुळे हे वाण आरोग्‍यवर्धक अन्‍न म्‍हणुन वापर होऊ शकतो.

मुख्‍य अतिथी मा डॉ इंद्रजीत चौबे म्‍हणाले की, जगासमोर हवामान बदला हा मुख्‍य प्रश्‍न असुन नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आण‍ि पर्यावरण पुरक तंत्रज्ञान विकसित करण्‍याकरिता संशोधन करण्‍यात येत आहे. आरोग्‍यवर्धक अन्‍न निर्मितीवर भर दिला जात असुन डिजिटल तंत्रज्ञानाचा याकरिता उपयोग होणार आहे. परभणी कृषि विद्यापीठ या क्षेत्रात कार्यकरिता आहे, याकरिता अमेरिकेतील कनेक्‍टीकट विद्यापीठ सामजंस्‍य करार करून सहकार्य करणार आहे.

मा श्री गोपालभाई सुतारीया म्‍हणाले की, देशी बंसी गीर गोवंश आधारीत शेती केल्‍यास निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा लाभ होऊ शकतो. देशातील अनेक भागातील शेतकरी बांधवानी देशी गायीच्‍या शेण व मलमुत्रापासुन तयार केले गो-कृपा अमृत वापर करून मोठे उत्‍पादन घेतले आहे. मानवी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने संपुर्ण सेंद्रीय शेतीच्‍या माध्‍यमातुन विषमुक्‍त अन्‍न निर्मिती केली पाहिजे. देशी गायी पासुन तयार केलेले पंचगव्‍यात अनेक उपयुक्‍त जीवाणुचे प्रमाण मोठया प्रमाण असते, हेच शेतमाल उत्‍पादन वाढीस मदत करतात, असे सांगुन देशी बंसी गीर गोवंश आधारीत शेतीबाबत सादरिकरण केले.   

प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाण आणि विस्‍तार कार्याची माहिती देऊन पेरणी योग्‍य पाऊस झाल्‍याशिवाय पेरणी न करण्‍याचा सल्‍ला दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व डॉ सुनिता पवार यांनी केले तर आभार मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. परिसंवादात विविध खरीप पीक लागवड, सोयाबीन, कापुस, ज्‍वारी, बाजरी, कडधान्‍य लागवड, भरड धान्‍याचे महत्‍व, किड – रोग व्‍यवस्‍थापन आदी डॉ गजानन गडदे, डॉ अरविंद पंडागळे, डॉ प्रशांत पगार, डॉ प्रशांत सोनटक्के, प्रा प्रितम भुतडा, प्रा अरूण गुट्टे, डॉ दिगंबर पटाईत, आदींसह इतर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवाच्‍या कृषी विषयक विविध शंकाचे निरासरण करण्‍यात आले. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, शेतीभाती मासिकांचे विमोचन करण्‍यात आले तसेच विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी श्री नरेश शिंदे, अॅड मंचकराव सोळंके, जनार्धन आवरगंड, महिला शेतकरी श्रीमती सरिता बाराहाते, महिला शास्‍त्रज्ञ डॉ स्मिता सोळंकी, ग्‍लोबल ट्रस्‍ट चे श्री वांगी दादा आदींंचा कुलगुरू यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. विद्यापीठ बियाणे खरेदी व परिसंवादास शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला.

अध्‍यक्षीय भाषण करतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

मार्गदर्शन करतांना मा डॉ इंद्रजीत चौबे




मार्गदर्शन करतांना मा श्री गोपालभाई सुतारीया


विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीचे उदघाटन
प्रास्‍ताविक करतांना डॉ देवराव देवसरकर