Friday, March 31, 2023

वनामकृवि व आयओटेक यांच्‍या वतीने कृषि ड्रोनचे प्रात्याक्षिक

कृषि अभियांत्रिकी अंतर्गत मौजे कारेगाव आणि मौजे पिंगळी येथे कृषि ड्रोनचे प्रात्‍याक्षिके 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) व आयओटेक, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि अभियांत्रिकी अंतर्गत मराठवाडयातील शेतक-यांच्या शेतावर कृषि ड्रोनची प्रात्यक्षिके नियोजीत केली असुन या अंतर्गत दिनांक ३० मार्च रोजी मौजे कारेगाव आणि मौजे पिंगळी येथे कृषि ड्रोनचे प्रात्‍याक्षिके घेण्‍यात आली. सदर प्रात्याक्षिक कार्यक्रमाचे उदघाटन कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. मौजे कारेगाव येथील कृषिभूषण श्री. सोपानरावजी अवचार व मौजे पिंगळी येथील प्रगतशील शेतकरी श्री. खुराणा यांच्या शेतावर कृषि ड्रोनची प्रात्यक्षिक आयोजित करण्‍यात आले होते. यावेळी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. यू. एम. खोडकेनाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. के. के. डाखोरे, डॉ. व्ही. के. इंगळे, प्रा. दतात्रय पाटिल आदी प्रमुख उपस्थिती होती. आयओटेकचे तंत्रज्ञ श्री. राहूल मगदुम व इंजि. अंजिक्य यांनी ही प्रात्‍यक्षिके दाखविले.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले कीभविष्‍यात कृषि क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठया प्रमाणात होणार असुन ड्रोन तंत्रज्ञान मराठवाडयातील जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवाच्‍या बांधावर पोहचविण्‍याकरिता परभणी कृषि विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. यावेळी डॉ. यू. एम. खोडके यांनी कृषि अभियांत्रिकी अंतर्गत कृषि ड्रोन प्रकल्‍पाची माहिती दिली तर डॉ. गोपाळ शिंदे यांनी कृषि ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती दिली. प्रात्याक्षिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. व्हि. के. इंगळे, इंजि. दत्ता पाटील, इंजि. श्रध्दा मुळे, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. श्वेता सोळंके, इंजि. अंजिक्य ब्रम्हनाथकर, डॉ. शिवराज शिंदे, इंजि. पोर्णिमा राठोड, इंजि. तेजस्विनी कुमावत, इंजि. संजिवनी कानवटे, श्री. मारोती रणेर, श्री. गंगाधर जाधव यांनी परीश्रम घेतले. 

कृषि तंत्रज्ञान प्रसारासाठी वनामकृवि व पानी फाऊंडेशन यांच्‍यात सामंजस्य करार

शेतक-यांची उत्पादकता व उत्पन्न वाढीसाठी पीक उत्पादन तंत्राज्ञान प्रसाराकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व पानी फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्या दरम्यान दिनांक २९ मार्च रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी कुलगुरू कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व पानी फाऊंडेशनचे कार्यक्रम समन्वयक श्री नामदेव ननावारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी कल्‍याणाकरिता विद्यापीठ कटिबध्‍द असुन कृषि तंत्रज्ञान प्रसार, शेतक-यांचे मनोबल उंचावणे व शेतीचे उत्पन्न वाढवून शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्याकरिता वनामकृवि व पानी फाऊंडेशन एकत्रित कार्य करू असे मत व्‍यक्‍त करून मा. कुलगुरू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पानी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी होऊन शेतीचे नवनविन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यन्त पोचविण्यासाठी मदत करतील असे आश्वासन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिले.

नवी दिल्ली स्थित पानी फाऊंडेशनचे संस्‍थापक प्रसिध्‍द सिनेअभिनेते श्री आमिर खान व श्रीमती किरण राव असुन पानी फाऊंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील पाणी पातळीत वाढ करणे तसेच उत्पादन खर्चात बचत करून उत्पादकता व उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ सन २०२३ हंगामाध्ये राज्यातील ३९ तालुक्यातील सर्व गावांमध्ये घेण्यात येत आहे. या स्पर्धेअंतर्गत शेतकरी गटांना विविध पीकांचे लागवड व संरक्षण तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, दृकश्राव्य प्रशिक्षण साहित्य निर्मीती करणे आणि डिजीटल शेतीशाळेमध्ये शेतक-यांना मार्गदर्शन करणे आदी कार्य केले जाते. सदर करारामुळे विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व पानी फाऊंडेशन संयुक्‍तपणे कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्य कार्य करणार आहेत. करारावर डॉ दत्‍तप्रसाद वासकर आणि श्री नामदेव ननावारे यांनी स्वाक्षरी केल्या. पानी फाऊंडेशनच्या वतीने मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये फार्मर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यापीठ शास्त्रज्ञ तंत्राज्ञान प्रसारासाठी डिजीटल शेतीशाळेमध्ये शेतक-यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झाले होते. यामुळे शेतक-यांच्या पीक लागवड खर्चात बचत होऊन उत्पादन वाढले. त्याचबरोबर कीडनाशकांचा वापर कमी होऊन शेतक-यांनी पर्यावरणपूरक शेती अवगत केली. यासोबतच कीटकनाशकमूक्त पीक उत्पादन शेतकर्यां नी घेतले. योग्य लागवड पद्धती व सिंचन व्यवस्थापणामुळे शेतीची जल उत्पादकता वाढली. या स्पर्धेमध्ये एकत्रितपणे पीक उत्पादन, शाश्वत शेती, प्रक्रिया व विक्री यांमध्ये सुयोग्य कार्य करणा-या शेतकरी गटांना दिनांक १२ मार्च २०२३ रोजी बालेवाडी, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस व पानी फाऊंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेता श्री आमीर खान यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. समारंभात पानी फाऊंडेशनच्या शेतीशाळेमध्ये मार्गदर्शन करणार्याा वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सन्‍मान करण्यात आला.

सामंजस्य करारामुळे वनामकृवि शास्त्रज्ञ पानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या हंगामी व बहुवार्षिक पिके व पशुसंवर्धन यासाठी घेण्यात येणार्याञ डिजीटल शेतीशाळेमध्ये सहभागी होऊन पिकांची लागवड, पाणी व पोषण, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन इत्यादींबाबत शेतकरी गटांना मार्गदर्शन करणार आहेत. या शेतीशाळा पिकाच्या हंगामामध्ये नियमितपणे दर आठवड्याला आयोजित करण्यात येणार आहेत. याचा लाभ सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत राज्यातील ३९ तालुक्यातील स्पर्धेत सहभागी शेतकरी गटांना होणार आहे. या शेतीशाळेमध्ये शेतकर्यां ना आपल्या शेतीतील समस्याग्रस्त पिकाचे व्हिडिओ किंवा फोटो शास्त्रज्ञांना ऑनलाईन पद्धतीने दाखवता येतील. त्यामुळे  त्यात्या वेळी उद्भवणार्याच प्रश्नांचे निराकरण वेळीच करण्यात येईल. 

Wednesday, March 29, 2023

आरोग्‍यवर्धक जीवनाकरिता सेंद्रीय शेतीकडे वळावे लागेल ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित आयोजित तीन दिवसीय राज्‍यस्‍तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचा समारोप, प्रभावी प्रशिक्षण ठरल्‍याच्‍या सहभागी शेतकरी बांधवाच्‍या प्रतिक्रिया 


देश स्‍वातंत्र झाला त्यावेळी वाढत्‍या लोकसंख्‍येकरिता अन्‍न निर्मिती हे शेती पुढील आव्‍हान होते, आता पौष्टिक अन्‍न निर्मिती हे आपल्‍या पुढील आव्‍हान आहे. रासायनिक किटकनाशके व खते यांच्‍या मर्यादा आपणास लक्षात आल्‍या असुन आरोग्‍यवर्धक जीवनाकरिता टप्प्‍या-टप्‍प्‍याने रासायनिक शेती कमी करून सेंद्रीय शेती खालील क्षेत्र वाढवावे लागेल. नैसर्गिक शेतीच शाश्‍वत शेती असुन केंद्र व राज्‍य सरकार यास प्रोत्‍साहन देत आहे. विद्यापीठ संशोधनाव्‍दारे विविध पिकांच्‍या रोग व किड प्रतिकारक वाण विकसित करित असुन या वाणाचा वापर सेंद्रीय शेतीत उपयुक्‍त ठरेल. विद्यापीठ शेतकरी बांधवाच्‍या सेवेेत तत्‍पर असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय तीन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक २७ मार्च ते २९ मार्च दरम्‍यान ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने आयोजन करण्‍यात आले होते, सदर प्रशिक्षणाच्‍या समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर,  प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ व्‍ही एन नारखेडे, हदगांव येथील प्रगतशील शेतकरी श्रीमती सुषमा देव, राजेंद्र पाटील, संजय देशमुख, मुख्‍य आयोजक मुख्‍य अन्‍वेषक डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाच्‍या सेंद्रीय शेती संशोधन केंद्र २०१८ पासुन कार्यरत असुन दरवर्षी आयोजित प्रशिक्षण वर्गास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद असतो, यावेळी देखिल शेतकरी बांधवानी ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने मोठा प्रतिसाद दिला. प्रत्‍यक्ष प्रशिक्षणाप्रसंगी सहभागी शेतकरी एकामेकांशी संवाद साधुन अनेक अनुभवाची देवाणघेवाण करतात, अनेक गोष्‍टी शिकतात. विद्यापीठाचे सेंद्रीय शेती संशोधन प्रगतीपथावर असुन येणा-या काळात याचा विस्‍तार वाढेल.  

यावेळी कृषीभुषण भगवान इंगोले, सदाशिव अडकिणे, अश्विनी शिंदे, राहुल सुर्यवंशी, जनार्धन आवरगंड आदी शेतकरी बांधवानी आपल्‍या मनोगतात विद्यापीठाने आयोजित केलेले प्रशिक्षण वर्ग अत्‍यंत प्रभावी झाल्‍याची भावना व्‍यक्‍त केली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सहभागी शेतकरी बांधवाना प्रमाणपत्र वितरित करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आयोजक मुख्‍य अन्‍वेषक डॉ आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले.

सदर प्रशिक्षणास मराठवाडा विभागातील शेतकरी बंधु भगिनीकृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञकृषि शास्त्रज्ञविद्यार्थीकृषि विभागाचे अधिकारीकर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते तर प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपणाचा लाभ राज्‍यातील हजारो शेतकरी बांधवानी घेतला. तीन दिवसीय प्रशिक्षणात सेंद्रीय शेतीमध्ये पीक लागवड तंत्रज्ञानसेंद्रीय शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनजैविक कीड व रोग व्यवस्थापनभाजीपाला व फळपिकांचे सेंद्रीय पद्धतीने व्यवस्थापनसेंद्रीय शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाअवजारांचा कार्यक्षम वापरजैविक निविष्ठांची निर्मिती व वापरपशुधन व्यवस्थापनसेंद्रीय प्रमाणीकरणसेंद्रीय शेतमाल विक्री व बाजारपेठ व्यवस्थापन आदी विविध विषयांवर राज्यातील कृषि विद्यापीठेसंशोधन संस्थास्वयंसेवी संस्थाखाजगी संस्था येथील तज्ञांचे व प्रगतशील शेतकरी यांचे मार्गदर्शन केले तसेच यशस्‍वी सेंद्रीय शेती करणा-यां शेतकरी बांधवानी आपले अनुभव मांडले.


Tuesday, March 28, 2023

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणास सुरूवात

शेतीतील विविध निविष्‍ठांचा पुर्नवापर करण्‍याची क्षमता सेंद्रीय शेतीत असुन सेंद्रीय शेती पर्यावरण अनुकूल व जैव विविधता राखु शकणारी शेती आहे. पिक लागवडी पासुन ते शेतमाल विपणनापर्यंत सेंद्रीय शेतीत अनेक समस्‍या आहेत, यावर शेतकरी बचत गट, गट शेती व शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन मात करू शकतो. सेंद्रीय शेतीचे तंत्र शिकण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील भाकृअप - भारतीय एकात्मिक शेती पध्दती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनिल कुमार यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय तीन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक २७ मार्च ते २९ मार्च दरम्‍यान ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने आयोजन करण्‍यात आले असुन सदर प्रशिक्षणाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर व्‍यासपीठावर कृषि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे माजी उपायुक्‍त तथा नागपुर येथील प्रादेशिक जैविक शेती केंद्राचे माजी प्रादेशिक संचालक डॉ. ध्रुवेंद्र कुमार, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर,  शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखलेप्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, कृषि उपसंचालक श्री. बळीराम कच्छवेप्रगतशील शेतकरी श्री. सोपानराव अवचार, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, निबंधक विनायक शिराळे, मुख्‍य आयोजक मुख्‍य अन्‍वेषक डॉ आनंद गोरे  आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्‍छा दिल्‍या तर डॉ. ध्रुवेंद्र कुमार यांनी सेंद्रीय शेती व एकात्मिक शेती यावर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीच्‍या अनेक पध्‍दती आहेत. भाजीपाला व फळबागेत मोठया प्रमाणात रासायनिक किटकनाशकांचा वापर केला जात आहे, यामुळे मानवास विविध शारिरीक व्‍याधी होत आहेत. आरोग्‍याबाबत ग्राहक जागरूक होत आहे, सेंद्रीय शेतमाल विक्री करिता सक्षम ग्राहक ओळखुन विक्रि करावी लागेल. विषमुक्‍त शेतीकरून तणावमुक्‍त शेतकरी झाला पाहिजे.

प्राचार्य डॉ सय्यद इस्‍माईल यांनी सेंद्रीय शेती करण्‍या आधी ज्ञान प्राप्‍त करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. तर प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार यांनी विद्यापीठात सेंद्रीय शेती संशोधनामुळे शास्‍त्रीय व अधिकृत माहिती प्राप्‍त होईल अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

प्रास्‍ताविकात डॉ आनंद गोरे यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले. तांत्रिक सत्रात सेंद्रीय शेतीचे महत्‍व व प्रश्‍न यावर डॉ ध्रुवेन्‍द्र कुमार यांनी मार्गदर्शन केले, तर भरड धान्‍य पोषणमुल्‍य व उपयुक्‍तता यावर डॉ दीप्‍ती पाटगावकर यांनी, सेंद्रीय शेतीत फळपिक लागवड यावर डॉ संजय पाटील, सेंद्रीय शेतीत भाजीपाला लागवडीवर डॉ श्रीधर दिसले आणि सेंद्रीय शेतीत पिक लागवडीवर डॉ आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणास मराठवाडा विभागातील शेतकरी बंधु भगिनीकृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञकृषि शास्त्रज्ञविद्यार्थीकृषि विभागाचे अधिकारीकर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य सहभागी झाले असुन प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल https://www.youtube.com/@VNMKV वर करण्‍यात येत आहे.

Saturday, March 25, 2023

वनामकृवित तीन दिवसीय राज्‍यस्‍तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन

ऑनलाईन व ऑफलाईन माध्‍यमातुन प्रशिक्षणाचे आयोजन, विद्यापीठ युटयुब चॅनेलवर थेट प्र‍क्षेपण 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय तीन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक २७ मार्च ते २९ मार्च दरम्‍यान ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने आयोजन करण्‍यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले आहे. प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक दिनांक २७ मार्च रोजी  सकाळी ११.०० वाजता परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे राहणार आहेत तर प्रमुख पाहूणे म्हणुन मोदीपुरम, मीरत (उत्तर प्रदेश) येथील भाकृअप - भारतीय एकात्मिक शेती पध्दती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनिल कुमार आणि कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उपायुक्‍त तथा नागपुर येथील प्रादेशिक जैविक शेती केंद्राचे माजी प्रादेशिक संचालक डॉ. ध्रुवेंद्र कुमार यांचे सेंद्रीय शेती व एकात्मिक शेती यावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, कृषि उपसंचालक श्री. बळीराम कच्छवे, प्रगतशील शेतकरी श्री. सोपानराव अवचार आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

सदर प्रशिक्षण शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्त्रज्ञ, विद्यार्थी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांचेकरिता आयोजित करण्‍यात आले असुन याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल www.youtube/user/vnmkv वर करण्‍यात येणार आहे. तीन दिवसीय दररोज प्रत्यक्ष / ऑफलाईन पद्धतीने सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० वाजे पर्यंत तसेच ऑनलाईन पद्धतीनेही या कार्यक्रमाचे विद्यापीठ युटयुब चॅनल थेट प्रक्षेपण होणार आहे.

तीन दिवसीय प्रशिक्षणात सेंद्रीय शेतीमध्ये पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन, जैविक कीड व रोग व्यवस्थापन, भाजीपाला व फळपिकांचे सेंद्रीय पद्धतीने व्यवस्थापन, सेंद्रीय शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, अवजारांचा कार्यक्षम वापर, जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर, पशुधन व्यवस्थापन, सेंद्रीय प्रमाणीकरण, सेंद्रीय शेतमाल विक्री व बाजारपेठ व्यवस्थापन आदी विविध विषयांवर राज्यातील कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था येथील तज्ञांचे व प्रगतशील शेतकरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

प्रत्यक्ष / ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी शेतकरी बंधु भगीनी यांची मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्हयातील कृषि विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातुन पुर्ण झाली आहे. तरी इतर शेतकरी बंधु भगीनी व इतर प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठ युटयुब चॅनल च्या माध्यमातुन सहभागी होऊ शकतात. तरी सदर प्रशिक्षणात जास्‍तीत जास्‍त संख्‍येने शेतकरी, कृषि विस्‍तारक व विद्यार्थी यांनी यांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजन प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, प्रशिक्षण समन्‍वयक डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. मिनाक्षी पाटल, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.  प्रशिक्षणाच्‍या अधिक माहिती साठी संपर्क साधावा - डॉ. आनंद गोरे ९५८८६४८२४२, डॉ. पपिता गौरखेडे ८००७७४५६६६, डॉ. मिनाक्षी पाटील ९४२३१०३५१९, डॉ. सुनिल जावळे ९४२२१११०६१, श्रीमती  शितल उफाडे ९३५९३७६४४६.


प्रशिक्षणाची सविस्‍तर माहितीकरिता येथे क्लीक करा