Saturday, February 15, 2020

वनामकृवितील एलपीपी स्कूलच्या विद्यार्थ्‍यांचा टॅलेन्ट शो संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व अभ्यास विभागातंर्गत असलेल्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्‍यांचा टॅलेंट शो दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जल्लोषात संपन्न झाला. यावेळी प्राचार्या मा. डॉ. जयश्री झेंड, जिल्हा पोलिस उपअधिक्षक श्री. नितीन बगाटे, तहसीलदार श्री. विद्याचरण कडवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. टॅलेन्ट शो मध्ये विद्यार्थ्‍यांनी देशभक्तीपर गीते, शा‍स्‍त्रीय नृत्य, शेतकरी गीते, कोळी गीते, बाल गीते, नाटिका, लेझीम आदी विविध कला प्रकार सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. जया बंगाळे यांनी तर सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एलपीपी स्कूलच्या शिक्षिका, कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थींनीं परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, February 12, 2020

भावी पिढी सुद्दढ करावयाची असेल तर गाव तेथे बियाणे बॅक उभारली पाहिजे ...... पद्मश्री मा श्रीमती राहीबाई पोपेरे

वनामकृविच्‍या तुळजापुर कृषि विज्ञान केद्रात आयोजित महिला मेळाव्‍यात प्रतिपादन

विविध पिकांची देशी वाण हे कमी पाण्यावर आणि कुठल्याही रोगांना कधीच बळी न पडणारे असून येणा-या पिढीला ही नैसर्गिक देणच वाचवू शकेल. बियाण्यांची साठवणूक राखेत केल्यामुळे त्यांची उगवण क्षमता वाढतेतसेच बियाण्यापासून होणा-या उत्पादनामुळे मानवांना कुठल्याच आजार उदभवत नाही. देशात आज गावोगावी पैशांच्या बॅंका झाल्‍या आहेत, परंतु भावी पिढी सुदृढ करावयाची असेल तर प्रत्येक गावात बियाणे बॅंकउभारली गेली पाहिजे, असे प्रतिपादन पद्श्री पुरस्कार प्राप्त बीजमाता मा श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक १२ फेब्रुवारी रोजी आयोजित महिला मेळाव्यात्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी कुलगूरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बजरंग मंगरूळकर, प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती शैलजा नरवडे, महिला उद्योजिका श्रीमती अर्चना भोसले, श्रीमती गोदावरी क्षीरसागर, उस्मानाबाद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राकेश अहिरे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. सचिन सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात कुलगूरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, सध्या बाजारातील भाजीपाला विविध रासायनिक खतं, बियाणे, तणनाशके, किटकनाशके यांच्या वापरापासून तयार झालेला असून तो शरिरास कीती पोषक आहे, यात शंका आहे. ग्रामीण भागात पोषणाची व्यवस्था सध्या खूप गंभीर असून कुटुंबात पोषणवरून महिला-पुरूष, कनिष्ठ-वरिष्ठ असा भेदभाव केला जातो. तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राचा महिला केंद्रीत उपक्रम राबविण्यात चांगला हातगंडा असून यावर्षी पोषणमूल्य आधारित परसबागेची निर्मिती हा नाविन्यपूर्ण उपक्रमाने वर्षाची सुरूवात केली आहे. या उपक्रमामुळे घराघरात पोषण सुरक्षा पोहचविण्‍याचा प्रयत्‍न होणार असुन यामध्ये देशी बियाण्यांचे जतन, प्रसार आणि प्रचार होणे क्रमप्राप्त ठरते. आदिवासी समाजात रानभाज्यांचे महोत्सव भरविले जातात, हा विचार येणा-या पिढीसाठी प्रेरणादायी असून याचे अनुकरण शहरी भागात देखील झाले पाहिजे. प्रत्येकाने घराभोवती परसबागेत देशी भाजीपाला वाणांची लागवड करण्याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती शैलजा नरवडे आपल्या भाषणात म्हणाल्या की, पोषणमूल्य आधारित परसबागेमुळे महिलांसोबत जमिनीचे आरोग्य सुधारते आणि हे पर्यावरण पुरक देखील असल्‍याचे सां‍गुन त्यांच्यासोबत आजमितीला गावातील ५४ महिलांनी स्वतःच्या शेतावर प्रत्येकी एक एकर क्षेत्रामध्ये परसबागेची निर्मिती केली असून त्यामध्ये विविध देशी भाजीपाल्यासोबत, गांडूळशेती, कुक्कुटपालन, अॅझोला आदि गोष्टींचा अंतर्भाव केलेला असल्‍याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख शास्त्रज्ञ श्री. सचिन सूर्यवंशी यांनी तर सुत्रसंचालन श्री.रमेश पेठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती वर्षा मरवाळीकर, डॉ भगवान अरबाड, श्रीमती अपेक्षा कसबे, श्री गणेश मंडलिक, श्री विजयकुमार जाधव,  डॉ श्रीकृष्ण झगडे, श्री. सखाराम मस्के आदीसह कार्यालयातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

मा श्रीमती राहीबाई पोपेर यांचा अल्‍प परिचय
मा श्रीमती राहीबाई पोपेर यांनी मागील 14 वर्षात एकूण 50 देशी वाणांच्या 165 जाती त्यांच्या गावात नैसर्गिक पध्दतीने वाढविल्या आहे, हे काम पैशासाठी न करता समाजाच्या उन्नतीसाठी केले असून हे काम देशभर फिरून गावोगावी करणार असल्‍याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला. त्‍या शाळेची कधीच पायरी न चढता, अशिक्षित असून देखील जे काही शिक्षण मिळाले ते काळया आईच्या सानिध्यातच प्राप्त झाले असुन मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा स्वतःचा नसून काळया मातीचा पुरस्कार आहे, असे ते मानतात. त्यांनी त्यांच्या कार्याची सुरूवात अहमदनगर जिल्हयाच्या छोटयाशा गावातून बचत गटामार्फत करून जिल्हयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

Monday, February 10, 2020

कृषि यांत्रिकीकरणाकरिता शेतकरी, कृषि अभियंता व कृषि अवजार निर्माते यांच्‍यातील समन्‍वय महत्‍वाचा ........ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित कृषि यांत्रिकीकरण दिन साजरा

शेतकामाकरिता शेत मजुरांची कमतरता, वाढती मजुरी यामुळे कृषि यांत्रिकीकरणाची गरज असुन शेतक-यांच्‍या गरजेनुसार मनुष्‍य चलित, बैल चलित व ट्रॅक्टर चलित यंत्राचा वापर वाढवावा लागेल. अल्‍प, मध्‍यम व मोठे भुधारक शेतक-यांची कृषि यंत्राची गरज वेगवेगळी असुन कृषि  यांत्रिकीकरण वाढीसाठी कृषि अभियांत्रिकी संशोधन व निर्मितीत शेतकरी, कृषि अभियंता व कृषि अवजार निर्माते यांच्‍यातील समन्‍वय अत्‍यंत महत्‍वाचा आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प पशुशक्‍तीचा योग्‍य वापर यांच्‍या वतीने कृषि यांत्रिकीकरण दिवसानिमित्‍त सुधारित कृषि अवजारे व अपारंपारिक ऊर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्‍याक्षिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 10 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकातदादा वरपुडकर, प्राचार्य डॉ उद्य खोडके, आयोजक संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, कृषि संशोधनात प्रयोग‍शील शेतक-यांचे योगदान राहिल्‍यास निश्चितच शाश्‍वत कृषि तंत्रज्ञान विकसित होऊ शकते. कृषि यांत्रिकीकरणात विद्यापीठाच्‍या कृषि अभियंताचे भरिव असे योगदान दिले आहे. जास्‍त किंमतीचे कृषि अवजारे  वैयक्तिकरित्‍या शेतकरी खरेदी करू शकत नाहित यासाठी गटशेती किंवा शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन एकत्र येण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.  
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि अभियांत्रिकी विभागाच्‍या वतीने मनुष्‍याचे शेतीतील श्रम व खर्च कमी करण्‍याच्‍या उद्देशाने आजपर्यंत 18 कृषि अवजारांचे प्रसारण केले असुन ही सर्व अवजारे शेतक-यांच्‍या शेतात उपयोगात आहेत. ही यंत्रे जास्‍तीत जास्‍त शेतक-यांना उपलब्‍ध व्‍हावी यासाठी खाजगी कृषी अवजारे निर्मित्‍याच्‍या माध्‍यमातुन कृषि विद्यापीठ प्रयत्‍नशील असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकातदादा वरपुडकर म्हणाले की, पिक उत्‍पादन वाढीच्‍या दृष्‍टीने पेरणी योग्‍य पध्‍दतीने होणे गरजेच असुन पेरणी यंत्राव्‍दारे पेरणी करतांना पिकांच्‍या वाणाच्‍या वाढ गुणधर्माचे ज्ञान शेतक-यांना असणे आवश्‍यक असल्‍याचे सांगुन सुधारित कृषि अवजारांचा वापर करतांना शेतक-यांनी कृषि विद्यापीठाच्‍या कृषि अभियंताशी सातत्‍यांने संवाद साधण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.
कार्यक्रमात कुलसचिव श्री रणजित पाटील, प्रगतशील शेतकरी नामदेव लाखाडे, गोविंद देशमुख, नरेश शिंदे, तुकाराम दहे, पंडित थोरात आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी आयोजित सुधारित कृषि अवजारांचा व यंत्राचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले तसेच सुधारित कृषि अवजारांची माहिती असलेल्‍या योजनेच्‍या वतीने प्रकाशित केलेल्‍या दिनदर्शिकेचे विमोजन करण्‍यात आले.
प्रास्‍ताविकात डॉ स्मिता सोळंकी यांनी विद्यापीठ विकसित विविध कृषी अवजारे व यंत्राची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मधुकर मोरे यांनी केले तर आभार डॉ डि डि टेकाळे यांनी मानले. तांत्रिक सत्रात सुधारित कृषि अवजारांवर डॉ स्मिता सोलंकी, अपारंपारिक ऊर्जा साधनांवर डॉ आर टि रामटेके, सेंद्रीय शेतीवर डॉ आनंद गोरे, रेशीम उद्योगावर डॉ चंद्रकांत लटपटे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी नामदेव लाखाडे, तुकाराम दहे, नरेश शिंदे, पंडित थोरात, रामचंद्र शिंदे, मदन महाराज, गो‍विंद देशमुख आदीसह परभणी, जालना, वाशिम जिल्‍हयातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अजय वाघमारे, डि व्‍ही यंदे, भरत खंटिग, महादेव आव्‍हाड आदीसह कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

Saturday, February 8, 2020

विद्यापीठ विकसीत कृषि औजाराची माननीय माजी मुख्‍यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्‍या कडुन प्रशंसा

परभणी येथे संजिवनी एज्युकेशन सोसायटी, आनंद शिक्षण प्रसारक मंडळ, संजिवनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ते ११ फेब्रुवारी दरम्‍यान राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्‍याचे माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ अशोक ढवण, मा मदार श्री बबणराव लोणीकर, मा मदार सौ मेघणा बोर्डीकर, संयोजक श्री आनंद भरोसे माजी आ. श्री विजयराव गव्हाणे, मा श्री मोहनराव फड दींची प्रमुख उपस्थिती होती.
या कृषि प्रदर्शनीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कृषि यंत्र व शक्ती विभाग कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तर्फे सुधारीत व अद्ययावत शेती अवजारांचे भव्य प्रदर्शन व सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विद्यापीठ विकसीत मनुष्यचलित बैलचलित व टॅक्टरचलित औजाराचे सादरिकरण करण्‍यात आले होते. कोरडवाहू शेतक-यांना उत्पादनावरील खर्च कमी करून यांत्रिकीकरणाव्दारे शेतक-यांचे आर्थिकस्तर उंचवन्याच्या दृष्टीने औजारे विकसीत करण्यात आली असुन त्या मुख्यत्वे एकाच वेळी पाच काम करणारे पाच ओळीचे टॅक्टरचलीत रूंद सरी वरंबा फवारणी व रासणी यंत्र, बैलचलीत १२ नोझालचे सौर फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक प्रकल्प प्रमुख ड स्मिता नटवरलाल सोलंकी यांनी दिले.
या प्रसंगी मा श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या कामाची प्रशंसा करीत शेतीतील यांत्रिकीकरणावर भर देऊन जास्तीत जास्त शेतकामाकरिता यंत्रअवजाराचा वापर वाढला पाहिजे, ही शेती अवजारे निर्मात्यासोबत सामंजस्य करार करून विकसीत अवजारे शेतक-यांपर्यंत पहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
सदरील कृषि प्रदर्शनीतील दालन मांडणीसाठी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. डी. डी. टेकाळे, प्रा. डी. व्ही. पाटील, श्री. अजय वाघमारे, श्री. डी. बी. यंदे, श्री. संजय सदावर्ते, श्री. रणबावळे, श्री. भरत खटींग, श्री. रूपेश काकडे, श्री. आव्हाड, श्री. जीजा शिंदे आदींनी सहभाग घेवुन कार्य केले.

Thursday, February 6, 2020

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाव्‍दारे दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण नुकतेच घेण्‍यात आले. प्रशिक्षणात दर्जेदार अध्यापनासाठी शैक्षणिक मानसशास्त्राचे महत्त्व अध्यापन कौश्‍यल्ये विकसन व त्याची विविध तंत्रे, शालेय वर्ग व्यवस्थापन विद्यार्थ्‍यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे स्थान आदी विषयांवर मानव विकास विभागातील तज्ज्ञ प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. जया बंगाळे व डॉ. वीणा भालेराव यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्राचार्य डॉ जयश्री झेंड यांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्रे प्रदान करण्‍यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ जयश्री झेंड यांनी विद्यार्थ्‍यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्‍याचे सांगितले. या प्रशिक्षणाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थीनीनाही घेतला. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थीं या दोहोंचीही भूमिका महत्त्वाची असल्याने यासंबंधी शिक्षकांना सक्षम करण्याच्‍या दृष्‍टीने हे एकदिवसीय प्रशिक्षण घेण्‍यात आले.

Monday, February 3, 2020

वनामकृवित रेशीम कोष निर्मीतीवर प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व राष्ट्रिय कृषि विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 फेब्रुवारी रोजी  रेशीम कोष निर्मीती व काढणी तंत्रज्ञानया विषयावर एक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजिव बंटेवाड,  पाणी व्यवस्थापण योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक कडाळे, पुर्णा येथील रेशीम कोष मार्केटचे अध्यक्ष डॉ. संजय लोलगे, संशोधन विस्तार केंद्र, केंद्रिय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. ए. जे. कारंडेडॉ. के. के. डाखोरे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, रेशीम शेतीमुळे खेडयात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून रेशीम उद्योगाकडे अनेक शेतकरी वळत आहे. कृषि विद्यापीठाच्‍या रेशीम संशोधन केंद्राच्‍या वतीने रेशीम उत्पादकांना सातत्‍याने प्रशिक्षणाच्‍या माध्यमातून तांत्रीक मार्गदर्शन करण्‍यात येत आहे, याचा निश्चितच लाभ होत आहे.
तांत्रिक सत्रात डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम कोष निर्मीती व काढणी तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्हयातुन मोठया संखेने शेतकरी उपस्थीत होते. सुत्रसंचालन प्रा. चंद्रकांत अडसुळ यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अरूण काकडे,  हरिश्चंद्र ढगे, इंगोले आदीसह विद्यार्थ्‍यींनी परिश्रम घेतले.

Sunday, February 2, 2020

ऊरूसानिमित्‍त वनामकृविच्‍या वतीने संदल


एकात्‍मतेचे प्रतिक असलेला परभणी येथील प्रसिध्‍द हजरत सयद शाह तुराबुल हक यांच्‍या ऊरूसानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचा-यांच्‍या वतीने दि २ फेब्रुवारी रोजी संदल काढण्‍यात आला. संदलचा प्रारंभ शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व कुलसचिव श्री रणजित पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी शेख सलीम, रामसिंग पवार, श्री आडे, शेख मैहमुद, मोईनभाई, युसुफ अली, जाफर अली, कौशाबाई मगर आदीसह विद्यापीठातील कर्मचारी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते. 

Thursday, January 30, 2020

कापूस पिकातील संशोधनाबद्दल विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांना भुवनेश्‍वर येथील ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठात "कापूस पिकाच्या समस्या व उपाययोजना'' यावर दिनांक २२ ते २४ जानेवारी दरम्यान आयोजित राष्ट्रीय परिसंवादात कापूस पिकातील उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल प्राफेशनल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. परिसंवादात ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. आर. के. अग्रवाल व उद्यपुर येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. एन. एस. राठोड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरिल परिसंवादाचे आयोजन कापूस संशोधन व विकास संघटना, हिस्सार आणि भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्यातर्फे करण्यात आले होते.
विद्यापीठाचे कपाशीचे देशी वाण, अमेरिकन सरळ व संकरित वाण विकसीत करण्‍यात डॉ. डी. बी. देवसरकर यांनी कापूस पैदासकार आणि कापूस विशेषज्ञ म्हणून मोलाचे योगदान आहे. यात एनएचएच २०६, एनएचएच २५० व एनएचएच ७१५ हे अमेरिकन संकरित कपाशीचे वाण व एनएच ६१५ व एनएच ६३५ हे अमेरिकन कपाशीचे सरळ वाण मध्य भारतासाठी लागवडीकरिता प्रसारीत करण्यात आले. पीएचए ४६, पीए १८३, पीए ०८, पीए ५२८ व पीए ७४० हे  देशी कापूस वाण प्रसारित करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. बी टी कापूस उत्पादन तंत्रज्ञान, एकात्मीक कीड व रोगांच्या व्यवस्थापनावर संयुक्त संशोधन समिती मार्फत विविध शिफारशी करण्यात मोलाचा सहभाग आहे. या शिफारशी पीक प्रात्यक्षीके, शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शने, कृषि दिंडी इत्यादी माध्यमाद्वारे शेतक-यांपर्यत पोहचविण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्‍यांनी आचार्य व पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून काम केले असुन आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय नियतकालीकात मध्‍ये संशोधनपर व इतर माध्‍यमातुन मराठी लेखांचे लिखान केले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभाग नोंदवून संशोधन लेखांचे सादरीकरण केले.

पाथरी तालुक्‍यातील मौजे वडी येथे शेतकरी मेळावा संपन्‍न

ऊस लागवड ठिबक पध्‍दतीने करण्‍याचा डॉ यु एन आळसे यांचा सल्‍ला
कृषि विभाग, परभणी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक 28 जानेवारी रोजी पाथरी तालुक्‍यातील मौजे वडी येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्री शिवाजीराव कुरे हे होते तर कार्यक्रमास जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे, प्रा एस एस शिंदे, तालुका कृषि अधिकारी श्री व्‍ही ए शिंदे, कृषि अधिकारी श्री नांदे, कृषि पर्यवेक्षक श्री गिराम, श्री चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ यु एन आळसे म्‍हणाले की, यावर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाला असुन जायकवाडी प्रकल्‍पातुन शेतीसाठी चार आवर्तन पाणी सोडण्‍यात येणार आहेत, यामुळे शेतक-यांचा नगदी पिक म्‍हणुन ऊस लागवडीकडे मोठा कल आहे. परंतु शेतकरी बांधवानी ठिबक पध्‍दतीने ऊस लागवड करण्‍याचा सल्‍ला देऊन ठिबक पध्‍दतीने ऊस लागवड केल्‍यास 40 टक्के पाण्‍यात बचत होऊन उत्‍पन्‍नात 20 टक्के वाढ होते, असे ते म्‍हणाले.
जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवणी प्रकल्‍पाबाबत माहिती देऊन शेतक-यांनी या प्रकल्‍पाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले. या प्रकल्‍पात वैयक्तिक लाभाबरोबरच नैसर्गिक साधनसंपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी भरपुर निधी उपलब्‍ध असल्‍याचे सांगितले. यात फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन, शेडनेट, शेती औजारे, पाईप, मोटार आदीसह शेतीपुरक जोडधंदे शेळीपालन व कुक्कटपालन आदींबाबीचा समाविष्‍ठ असल्‍याचे सांगितले. प्रा एस एस शिंदे यांनी विद्यापीठाच्‍या संशोधन, शिक्षण व विस्‍तार शिक्षण कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि अधिकारी श्री नांदे यांनी केले आभार श्री चव्‍हाण यांनी मानले. मेळाव्‍यास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, January 27, 2020

कृषि विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानामुळे आदिवासी शेतक-यांच्‍या जीवनाचा कायापालट.......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

कळमनुरीतील आदिवासी बहुल मौजे वाई येथे शेतकरी मेळावा संपन्‍न

परभणी कृषि विद्यापीठाने आदिवासी उपप्रकल्‍पांतर्गत आदिवासी बहुल मौजे वाई गाव दत्‍तक घेऊन गेल्‍या पाच वर्षापासुन कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करीत आहे, आज या गावातील शेती व शेतक-यांच्‍या जीवनाचा कायापालट झाला असुन गावांतील आदिवासी शेतक-यांच्‍या शेतीतील उत्‍पादन व उत्‍पन्‍नात भरिव अशी वाढ झाली. विशेषत: पाणी व्‍यवस्‍थापनाचे तंत्रज्ञानाच्‍या आधारे सोयाबीन, गहु, हरभरा, हळद, ऊस आदी पिकांच्‍या उत्‍पादनात दुप्‍पटीपेक्षा जास्‍त वाढ झाली. यामुळे आदिवासी शेतक-यांचा सामाजिक व आर्थिक स्‍तर उंचावला आहे, ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पातंर्गत पाणी व्‍यवस्‍थापन योजनेमार्फत आदिवासी उपप्रकल्‍पाच्‍या वतीने हिंगोली जिल्‍हयातील कळमनुरी तालुक्‍यातील वाई गावात दिनांक 26 जानेवारी रोजी आयोजित शेतकरी मेळाव्‍यात ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरसरपंच शकुराव मुकाडे, प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ अशोक कडाळे, संशोधन उपसंचालक डॉ अशोक जाधव, शास्‍त्रज्ञ डॉ गजानन गडादे, श्री राम कडाळे, श्री कैलास कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, प्रकल्‍पापुर्वी गावातील शेतकरी केवळ खरिप हंगामातच पिक लागवड करीत होते तसेच इतर वेळी गावातील वृध्‍द सोडता शेतकरी व युवक मोठया प्रमाणात ऊसतोडीकरिता स्‍थलांतर करत होते. पंरतु प्रकल्‍पातंर्गत गावातील आदिवासी शेतक-यांना आधुनिक ठिंबक व तुषार सिचंन संचाचे वाटप करण्‍यात आले व त्‍याचा शेतकरी बांधवानी कार्यक्षमरित्‍या वापर केला. आज अनेक आदिवासी शेतकरी हळद व ऊस या नगदी पिकांकडे वळाले असुन गाव रोजगाराची वाढ झाली, गावांतुन होणारे ऊसतोडीसाठीचे स्‍थलांतर पुर्णपणे थांबले आहे. ऐवढेच नव्‍हे तर गावातील शेतक-यांचा शेतीकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन पुर्णपणे बदलला आहे. गावातील कच्‍च्‍या घरांची जागी पक्‍क्‍या घरांनी घेतली असुन गावातील मुलामुलींचा शिक्षणातही प्रगती झाल्‍याचे दिसून येत आहे. ऐवढयावरच कृषि विद्यापीठ थांबणार नसुन गावातच शेतीपुरक जोडधंदे व शेतमाल प्रक्रिया उद्योगास चालना देण्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍न करणार असल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले. 
मार्गदर्शनात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर मौजे वाई गांवात परभणी कृषि विद्यापीठाने गेल्‍या पाच वर्षात राबविलेल्‍या कृषि तंत्रज्ञान विस्‍तार कार्यामुळे गावात मोठा बदल झाला असुन कृषि तंत्रज्ञानाची गंगाच गावात अवतरली असे म्‍हणाले.
सरपंच श्री शकुराव मुकाडे आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाच्‍या प्रयत्‍नामुळे आदिवासी शेतक-यांचे जीवन समृध्‍दीकडे वाटचाल करित असून विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व आदिवासी शेतकरी यांचे नात दृढ झाले आहे. तर मनोगतात माजी सरपंच श्री नामदेव लाखाडे म्‍हणाले की, विद्यापीठाने वाटप केलेल्‍या तुषार व ठिबक सिचंन संचामुळे व पाणी व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानामुळे गावातील 180 हेक्‍टर बागायती जमिनीत वाढ होऊन 478 हेक्‍टर जमिन बागायती झाली, विशेषत: ही जमीन खडकाळ व मुरमाड आहे. 
मेळव्‍यात तीन तुषार सिंचन संचाचे तर 16 आदीवासी शेतक-यांना ठिबकच्‍या उपनळयाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्‍यात आले. यावेळी शिवार फेरीच्‍या माध्‍यमातुन दत्‍तक शेतक-यांच्‍या शेतात राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध पिक प्रात्‍यक्षिके व उपक्रमास कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी भेट देऊन शेतक-यांशी मुक्‍त संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ अशोक कडाळे यांनी आदिवासी उपप्रकल्‍पांतर्गत मौजे वाई गावांत राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रकाश पतंगे यांनी केले तर आभार डॉ गजानन गडदे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ के आर कांबळे, डॉ स्मिता सोंळकी, डॉ लक्ष्‍मणराव जावळे, डॉ अनुराधा लाड आदीसह गावातील शेतकरी बांधव व भगिनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुकमार गिराम, प्रभाकर सावंत, देवेंद्र कु-हा, अंजली इंगळे, प्रकाश मोते, कृषी पर्यवेक्षक नंदु वाईकर, कृषि सहाय्यक माधव मोटे आदीसह गावक-यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास गावातील शेतकरी बांधव व भगिनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.