परभणी जिल्हातील पुर्णा तालुक्यातील गोळेगांव येथील ऊस उत्पादकांचा मेळावात प्रतिपादन
ऊस संशोधनात वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ पुढाकार घेणार असून तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातील
सुधारीत ऊस लागवड पध्दतीवर विद्यापीठाच्या वसमत येथील ऊस संशोधन केंद्रात संशोधन
करण्यात येणार असुन मराठवाड्यातील शेतक-यांना उपयुक्त तंत्रज्ञान शिफारस करण्यात
येईल, अशी माहिती कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी दिली.
पुर्णा तालुक्यातील गोळेगांव येथे दि. २५ मे रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय, गोळेगांव ग्रामपंचायत व दैनिक गोदातीर समाचार यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादकांचा मेळावा पार पडला, यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक भाई लक्ष्मणराव गोळेगांवकर, प्रमुख अतिथी म्हणुन विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, पुर्णा कारखान्याचे संचालक गंगाधरराव धवण, शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडाळे, डॉ. यु. एन. आळसे, प्रगतशील शेतकरी गजानन घुंबरे, प्रताप काळे, तालुका कृषि अधिकारी श्री रत्नाकर देशपांडे आदी उपस्थित होते.
कुलगुरु मा डॉ. व्यंकटेश्वरलू पुढे म्हणाले की, पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसाला आता ठिबकाशिवाय पर्याय नसुन ऊसाच्या खत व पाणी नियोजनात सुधारणा होणे गरजेचे आहे. त्यासाठी वसमत येथील ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करण्यात येईल. मराठवाडयातील ऊसाची गुणवता इतर राज्यापेक्षा सर्वाधिक असुन या भागात ऊसावर अधिक संशोधन व्हावे विद्यापीठ पुढाकार घेईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले आपल्या भाषणात म्हणाले की, शेतकरी पूर्णपणे तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाही. शास्त्रज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार पिकांची जोपासणा करत नसल्याने उत्पादनात घट येते. ऊस लावतांना माती परिक्षण करुनच लागवड करावी, खताची मात्रा देतांना विद्यापीठाचा सल्लानुसारचे दया, असा सल्ला त्यांनी दिला.
बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक भाई लक्ष्मणराव गोळेगांवकर आपल्या भाषणात म्हणाले की शेतकरी जगला तरच जग वाचेल, सर्व वस्तुंची किंमत ठरलेली असते मात्र शेतक-यांच्या श्रमाची किंमत त्याला ठरविण्याचा अधिकार नाही. बळीराजा परिवाच्यावतीने बिगर कर्ज असणा-या प्रयोगशील शेतक-याचा पुरस्कार देवुन सन्मान करण्याची घोषणा भाई गोळेगांवकर यांनी केले. तसेच आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांना नौकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण देण्याचाही निर्णय बळीराजा परिवाराने घेतल्याचे भाई लक्ष्मणराव गोळेगांवकर यांनी सांगीतले.
मेळाव्यात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. यु एन आळसे यांनी माती परिक्षणावर मार्गदर्शन करून शेतक-यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली. डॉ. अशोक कडाळे यांनी शेतक-यांशी ऊस लागवडी संदर्भात थेट संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात दैनिक गोदातीरचे संपादक अॅड रमेशराव गोळेगांवकर यांनी मेळाव्याच्या आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. भविष्यात विद्यापीठ आणि शेतकरी यांना एकत्र आणून शेतक-यांच्या मालाला बाजारपेठ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन अंबोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुरेश दुधाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोळेगावचे माजी सरपंच दिलीपराव दुधाटे, उध्दवराव तेलंग, रामराव ढवळे, संभाजीराव भोसले, सखाराम शिंदे आदीसह गांवक-यांनी पुढाकार घेतला. यावेळी विद्यापीठाच्या माती परिक्षण फिरती प्रयोगशाळेमार्फत परिसरातील गांवातील शेतक-यांच्या मातीचे नमुने परिक्षणासाठी जमा करण्यात आले. मेळाव्यास शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.