वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ञांचा सल्ला
मराठवाडा विभागात मोठ्या खंडानंतर झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर 36-48 तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे तज्ञ डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत व श्री.एम.बी.मांडगे यांनी पुढील प्रमाणे आकस्मिक मर व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.
आकस्मिक मर व्यवस्थापन :
शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
लवकरात लवकर 200 ग्रॅम युरिया अधिक 100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50 खत) अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी.
किंवा
एक किलो 13:00:45 अधिक 2 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड 200 लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली आळवणी करावी.
वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती
पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू
लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे 24 ते 48 तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता
येईल.
वनामकृवि संदेश क्रमांक- 02/2025( 27 जुलै 2025)
अधिक माहितीसाठी संपर्क करा : कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
दुरध्वनी क्रमांक 02452-229000, व्हाटस्अप हेल्पलाईन- 8329432097