Wednesday, September 9, 2015

बीटी कापुस व सोयाबीन पिकावर अळयांचा प्रादुर्भाव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी नुकतेच मराठवाड्यातील विविध पिकांच्‍या केलेल्‍या सर्वेक्षणानुसार कपाशीवर ब­याच ठिकाणी हिरवी बोंडअळी व तंबाखुवरील पाने खाणा­या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन ब­याच भागातून सोयाबीन पिकाला शेंगा न लागण्‍याच्‍या अशा तक्रारी येत आहेत. तसेच ज्वारीवर कणसातील अळया, मका, बाजरी इत्यादी पिकांवर देखील हिरव्या बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळून आला.
किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे
पावसाचा मोठा खंड, बदलते हवामान, ढगाळ वातावरण, प्रकाशाचे कमी तास, पर्यायी खाद्य वनस्पतीचा अभाव, बीटी कपाशीची लागवड करते वेळेस सोबतचे नॉन बीटी ची लागवड न करणे तसेच नैसर्गिक मित्रकिडींचा ­हास होणे. एकात्मीक किड व्यवस्थापनाचा अवलंब न करणे आदींचा बाबी आढळून आल्या.
नुकसानीचा प्रकार
या अळया कपाशीचे पाते, कोवळी शेंडे, कळ्या, फुले यावर उपजीवीका करतात व बोंड सडतात लागल्यानंतर त्यामध्ये तोंड खुपसुन आतील भाग खातात, त्यामुळे लहान बोंडे, पाते, फुले, कळ्या गळून पडतात किंवा झाडावरच्या अळ्यांनी केलेल्या छिद्रामधून पाणी जाऊन जिवाणू व बुरशीची वाढ होऊन बोंडे सडतात. तसेच बीटी तंत्रज्ञान हे मुख्यता बोंडअळयासाठीच विकसीत केलेले असले तरीही पोषक वातावरण असल्यास बीटी कपाशीवर देखील बोंडअळयाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच या अळया सोयाबीनची फुले, कळया, शेंगा खाऊन फस्त करत आहेत. त्यामुळे झाडाला फुले किंवा शेगा न लागल्या सारख्या तक्रारी येत आहेत. या अळया झाडाच्या मुख्य खोडावर तसेच फांद्यावरील फुले, शेंगा खात आहेत. विशेषत: स्पोडोप्टेराच्या अळया दिवसा जमिनीवर किंवा पानाखाली लपून राहतात. 
हिरवी बोंडअळी व तंबाखुवरील पानेखाणा­या अळीच्या व्यवस्थापनासाठी पुढील उपाय योजना कराव्‍यात
1. शेतामध्ये प्रती हेक्टरी पाच कांमगंध सापळे या प्रमाणात लावावेत.
2. जैविक कीटकनाशके एसएलएनपीव्ही (तंबाखुवरील पाणे खाणा­या अळीसाठी) एचअेएनपीव्ही (अमेरीकन बोंडअळीसाठी) 250 एल ई 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात अळया लहान असताना फवारणी करावी.
3. जर प्रादुर्भाव 5 टक्यापेक्षा जास्त असल्यास रासायनिक किटकनाशकामध्ये लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 8 मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट 5 एस जी 4 ग्रॅम किंवा इन्डोक्झाकार्ब 14.5 एससी 10 मिली किंवा स्पिनोसॅड 45 एससी 4 मिली किंवा नोव्हाल्युरॉन 10 ईसी 20 मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी 2.5 मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली यापैकी एक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेट्रोलपंपासाठी वरील किटकनाशकाची मात्रा तीन पट वापरावी. त्याच बरोबर भविष्यात तुरीवर देखील फुलोरा अवस्थेत या अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
            अशाप्रकारे कपाशीवरील बोंडअळी व तंबाकूवरील पाने खाणा­या अळीचे वेळीच व्यवस्थापन करुन संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर व डॉ. ए. जी. बडगुजर यांनी केले आहे.