वनामकृवित
सुधारित शेती अवजारे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
विविध शेती
कामासाठी बैलशक्तीचा वापर करण्यात येतो, परंतु बैलशक्तीचा पुरेपूर वापर होत
नसल्यामुळे त्यांचे संगोपन करणे परवडत नाही अशी शेतकऱ्यांची धारणा होत आहे.
त्यासाठी शेतीत पशुशक्तीचा योग्यरीत्या वापर होणे गरजेचे असल्याचे मत प्रतिपादन भोपाळ
येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील प्रकल्प समन्वयक डॉ. एम. दिन यांनी
व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वयीत पशू शक्तीचा योग्य वापर या
संशोधन प्रकल्पाद्वारे मराठवाड्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी निवडलेल्या शेतकऱ्यासाठी
सुधारित शेती अवजारे वाटप आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ जुन रोजी करण्यात
आले, कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू हे होते तर व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद
वासकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बालासाहेब भोसले,
सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बालाजी नांदेडे, संशोधन
अभियंता प्रा. स्मिता सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. डॉ. एम. दिन पुढे म्हणाले की, बैल जोपासल्यामुळे त्यांचा
शेतकामासाठी वापर करण्याबरोबरच शेणखताचाही शेतीसाठी मोठा फायदा होतो. याप्रसंगी मा.
डॉ. एम. दिन यांनी विद्यापीठ अंतर्गत सुरु असलेल्या पशू शक्तीचा योग्य वापर या
संशोधन प्रकल्पाच्या कामाचे कौतुक केले. कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले
की, शेतकऱ्यानी विद्यापीठाने दिलेली सुधारित शेती अवजारे आपल्या शेतात वापरावीत,
वापर करतांना काही अडचणी असल्यास विद्यापीठ शास्त्रज्ञांशी संपर्क करावा. सदरिल सुधारित
शेती अवजारांचा शेतीत अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना
केले. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोळंकी यांनी
केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.
दयानंद टेकाळे यांनी केले. कार्यक्रमात ‘पीक उत्पादन वाढीसाठी सुधारील बैलचलित शेती
अवजारे’ या घडी पत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रकल्पाच्या
वतीने बालाजी पांचाळ, रोहित स्टील पुणेचे प्रतिनिधी विठ्ठल फाळके, समद इंजिनिरीग
परभणी या अवजारे निर्मात्यांचा सत्कार करण्यात आला. खामगाव (बीड), औरंगाबाद,
खरपुडी (जालना), सगरोळी (नांदेड), तुळजापूर (उस्मानाबाद), लातूर, तोंडापूर (हिंगोली)
येथील कृषी विज्ञान केंद्रांनी निवडलेल्या शेतकरी गटांना मान्यवरांच्या हस्ते
सुधारित शेती अवजारांचे वाटप करण्यात आले. तांत्रिक सत्रात शेतक-यांना बैल चलित
सुधारित अवजारांविषयी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास
विद्यापीठातील विविध संशोधन योजनांचे प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक, कृषी विज्ञान
केंद्रांतील विषयतज्ञ आणि मराठवाड्यातील सुमारे १५० शेतकरी उपस्थीत होते. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी प्रा. राहुल रामटेके, प्रा. पंडित मुंडे, अजय वाघमारे, वडमारे, यंदे,
काकडे, आव्हाड, माने, रणबावळे, खटिंग, शिंदे, होले आदीसह पदव्युत्तर
विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.