Wednesday, January 18, 2017

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये ‘देशी कापूस पुनरूज्जीवन’ बाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्‍न

देशी कपाशीचे बिजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेणे आवश्यक......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू


कोरडवाहू लागवडीमध्ये कापसाचे किफायतीशीर उत्पन्न मिळण्यासाठी देशी कापसाची लागवड करणे आवश्यक आहे. देशातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान २० टक्के क्षेत्रावर देशी कापसाची लागवड होणे आवश्यक असुन त्याकरीता विभागनिहाय योग्य वाणांची निवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन हाती घ्‍यावे लागेल, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये देशी कापूस पुनरूज्जीवन बाबत एकदिवसीय कार्यशाळेचे दि. १६ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेत हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास राव, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे डॉ. ब्लेझ डीसूझा, बेंगलुरू येथील सहज समृद्धी स्वयंसेवी संस्थेचे श्री कृष्णा प्रसाद, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल. ए. देशपांडे व डॉ. ए. एस. अनसिंगकर, खांडवा येथील प्रमुख कापूस शास्त्रज्ञ डॉ. शास्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास राव यांनी कोरडवाहू लागवडीमध्ये लांब धाग्याचा देशी कापूस अधिक फायदेशीर ठरेल असे मत व्‍यक्‍त केले तर कपाशीच्‍या नविन विकसित वाणांचे धाग्याचे गुणधर्म अमेरिकन कपाशीच्या तोडीचे असल्यामुळे या वाणांची लागवड कर्नाटक व तामिळनाडू राज्यांमध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे श्री. कृष्णा प्रसाद यांनी सांगितले. देशी कापसाच्या वाणांचे बिजोत्पादन करण्यासाठी विद्यापीठ प्रक्षेत्र तथा बिजोत्पादक कंपन्यांशी सामंजस्य करार करून अधिक प्रमाणात बियाणे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे संचालक संशोधन डॉ. वासकर यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी कार्यशाळेच्या आयोजनाविषयीची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले. कार्यशाळेत देशी (गावराण) कापूस लागवडीविषयी असणा-या शेतक-यांच्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि देशामध्ये देशी कापसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी दिशा याबाबत चर्चा करण्यात येऊन भविष्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात आला. कापूस संशोधन केंद्राच्या कपाशीच्‍या विविध देशी वाणांच्‍या प्रक्षेत्रास सहभागी शेतकरी व शास्त्रज्ञांनी भेट दिली. प्रक्षेत्रावर विद्यापीठ विकसीत विविध वाण हे धाग्याचे गुणधर्म व उत्पादकता याबाबत सरस असल्याचे आढळून असुन हे वाण विविध राज्यांतील देशी कापूस लागवड करणा-या शेतक-यांना उपलब्ध करून देण्याची मागणीही सहभागी शेतक-यांनी यावेळी केली. देशी कापसाच्या धाग्याचे गुणधर्मामध्ये प्रदीर्घ संशोधन व अथक परिश्रमाने अमुलाग्र बदल घडविणा-या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे माजी कापूस विशेषज्ञ डॉ. एल. ए. देशपांडे व डॉ. ए. एस. अनसिंगकर यांचा विशेष सत्कार यावेळी मा. कुलगुरू यांचे हस्ते करण्यात आला.

तांत्रिक सत्रात विद्यापीठ विकसीत विविध देशी कापसाचे वाण व त्यांची लागवड याबाबत कापूस संशोधन केंद्राचे प्रा. अरविंद पांडागळे, इतर राज्यातील वाणांबाबत नागपूर येथील डॉ. ब्लेझ आणि देशी कापसातील कीड व्यवस्थापन याबाबत डॉ. शिवाजी तेलंग यांनी विस्तृत माहिती दिली. कार्यशाळेत कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल आदी राज्यांतील तसेच राज्‍यातील नांदेड, परभणी, यवतमाळ, अकोला, औरंगाबाद, नंदुरबार आदी जिल्ह्यातील शास्त्रज्ञ, कृषि विस्तारक व देशी कापूस उत्पादक शेतकरी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.