Saturday, July 7, 2018

औरंगाबाद येथे स्‍वयंचलित हवामान केंद्राच्‍या कृषी विज्ञान केंद्राच्‍या नोडल अधिका-यांचे प्रशिक्षण संपन्‍न

औरंगाबादः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषी संशोधन प्रकल्‍पाच्‍या सभागृहात महाराष्‍ट्रासह गुजरात व गोवा राज्‍यांतील कृषी विज्ञान केंद्रात बसविल्‍या जाणा-या स्‍वयंचलित हवामान केंद्राच्‍या नोडल अधिका-यांचा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 6 व 7 जुलै रोजी संपन्‍न झाली. कार्यशाळेत अटारी पुणेचे संचालक डॉ लखनसिंग, भारतीय हवामान विभाग, पुणेचे प्रमुख डॉ आर ए चटोपध्‍याय, डॉ के घोष, डॉ आर बाला सुब्रमण्‍यम, वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, ग्रामीण कृषी मौसम सेवेचे डॉ कैलास डाखोरे आदींनी मार्गदर्शन केले. ग्रामीण कृषी संदेश प्रणालीच्‍या माध्‍यमातुन अचुक संदेश येत्‍या काळात शेतक-यांपर्यंत पोचविण्‍याचा निश्चिय करण्‍यात आला. प्रशिक्षणात विभाग स्‍तरावरून होत असलेली प्रचलित कृषी हवामान संदेश प्रणाली सेवा व त्‍यासंबंधी नोंदी, कृषी हवामान संदेशाव्‍दारे हवामान अंदाज, दैनिक हवामान माहिती, हवामान अंदाज, पिकांची अवस्‍था, स्थिती व विविध पीक निगडीत माहितीच्‍या आधारे कृषी हवामान संदेश तयार करणे, कृषी हवामान संदेश प्रसारण, भारतीय हवामान विभाग व संबंधित संकेतस्‍थळ हाताळणी आदी विषयी नोडल अधिका-यांना माहिती देण्‍यात आली. गुजरात मधील नऊ, गोव्‍यातील दोन तर महाराष्‍ट्रातील दहा असे एकुण 21 नोडल अधिका-यांचे प्रशिक्षणात सहभाग होता. मराठवाडयातुन निवड झालेल्‍या औरंगाबाद व उस्‍मानाबाद कृषि विज्ञान केंद्राचे नोडल अधिकारी यामध्‍ये सहभागी झाले होते. सुत्रसंचालन डॉ अनिता जिंतुरकर यांनी केले तर आभार डॉ किशोर झाडे यांनी मानले. प्रशिक्षण यशस्‍वीतेसाठी औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राच्‍या कार्यक्रम समन्‍वयक प्रा दिप्‍ती पाटगांवकर, प्रा गीता यादव, डॉ दर्शना भुजबळ, हनुमंत देवठाणकर, मंगला कडाळे, किशोर शेरे, कैलास सुदेवाड, लक्ष्‍मण शिंदे, जयदेव सिंगल, जमीर शेख आदींनी परिश्रम घेतले.