Sunday, July 8, 2018

देशातील पहिल्‍या जैवसमृध्‍द खरीप ज्वारीच्‍या परभणी शक्‍ती या वाणाचे हैद्राबाद येथे प्रसारण

लोह व जस्ताचे अधिकतम प्रमाण असणारा जैवसमृध्द परभणी शक्ती खरीप ज्वारीचा वाण

परभणी येथील वनामकृविच्‍या ज्‍वार संशोधनातील मोठी उपलब्‍धी


परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय अर्धकोरडवाहु ऊष्‍णकटिबंधीय पीक संशोधन संस्‍था (इक्रीसॅट) यांच्या संशोधन सहभागातुन परभणी शक्ती या लोह आणि जस्ताचे अधिकतम प्रमाण असणाऱ्या खरीप ज्वारीचा जैवसमृध्द वाण वि‍कसित करण्‍यात आला असुन देशातील हा ज्‍वारीचा पहिला वाण ठरला आहे. सदरिल वाणाचे दिनांक 5 जुलै रोजी इक्रीसॅट हैद्राबाद येथे समारंभपुर्वक प्रसारण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण आणि इक्रीसॅटचे महासंचालक मा. डॉ. पीटर कारबेरी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपमहासंचालक डॉ. किरण शर्मा, संशोधन संचालक डॉ. पी. एम. गौर, ज्वार पैदासकार डॉ. शिवाजी म्हेत्रे, डॉ. अशोक कुमार आदींसह विद्यापीठातील विविध पिकांचे पैदासकार उपस्थित होते.
देशातील खरीप ज्वारीच्या या पहिल्याच जैवसमृध्द वाणामध्ये लोह व जस्ताचे अधिक प्रमाण असल्यामुळे मानवी जीवनावर व आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. विशेषत: देशात व जगातही शरिरातील रक्‍तातील लोहाच्‍या कमरतेमुळे अनेक व्‍यक्‍तींमध्‍ये रक्‍तक्षय मोठया प्रमाणात आढळतो, यासाठी हा वाण अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार आहे. या वाणाची वैशिष्टये म्हणजे यात लोह व जस्‍ताचे प्रमाण अधिकतम आहे, यात लोह प्रती किलो 44 ते 46 मिलीग्रॅम तर जस्त प्रती किलो 32 ते 33 मिलीग्रॅम असुन भाकरीची प्रत चांगली आहे. तसेच कडबाही उच्‍च प्रतीचा असुन उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी ज्वारीचे 36 ते 38 क्विंटल व कडब्याचे उत्पादन 105 ते 110 क्विंटल आहे. हा वाण खोडमाशी, खोडकीड व काळया बुरशी रोगास प्रतिकारकक्षम आहे.
इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. पीटर कारबेरी यांनी आपल्‍या मनोगतात इक्रिसॅट येथील शास्त्रज्ञांचे तसेच कुलगुरु डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. शिवाजी म्हेत्रे आदीसह ज्वार संशोधन केंद्र येथील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलेआपल्‍या मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. ढवण यांनी परभणी शक्ती (पीव्हीके 1009) हा वाण महिला व लहान मुलांमधील कुपोषण दुर करण्यास अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार असल्‍याचे सांगुन या वाणाचे विद्यापीठ प्रक्षेत्रावर मोठया प्रमाणावर बीजोत्पादन करुन लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे विषद केले. डॉ. वासकर यांनी परभणी शक्ती वाणाचा शेतक­ऱ्यांमध्ये प्रसार करुन जास्‍त प्रमाणातील लोह व जस्ताचा फायदा लक्षात घेता बचत गटांच्या माध्यमातुन मुल्यवर्धीत पदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय करण्याबद्दल चालना देणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील मौजे मानोलीचे प्रगतशील श्री. मदन महाराज शिंदे, सौ. सुनंदाताई शिंदे, श्री. गणेश घाडगे, सौ. अहिल्याबाई शिंदे आदींनी प्रातिनिधीक स्वरुपात सादरीकरणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला व त्‍यांनी त्‍याच्‍या शेतावर घेतलेल्‍या परभणी शक्ती या वाणाच्‍या  प्रात्‍यक्षिकाबाबतचा अनुभव सांगुन शास्त्रज्ञांचे आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते शेतक­ऱ्यांना परभणी शक्ती या वाणाच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.