दिनांक 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान वनामकृवि अतंर्गत असलेल्या औरंगाबाद येथील कृषि
विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालय परिसरात क्षेत्रीय पिक प्रात्यक्षिक व
प्रदर्शनीचे आयोजन
औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाअॅग्रो
यांच्या माध्यमातून दिनांक 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान औरंगाबाद येथील पैठण
रोड वरील कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालय परिसरात कृषि प्रदर्शन, क्षेत्रीय पीक
प्रात्यक्षिक आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक 1 फेब्रुवारी
रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभाचे अध्यक्ष मा ना श्री हरिभाऊजी बागडे यांच्या हस्ते
उदघाटन झाले. व्यासपीठावर कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, औरंगाबाद मनपाचे महापौर मा. श्री नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा मा अॅड देवयाणीताई
डोणगांवकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद
सदस्य तथा आमदार मा. श्री सतिशभाऊ चव्हाण, मराठवाडा विकास वैधानिक मंडळाचे अध्यक्ष श्री भागवत कराड, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगाले, प्रगतशील शेतरकरी श्री विजयअण्णा बोराडे, महाअॅग्रोचे मुख्य समन्वयक अॅड वसंतराव देशमुख, संशोधन सहसंचालक डॉ सुर्यकांत पवार, प्राचार्य डॉ किरण जाधव, प्रा सौ दिप्ती पाटगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात विधानसभेचे अध्यक्ष मा ना. श्री हरिभाऊ बागडे म्हणाले की, मराठवाडयात मागील कित्येक वर्षापासून
पाऊस हा कमी-अधिक प्रमाणात पडत असुन भुगर्भातील पाण्याचा होणारा उपसा चिंताजनक आहे. शेतीमध्ये पाण्याचा
कार्यक्षम वापर करावा लागेल. दिवसेंदिवस जमिनीचे भाऊ हिस्से वाढत आहे, शेतक-यांचे जमिनधारण क्षेत्र कमीकमी होत आहे. आधुनिक
तंत्रज्ञानाच्या आधारे कमी क्षेत्रावरही शेतीत चांगले उत्पादन घेऊ शकतो. शेतक-यांनी
विविध पिक पध्दतीचा अवलंब
करून नवनवीन प्रयोग आपल्या शेतीत करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
कुलगुरु मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, कृषि प्रदर्शन हे कृषि तंत्रज्ञान प्रसाराचे
मोठे माध्यम आहे, या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान
प्रभावीरित्या शेतक-यांसमोर मांडता येते. प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्या विविध पिक प्रात्यक्षिक हे शेतकरी
बांधवासाठी दिशादर्शक ठरतात. चर्चासत्रातुन कृषि शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यामध्ये
सुसंवाद साधता येतो. बदलत्या हवामानामुळे शेती प्रश्न उग्ररुप धारण
करीत असुन बदलत्या हवामानास अनुकूल विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा शेतकरी
बांधवानी अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
श्री विजयआण्णा बोराडे यांनी कृषि प्रदर्शन आणि चर्चासत्राच्या माध्यमातुन
शेतकरी बांधव एकत्र येवून तंत्रज्ञान देवाण-घेवाण करण्याची संधी मिळते, असे
प्रतिपादन केले. प्रास्ताविकात अॅड वसंतराव देशमूख यांनी कुलगुरु मा. डॉ अशोक ढवण व कृषि विद्यापीठाच्या
सर्वच घटकांनी दिलेले सहकार्यामुळे क्षेत्रीय पिक प्रात्यक्षिक यशस्वीरित्या घेण्यात
येऊन याचा निश्चितच लाभ शेतक-यांना होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात मराठवाडयातील विविध
पिकांमध्ये विक्रमी उत्पादन घेणा-यां शेतक-यांचा मान्यवरांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची आखणी श्री
प्रकाशजी उगले यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री साठे यांनी केले
तर आभार डॉ किरण जाधव यांनी मानले. चार दिवस चालणा-या कार्यक्रमात कृषि
विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालय परिसरात विद्यापीठ व खाजगी कंपन्या विकसित
विविध पिकांचे वाणांचे व तंत्रज्ञानाचे क्षेत्रीय पिक प्रात्यक्षिक घेण्यात आले
असुन शेतकरी बचत गट निर्मित विविध पदार्थ विक्रीची दालनाचा समावेश प्रदर्शनीत आहे.
कार्यक्रमास मराठवाडयातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
सौजन्य
श्री रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषि
विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद