शिक्षणाने ज्ञान प्राप्त करता येते, परंतु अनुभवातुनच मनुष्य जीवनात यशस्वी होतो. आज सरकारी नौकरीत फारच कमी प्रमाणात संधी उपलब्ध असुन कृषि पदवीधरांनी नौकरीच्या मागे न लागता, स्वत :चा व्यवसाय सुरू करून कृषि उद्योजक व्हावे, असा सल्ला हैद्राबाद येथील भवानी अॅग्रोवेट कंपनी संचालक तथा परभणी कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यी यशस्वी उद्योजक श्री विजय भंडारे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या वतीने शिवजयंती उत्सवनिमित्त दिनांक 14 फेब्रुवारी रोजी आयोजित कृषि पदवीधर ते यशस्वी व्यावसायीक याविषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, सौ संजीवणी विजय भंडारे, विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे, डॉ पी आर झंवर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश थिटे, उपाध्यक्ष आकाश चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योजक श्री विजय भंडारे पुढे म्हणाले की, कृषि उद्योजक जगतात कृषि पदवीधरांना अनेक संधी आहेत. युवकांना पारंपारिक विचारसरणीच्या बाहेर पडुन विचार करावा लागेल. देशातील लोकांची जसजसी क्रयशक्ती वाढत आहे, आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढत असुस प्रथिनयुक्त आहारास मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, त्यामुळे पोट्री उद्योग, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय आदी व्यवसायास मोठा वाव आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारे कौशल्य प्रत्येकातच असते, परंतु त्याची ओळख आपणास नसते. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथमत: डोळसपणे स्वप्न पाहण्याची गरज असते, त्यास धाडस, योग्य दिशा, कामाप्रती संपुर्ण समर्पण व शिस्त याची जोड पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने देशाला व राज्याला अनेक अधिकारी, प्रशासक, शास्त्रज्ञ दिले, आज गरज आहे ती कृषि उद्योजक घडविण्याची. कृषि पदवीधरांतील उद्योजकता वाढीसाठी नुकताच कृषि विद्यापीठात पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारसीनुसार अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कृषि क्षेत्रात आज अनेक व्यावसायिक संधी आहेत, गरज आहे ती ओळखण्याची. कोणत्याही व्यवसायात जोखीम असतेच यशस्वी होण्यासाठी चिकाटीसह प्रामाणिकपणे व अविरत मेहनतीची तयारी पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
ग्रामीण भागातील सामान्य कुटुबांत जन्मलेले श्री विजय भंडारे हे परभणी कृषि महाविद्यालयाचे पदवीधर असुन खासगी क्षेत्रात विविध कंपन्यामध्ये कार्य केल्यानंतर स्वत:चा पशुखाद्याची भवानी अॅग्रोवेट नावाने कंपनी हैद्राबाद येथे स्थापन केली. आज त्यांचा व्यवसायाने मोठी झेप घेतली असुन त्यांना एक यशस्वी उद्योजक म्हणुन ओळखले जाते, अशी माहिती प्रास्ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी दिली. सुत्रसंचालन संतोष घ्यार यांनी केले तर आभार ऋषिकेश बोधवड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समितीचे विशाल राख, विठ्ठल शिंगटे आदीसह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.