वनामकृवित आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक ११ जानेवारी रोजी ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’ याविषयावर महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष मा श्री अविनाश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन जिजाऊ मुलींचे वसतीगृहात करण्यात आले होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शाहु महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विठ्रठल घुले, मुख्य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम, डॉ सुनील जाधव, डॉ जयश्री एकाळे, प्रा विजयकुमार जाधव, डॉ पपिता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा श्री अविनाश पाटील म्हणाले की, समाजातील अनिष्ट प्रथा व अंधश्रध्दा नष्ट होणे आवश्यक असुन विज्ञानवादी विचार पुढे नेला पाहिजे. समाजातील अंधश्रध्दा निर्मुलनाचे कार्य महिलाच करू शकतात. पुरूषाप्रधान संस्कृतीत महिलांवर अनेक निर्णय लादले जातात. कोणत्याही घडलेल्या घटनेकडे वैज्ञानिकदृष्टीने पाहिले पाहिजे, घटनेमागील कार्यकारणभाव समजुन घेतला पाहिजे. महाविद्यालयीन जीवनातच सदसदविवेक बुध्दीचा वापर करूनच निर्णय घेण्याची सवय लावा.
शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी भाषणात विद्यार्थ्यांनी जीवनात अंधश्रध्देला थारा न देता, आधुनिकतेची कास धरली पाहिजे असे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जयश्री एकाळे यांनी केले. सुत्रसंचलन सुवर्णा चौधरी हिने केले तर आभार शुभांगी आवटे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ स्वाती झाडे, डॉ मिनाक्षी पाटील, डॉ वैशाली भगत, डॉ गोदावरी पवार आदीसह वसतीगृहाच्या कर्मचारी व विद्यार्थ्यींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यींनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.