पर्यावरणीय बदल व पर्यावरणाचे होत असलेले प्रदुषण मोठया प्रमाणात होत असुन याबाबत जनजागृती करून पर्यावरणाचे वाढते प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीकोनातुन मोहिम स्वरूपात काम करण्याकरिता परभणी पर्यावरण रक्षम ही मोहिम राज्यसभा सदस्या खासदार मा डॉ फौजिया खान यांच्या पुढाकारातुन कास्मोपोलीटन एज्युकेशनल अॅन्ड वेल्फेअर सोसायटी परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असुन सदर मोहिमेंतर्गत दिनांक १९ एप्रिल रोजी जिल्हयातील शालेय शिक्षकांच्या कार्यशाळेचे आयोजन परभणी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.
कार्यशाळाचे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते तर उदघाटक म्हणुन खासदार मा डॉ फौजिया खान या होत्या. व्यासपीठावर शिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारे, माजी वन अधिकारी श्री तहसिन अहमद खान, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उपविभागीय अधिकारी श्री एस आर कुलकर्णी, निवृत्त उपजिल्हाधिकारी श्री विश्वंभर गावंडे, गट शिक्षणाधिकारी श्री नरवडे, श्री मोहित जाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, आपणासमोर अन्न सुरक्षा, जल सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षेचे आव्हान असुन हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. शेतकरी बांधवांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत असुन विद्यापीठ बदलत्या हवामानास अनूकुल कृषि तंत्रज्ञान विकसित करीत आहे. पर्यावरणातील प्रदुषण रोखण्याची जबाबदारी सर्वांची असुन पर्यावरण सुरक्षित परभणी मोहिमेत शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. शिक्षकांच्या माध्यमातुन विद्यार्थी या मोहिमेत मोठे योगदान देऊ शकतात असे मत व्यक्त करून परभणी कृषि विद्यापीठ या मोहिमे आपले सक्रीय सहभागी घेईल असे आश्वासन दिले.
मार्गदर्शनात खासदार मा डॉ फौजिया खान म्हणाल्या की, परभणी जिल्हयात धुळीमुळे होत असलेले तसेच पाण्याचे होत असलेले प्रदुषण अत्यंत घातक आहे. त्यास आळा घालणे आवश्यक असुन याकरिता विविध पातळीवर मोहिम स्वरूपात काम करावे लागेल. मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. यात सर्व घटकात शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घ्यावा, या मोहिमेचे मुल्यांकन केले जाईल व त्यातुन चांगल्या शिक्षकांचा गौरव करण्यात येतील असे जाहिर केले.
श्री विठ्ठल भुसारे यांनी सर्व शिक्षकांचा या मोहिमेत सक्रीय सहभाग राहील व त्याची सुरूवात एक विद्यार्थी एक झाड लावण्याचा व ते वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री विश्वंभर गावंडे यांनी विविध मार्गाने हवा, पाणी, ध्वनी व वातावरणीय प्रदुषणावर नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे सांगुन कार्यशाळेचे आयोजनाचा उद्देश विषद केला. कार्यक्रमात मोहित जाने यांनी मोहिमेतील घटक व मोहिमेचा कालबध्द कार्यक्रम सांगुन याकरिती संगणकीय प्रणालीची संक्षिप्त माहीती दिली तर प्रदुषण मंडळाचे श्री एस आर कुलकर्णी यांनी प्रदुषक कमी करण्याचे उपाय सांगितले. कार्यक्रमाचे आभार श्री जावेद यांनी मानले. कार्यशाळेस जिल्हयातील सातवी, आठवी व नववी वर्गाचे शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी या मोहिमेमुळे परभणी जिल्हयात पर्यावरण पुरक वातावरण निर्माण होईल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे. परभणी जिल्हयात पर्यावरण रक्षम ही मोहिम जुन ते डिसेंबर कालावधीत राबविण्यात येणार असुन मोहिमेत शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.