वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित निरोप समांरभात प्रतिपादन
जीवनात अनेक संकटे येतात, संकटांना तोंड देतांना व्यक्तीचे व्यक्तीमत्व घडत असते. महाविद्यालयीन जीवन हे व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा काळ असतो. जीवनात अनेक संधी येतात, त्या संधीना ओळखुन संधीचे सोने केले पाहिजे. कठोर परिश्रम व दृढ आत्मविश्वास हेच यशाचे गमक आहे. परभणी कृषि विद्यापीठाने देशाला व राज्याला अनेक अधिकारी दिले असुन राज्यात आज उच्च पदावर कृषि पदवीधर कार्य करित आहेत. कृषि पदवीधरांनी कोणत्याही क्षेत्रात कार्य करतांना प्रामाणिकपणे समाजाकरिता कार्य केले पाहिजे. येणा-या काळात विद्यापीठ विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याकरिता प्रयत्न करित असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे दिनांक २५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, जिमखाना उपाध्यक्ष डॉ पी आर झंवर, शिक्षण प्रभारी डॉ आर व्ही चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ आर जी भाग्यवंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातुन येतात, कठिन परिश्रम घेऊन स्पर्धा परिक्षेची तयार करतात आणि विविध पदावर त्यांची निवड होते. विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे ही ग्रामीण भागातुन शिक्षण घेऊन कठिन परिश्रमाच्या आधारे उच्च पदावर पोहचले असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविकात डॉ सय्यद ईस्माईल म्हणाले की, कृषि पदवीधरांनी कोणत्याही क्षेत्रात काम करतांना भ्रष्टाचारापासुन दुर राहीले पाहिजे.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी शुशांत धनवडे व ऋषिकेश बोधवड यांची
कृषि उपसंचालक म्हणुन निवड झाल्याबद्दल तर प्रविण पुरी व विजय मुनगीलवार यांची तालुका कृषि
अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल तसेच प्रज्ञाशिल वाघमारे यांची विक्री कर निरीक्षक म्हणुन
निवड झाल्याबद्दल माननीय कुलगुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला प्रकार सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन पदवीच्या सहाव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमास
महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.