Friday, May 10, 2024

वनामकृविचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमांतर्गत केहाळ येथील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत' हा उपक्रम नियमित राबविण्यात येतो. यामध्ये विविध संशोधन केंद्र, महाविद्यालये व विस्तार केंद्र यांच्या शास्त्रज्ञांचे समूह त्यांच्या परिक्षेत्रातील गावामध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या सोबत एक दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, मेळावे, मार्गदर्शन कार्यक्रम असे उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार दि. ९ मे रोजी विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी तर्फे या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठाच्या विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या १९ चमूने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये विविध गावांना जावून मार्गदर्शन केले. या मध्ये मौजे केहाळ ता.जिंतूर जि.परभणी येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री.मधुकरराव घुगे यांच्या शेतात मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम संपन्न झाला. उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेतील परडू विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञ डॉ.धर्मेंद्र सारस्वत हे लाभले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.धर्मराज गोखले, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.प्रशांत देशमुख, माजी विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.उध्दव आळसे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे, सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रवीण कापसे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ.दिगंबर पटाईत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री.मधुकर मांडगे, मंडळ कृषि अधिकारी श्री. किशोर शेळके यांची उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री मधुकर घुगे व त्यांचे बंधू श्री पद्माकर घुगे यांच्या शेतातील उन्हाळी भुईमूगाच्या विविध वाणांच्या बीजोत्पादन प्रक्षेत्रास भेट देऊन मा. कुलगुरू व इतर शास्त्रज्ञांनी पाहणी करून माहिती घेतली व पिकाच्या नियोजनाबाबत घुगे बंधूंचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमामुळे विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील नाते अधिक घट्ट होत आहे असे नमूद करून शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणानुसार विविध पिकांचे नियोजन करावे आणि कृषि आधारित जोडधंद्यामध्ये दुग्ध व्यवसाय व रेशीम शेती वर अधिक भर देण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमाबद्दलही माहिती दिली आणि विद्यापीठातर्फे शेतकरी प्रथम हे ध्येय पुढे ठेवून, यापुढील काळात कमी वेळात जास्तीत जास्त संशोधन व इतर कार्यक्रम शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येतील असे सांगितले. तसेच येणाऱ्या १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित खरीप शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांना आवर्जून येण्याची विनंती केली.

प्रमुख पाहुणे डॉ.धर्मेंद्र सारस्वत यांनी त्यांचे अमेरिकेतील भुईमूग पिकांबाबतचे अनुभव, अमेरिका व भारतातील शेती, वातावरण, पिके यातील फरक व तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन केले. भारतीय वातावरणात वर्षभर विविध पिकांची लागवड करता येते, परंतु अमेरिकेमध्ये वर्षभरात फक्त एकच हंगाम पिकांच्या लागवडीकरिता मिळतो त्यामुळे तिथे पिकांची विविधता आढळून येत नाही, यामुळे भारतीय शेतकरी भाग्यवान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रम प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ.धर्मराज गोखले यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रमाविषयी माहिती देऊन या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांची सोडवणूक विद्यापीठातील शास्त्रज्ञांमार्फत केल्या जाईल असे सांगितले आणि त्यांनी भुईमूग पिकाबद्दल तसेच विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन, हरभरा, तूर व ज्वारी पिकाच्या नवीन विविध वाणांची तसेच विद्यापीठाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिगंबर पटाईत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.गजानन गडदे यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्या मांडल्या. यामध्ये सोयाबीन पिकातील चक्रीभुंगा व खोडमाशी, चारकोल रॉट रोग व्यवस्थापन, हुमणी कीड व्यवस्थापन, तुर पिकातील मर रोग व्यवस्थापन, हळद पिकातील रोग व्यवस्थापन, ऊस पिकातील आंतरपीक पद्धती याविषयी, खरीप पिकातील बीज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यानुसार शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले. कार्यक्रमात ४८ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आणि मार्गदर्शनासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे आभार मानले.