मेहनती शेतकरी विद्यापीठाचे राजदूत ....मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि कानसूर येथील प्रगतशील शेतकरी ह.भ.प. श्री.अच्युत महाराज शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कानसूर, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथे “किसान गोष्टी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रगतशील शेतकरी श्री नागोरावजी आरबाड हे होते. कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. पी.एच. वैद्य, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. कलालबंडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून तसेच योग्य आच्छादन आणि ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन अशा अचूक शेती व्यवस्थापनाद्वारे मिरचीचे विक्रमी उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी ह.भ.प. श्री. अच्युत महाराज शिंदे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. वयाच्या ७८ व्या वर्षी सुद्धा साधारणपणे एकरी अंदाजे रुपये पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळवणारे शेतकरी यांची चिकाटी, मेहनत आणि जिद्द याबद्दल माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी प्रशंसा केली आणि असे मेहनती शेतकरी हे विद्यापीठाचे राजदूत असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रगतशील शेतकरी श्री नागोरावजी आरबाड यांनी शाश्वत शेती व्यवसायासाठी आधुनिक शेती व्यवस्थापनाचे महत्व यावेळी नमूद केले. तद्नंतर संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके आणि संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच डॉ. लक्ष्मणराव खरवडे, प्राचार्य श्री के. पी. कनके, प्रगतशील शेतकरी श्री रामभाऊ शिंदे, श्री मदन महाराज शिंदे, श्री प्रल्हाद महाराज शिंदे यांनी आपल्या शेती विषयक समस्या उपस्थित केल्या, त्यावर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समस्यांना समर्पक असे उत्तर देऊन शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील प्रगतशील शेतकरी शास्त्रज्ञ व कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.