माती परीक्षण काळाची गरज....डॉ. उदय खोडके
माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत, हा अभिनव उपक्रम मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालनालयद्वारा पेडगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. विजय जंगले यांच्या शेतात दिनांक ९ मे रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, हे होते तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ.राजेश कदम, डॉ.प्रवीण वैद्य, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. जी. एम. कोटे, डॉ.पी.एच. गोरखेडे, आत्माच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, खरीप हंगामाचे नियोजन करताना जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करावी, पीकांची फेरपालट, आंतरपीक पद्धती, जल संधारण आणि आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर यावर भर द्यावा असे नमूद करून शाश्वत पीक उत्पादनामध्ये माती परीक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तद्नंतर उपक्रमामध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये फळबाग, जमिनीची सुपीकता, जमीन निवड व योग्य वापर, गोगल गाय व पैसा अळी यांचे निर्मूलन याबाबत चर्चा झाली, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नाचे निरसन तसेच शेतीविषयक अडचणीवर शास्त्रज्ञानी योग्य मार्गदर्शन केले.
उपक्रमामध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि भविष्यात एकात्मिक किड व्यवस्थापन व भाजीपाला लागवड या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांनी विनंती केली. यावेळी विशेष क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल प्रतिनिधीक स्वरूपामध्ये काही शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच प्रकल्प संचालक आत्मा श्री. दौलत चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. अनिल गवळी आणि तालुका कृषी अधिकारी श्री. नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वाती घोडके यांनी सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिक, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, निंबोळी अर्क याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.आनंद गोरे यांनी केले, सूत्रसंचालन स्वाती घोडके यांनी केले तर आभार श्री. विजय जंगले यांनी मानले.