Thursday, May 9, 2024

वनामकृविच्या सुरक्षा समितीची बैठक संपन्न

 विद्यापीठ प्रक्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांची....मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत विविध महाविद्यालये, विभाग आणि संशोधन केद्रांच्या अंतर्गत व्यापक क्षेत्र आणि कार्यालये आहेत. यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विद्यापीठ सुरक्षा समितीची बैठक दिनांक 8 मे रोजी मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, सुरक्षा अधिकारी श्री पुरुषोत्तम सुडके, डॉ. गजानन गडदे, डॉ. संदीप पायाळ, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी यांची उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर विद्यापीठ सातत्याने संशोधनाचे आणि बीजोत्पादनाचे प्रकल्प राबवित आहे. संशोधन आणि बीजेत्पादनासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी अविरत कार्य करत आहेत. यातून राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले उत्कृष्ट वाण आणि लागवड पद्धती विकसित केल्या जात आहेत. तसेच बीजोत्पादन कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला पैदासकार आणि पायाभूत बियाणे पुरवण्याची विद्यापीठाचा  निर्धार आहे. परंतु या कार्यात काही प्रक्षेत्रावर प्रयोगाचे साहित्य चोरी करून काही समाजकंटक गैवर्तन करत आहेत. चोरी करणाऱ्यासाठी ती एक किरकोळ १००० ते २००० रुपयाची वस्तू असते, परंतु विद्यापीठासाठी ती लाख मोलाची असून, विद्यापीठाने त्या वस्तूचा उपयोग संशोधनासाठी केलेला असतो. त्या वस्तूची चोरीने विद्यापीठाची संपूर्ण मेहनत व्यर्थ जाऊन, लाखो रुपयांचे विद्यापीठाचे, पर्यायाने समाजाचे नुकसान होते. प्रक्षेत्रावर चोरीसारखे किंवा इतर संशोधनास बाधा पोहोचविणारे प्रकार न होऊ देण्याची जबाबदारी विद्यापीठ शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि समाजाची आहे असे मत या बैठकीत मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. तसेच भविष्यात चोरी आणि विद्यापीठ प्रक्षेत्रास बाधा पोहोचू नये म्हणून संशोधन प्रक्षेत्र प्रतिबंधित करण्याचे ठरविण्यात आले. या प्रक्षेत्रावर जनतेने विनापरवानगी प्रवेश करू नये असे आदेशीत केले आहे. तसेच प्रक्षेत्रावर चोरी किंवा कोणतीही हानी पोहोचविणाऱ्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश विद्यापीठाच्या सुरक्षा समितीस दिले आहेत. यासाठी विद्यापीठाच्या सुरक्षा समिती मध्ये मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या वाढवून बळकटीकरण करण्यात आलेले आहे. बैठकीसाठी प्रक्षेत्रावरील सर्व पहारेकऱ्यांना बोलावून मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांना चोरी रोखण्यासाठी तसेच सुरक्षा संबंधी सक्त सूचना देण्यात आल्या.