वनामकृवितील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यायातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात असणाऱ्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतर्फे नुकतेच उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कार्यांचा अनुभव देत असतांना व्यायाम, योगा, मनोरंजक खेळ, जीवन कौशल्ये विकसन, विज्ञान अनुभव, सृजनात्मक कार्ये, सामान्य ज्ञान, नैतिक कथा, गाणे, नृत्य, पाककृती इत्यादी कृती घेण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी या विविध कृतींमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या शिबिरादरम्यान संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके आणि छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम. विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉ. विलास सपकाळ तथा इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांनी या शिबिराचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती भेटवस्तू म्हणून दिल्यानंतर त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.
या शिबिराअंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्यासोबत शिबीरातील विद्यार्थ्यांनी सकाळच्या रम्य वातावरणात निसर्ग सहलीचा आनंद घेतला. तसेच त्यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिबिरार्थींना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले. आपली पृथ्वी प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने वस्तूंचा किमान वापर, पुनर्वापर व पुनर्निर्मिती यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करुन पर्यावरणाचे रक्षण करावे असेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच बालकांना कागदी पिशव्या बनवण्याची कला अवगत करुन दिली. राष्ट्रीय पुस्तक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ. वीणा भालेराव यांनी विद्यार्थ्यांची विभागातील बालवाचनालयास भेट आयोजित करुन त्यांना विविध प्रकारची पुस्तके दाखवून मार्गदर्शन केले व आपली प्रगती साधण्यासाठी वाचनाचे महत्व पटवून दिले.
या शिबिराच्या आयोजक प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी या शिबिराच्या समन्वयक डॉ. वीणा भालेराव व डॉ. नीता गायकवाड यांच्यासह विभागातील प्रा. प्रियांका स्वामी तसेच शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. सदरील शिबिराच्या आयोजनात या शाळेतील शिक्षिका श्रुति औंढेकर, वैशाली जोशी, मिनाक्षी सालगोडे, संध्या देशपांडे, रेवती हिस्वनकर, दिपाली करभाजने, मनिषा गाडगे व मदतनीस यांचे सहकार्य लाभले.