महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा प्रेरणादायी....कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
या वेळी मार्गदर्शनात मा. कुलगुरू डॉ इन्द्र मणि म्हणाले की, महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा अतुलनिय आणि प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र ही संत, महंत, ऋषी तसेच वीरांची भूमी आहे. संताच्या प्रेरणेतून नीती, जीवन मुल्ये, नैतिकता, चारित्र्य, बंधुभाव आणि धर्मभावाची जपणूक केली जात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेवून महाराष्ट्रातून अनेक देशभक्त निर्माण झाले आणि त्यांनी इंग्रजाविरुद्ध लढून देशाच्या स्वातंत्रासाठी योगदान दिले. तसेच महात्मा फुले, राजश्री शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महान समाजसुधारकांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी अतिउच्च प्रयत्न केले. महाराष्ट्रास मिळालेल्या अशा मोठ्या वारस्यामुळे येथील नागरिकांच्या जीम्मेदारीमध्येही वाढ झाली. कोणत्याही प्रदेशाची ओळख त्याच्या भौगोलिक सीमेवरून नसून तेथील नागरिकांच्या विकासात्मक कार्यावरून केली जाते. तसेच आपल्या परिसराचा, प्रदेशाचा आणि राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर स्वतः मध्ये सकारात्मक बदल करून स्वतःच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्राची प्रेरणादायी परंपरेचा लाभदायी ठरते आणि यातूनच महाराष्ट्राने साहित्य, कला, शिक्षण, खेळ, संस्कृती, चित्रपट, संगीत, कृषि, अभियांत्रिक, वैद्यकिय, संगणक, औद्योगिक, दळणवळण या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे असे प्रतिपादन केले. तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय शेती असून शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून कार्य करत आहोत हे एक सौभाग्य असून या विद्यापीठातून मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्रासाठी शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्याद्वारे मोठे योगदान दिलेले आहे. विद्यापीठाने संशोधित विविध पिकांचे वाण आणि २५ वा दीक्षांत समारोह, पश्चिम विभागीय कृषी मेळावा, १२ वी राष्ट्रीय बियाणे परिषद यासारख्या उल्लेखनीय कार्यामुळे विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय पातळीवर वरच्या श्रेणीमध्ये घेतले जात आहे. विद्यापीठाने मनुष्यबळ विकासासाठी नाहेप प्रकल्पांतर्गत शास्त्रज्ञांना बाहेरदेशात पाठवून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले याचा फायदा विद्यापीठाच्या कार्यास मिळण्यास सुरुवात झालेली आहे. याबरोबरच विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्थेसोबत सामंजस्य करार केलेले आहेत. याशिवाय खाजगी संस्थेद्वारे ६५ कोटींचा सीएसआर निधी विद्यापीठास मिळालेला आहे, यातून विद्यापीठाच्या कार्यास अतिरिक्त लाभ मिळाला आहे. भविष्यात शैक्षणिक विकासासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करणार असून, याद्वारे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासास प्राधान्य देण्यात येणार. विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तार कार्य, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्टीकोन ठेऊन कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास संचालक
विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन
डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ विश्वनाथ खंदारे ,विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर आदींसह विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, आणि विद्यार्थी यांची बहुसंखेने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री उदय वाईकर यांनी केले.