Saturday, November 9, 2024

तूर पिकाचे फुलोरा अवस्थेतील व्यवस्थापनाविषयी ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद

 शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे... कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील संशोधन केंद्राच्या माध्यमातून तुर आणि कडधान्य पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केला जात आहे. तुर पिकाच्या संवेदनशील अवस्था मध्ये योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे असे प्रतिपादन कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ नोव्हेंबर रोजी आयोजित ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाच्या एकोणीसाव्या भागात बोलत होते. या भागाचा विषय तूर पिकाचे फुलोरा अवस्थेतील व्यवस्थापन हा होता. माननीय कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनात असे नमूद केले की, नुकतेच विद्यापीठाने महाराष्ट्रातील पहिला तुरीचा संकरित  वाण (बिडिएनपीएच १८-५) विकसित केलेला आहे. तुरीमधे आधुनिक तंत्रज्ञानाधारे तुर पिकाची उत्पादकते मध्ये वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचविण्यावर विद्यापीठाचे शास्त्रज्ञानी प्रयत्नशील राहावे. शेतकऱ्यांसोबत जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध प्रस्थापित करावे, शेतकरी वर्गामध्ये शेती विषयी आपुलकी निर्माण करावी, शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी शिक्षणाची ओळख निर्माण करून कृषी शिक्षणात असलेल्या संधी समजावून सांगाव्यात आणि कृषी व कृषी संलग्न शाखेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. मराठवाड्यातील कृषि क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध होत चाललेला शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद कार्यक्रमांमध्ये विविध शिक्षणाच्या संधी, शेती उत्पादनाचे विक्री व्यवस्थापन, प्रगतशील शेतकऱ्यांची मनोगत, सामाजिक तसेच विकासात्मक कार्यक्रम याबद्दल मार्गदर्शन करून विविधता जपावी असेही  सूचित  केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांनी केले. तांत्रिक सत्रात हवामान शास्त्रज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी पुढील आठवड्याचा हवामानाचा अंदाज सांगितला. यामध्ये त्यांनी येणाऱ्या आठवड्यात तापमानात विशेष तफावत जाणवणार नाही तसेच पर्जन्यमान सरासरी एवढेच राहील असे नमूद केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ किरण जाधव यांनी तुरीचे विविध वाण आणि फुलगळ थांबविण्यासाठी मार्गदर्शन केले तर डॉ ज्ञानदेव मुटकुळे यांनी तुर पिकातील किडींचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी विविध उपाय सुचवले तसेच डॉ प्रशांत सोनटक्के यांनी तुर पिकाचे फुलोरा अवस्थेत येणाऱ्या विविध रोगांची ओळख आणि त्यांचे नियंत्रण करण्याचे विविध उपाय सुचविले. 

यावेळी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, विस्तार विद्यावेत्ता  डॉ अरुण गुट्टे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल गोरे यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागातील आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी विभाग अधिकारी आणि मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रमात दुहेरी संवादावर भर देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी विचारलेल्या शेतीविषयक समस्यांचे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.