Saturday, November 30, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि प्रियदर्शनी महिला तंत्र शिक्षण मंडळ यांच्यात सामंजस्य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणी आणि प्रियदर्शनी महिला तंत्र शिक्षण मंडळ (PMTSM), श्रीरामपूर यांच्यात कौशल्य विकासाच्या विविध योजनांच्या मार्गदर्शनासाठी आणि समन्वयासाठी कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आणि कौशल विकास रोजगार उद्योजकतच्या छत्रपती संभाजीनगर येथील उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे यांच्या समन्वयाने दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून पंतप्रधान कौशल्य विकास योजना 4.0 (PMKVY 4.0) अंतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण, मूल्यमापन आणि प्रमाणन या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाईल. या उपक्रमाचा उद्देश युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या आणि उद्योजकते बाबत कृषीशी संबंधित निवडक विषयात शिक्षण देवून सक्षमीकरण करणे आहे.

करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने विस्तार शिक्षण संचालक  डॉ. भगवान विठ्ठलराव असेवार यांनी स्वाक्षरी केली, तर प्रियदर्शनी महिला तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री. नंदकुमार रामनाथ धनवटे यांनी सह्या केल्या.

प्रियदर्शनी महिला तंत्र शिक्षण मंडळ, श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) यांच्या प्रयत्नांतून आणि कृषी विद्यापीठाच्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यासाठी कौशल्य विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. सदर सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन कौशल्य विकासाच्या क्षेत्रात नाविन्य उपक्रम राबविले जाणार असून विद्यार्थी आणि युवकांचे सक्षमीकरण साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ मदन पेंडके,  संस्थेचे सचिव श्री प्रफुल्ल वासवे , परभणी येथील कौशल विकास रोजगार उद्योजकतचे सहाय्यक आयुक्त श्री. पी. एस.खंदारे आणि  परभणी जिल्ह्याचे कौशल्य विकास समन्वयक श्री दीक्षित आदी उपस्थित होते.