Friday, November 15, 2024

रबी हंगामातील भाजीपाला पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन

 विद्यापीठ शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध ... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा विसावा भाग कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.

यावेळी बोलताना कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठामध्ये नुकतेच आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये मराठवाड्यातील महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा विद्यापीठाने सत्कार केला. या कार्यक्रमास देश विदेशातील शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी सहभाग घेतला. यात प्रामुख्याने ट्रॅक्टर कंपन्यांचे राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च अधिकारी होते. या अधिकाऱ्यांनी मराठवाड्याचा जमिनी आणि वातावरणामध्ये उपयुक्त अशा ट्रॅक्टर अवजारांची निर्मिती करणार असल्याचे सांगितले आहे. या परिसंवादामधून एका कंपनीने आपल्या ट्रॅक्टरचे नवे मॉडेल बाजारामध्ये आणले आहे. तसेच या ट्रॅक्टर कंपन्या फळबागेसाठी प्रभावी मिनी ट्रॅक्टरचीही निर्मिती करणार आहेत असे नमूद करून ते पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्रामध्ये उद्यान विभागाचे अनन्यसाधारण महत्त्व असून याद्वारे उत्कृष्ट दर्जेच्या भाज्या, फळे, फुले यांचे उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञान विद्यापीठाद्वारे विकसित केले जाते. फळे आणि भाज्यांचे मानवी आहारात आरोग्यासाठी महत्त्वाचे स्थान आहे. तसेच शेतीसाठी महत्त्वाचं उत्पन्नाचा स्त्रोत देखील आहे. याकरिता शेतकरी बांधवांनी शेती व्यवसायात भाजीपाला आणि फळबाग लागवडीस प्राधान्य द्यावे. विद्यापीठ शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून कार्य करण्यावर भर देत आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले

विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांनी भाजीपाला पिकामध्ये शिफारस केलेल्याच निविष्ठांचा योग्य प्रमाणात वापर करून लागवड खर्च कमी करावा असे नमूद केले. दर शुक्रवारी सायंकाळी सात वाजता होणाऱ्या ऑनलाइन मार्गदर्शनाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीला प्रगत दिशा द्यावी, असे त्यांनी आवाहन करण्यात आले.

तांत्रिक क्षेत्रात उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ विश्वनाथ खंदारे यांनी रबी हंगामातील भाजीपाला पिकांसाठी जमिन, बियाणे निवड, आंतरमशागत, सिंचन पद्धती, किड नियंत्रण, यातील आधुनिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बाजाराचा अंदाज घेऊन आणि स्थानिक लोकांच्या आवडीनुसार भाजीपाला पिकांची लागवड करावी असेही सांगितले.

हवामान शास्त्रज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी पुढील आठवड्याचा हवामानाचा अंदाज विशद केला. कीटक शास्त्रज्ञ डॉ अनंत लाड यांनी तूर पिकावरील किड नियंत्रणाविषयी माहिती दिली. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाविषयी प्रश्न विचारले त्यास विद्यापीठातील शास्त्रज्ञानी  समाधानकारक उत्तरे दिली.

सूत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारीकर्मचारीविद्यार्थीविद्यापीठातील शास्त्रज्ञकृषि विद्यावेत्त्ताकृषि विज्ञान केंद्राचे समन्वयकआणि बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते...