बदलत्या हवामानानुसार पिकांची लागवड करावी... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली "माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत" हा अभिनव उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये दिनांक ९ एप्रिल रोजी यशस्वीरित्या राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील १३ शास्त्रज्ञांच्या चमूमधील ३४
शास्त्रज्ञांनी १७ गावांमध्ये ३२५ हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत प्रक्षेत्र
भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, आणि शेतकरी मेळावे घेतले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत त्यांना
विविध पिकांच्या तंत्रज्ञानासह हवामान बदलाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
परभणी तालुक्यातील मौजे देशमुख पिंपरी येथे आयोजित प्रमुख कार्यक्रमात
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार
शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रगतिशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर, गावचे उपसरपंच
श्री. नागेशराव देशमुख आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विद्यापीठाने विकसित
केलेल्या गोदावरी तुरीच्या वाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढले
यावर भर दिला. सोयाबीनचे एमएयुएस – ७२५ व ७३१ हे वाण शेतकऱ्यांना अधिक
फायदेशीर ठरत असून हवामान बदल लक्षात घेता अधिक तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती
विद्यापीठ करत आहे, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये बदलत्या
हवामानानुसार पिकांची लागवड करावी, असे त्यांनी सांगितले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी येणाऱ्या १८ मे रोजी
विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित खरीप शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्याचे
आवाहन केले.
कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित चर्चासत्र घेण्यात आले.
यामध्ये विविध विषयांचे तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत
देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान कसे आत्मसात
करता येईल हे स्पष्ट केले. विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी कापूस, तूर, सोयाबीन व हळदीच्या लागवडीविषयी तर सहयोगी प्राध्यापक
(उद्यान विद्या) डॉ.
बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी भाजीपाला व फळबाग लागवडीविषयी माहिती दिली. कीड
व्यवस्थापनाबाबत सहाय्यक
कीटकशास्त्रज्ञ डॉ.
दिगंबर पटाईत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रगतिशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर आणि श्री. सोपान माने
यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
डॉ. डी.डी. पटाईत व श्री. विश्वनाथ देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन
डॉ. जी.डी. गडदे यांनी केले.
प्रगतशील शेतकरी श्री. सोपान माने यांच्या एकात्मिक शेती पद्धतीचा
मान्यवरांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्र दौऱ्याद्वारे आढावा घेतला. त्यांच्या फळबाग, कोंबडी पालन आणि
महोगनी वृक्ष लागवडीचे विशेष कौतुक करण्यात आले.
या उपक्रमात मराठवाड्यातील विद्यापीठाच्या विविध विभागांतील शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कृषी
तज्ञ सहभागी झाले होते. यामध्ये परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय,
किटकशास्त्र विभाग, कृषि विस्तार शिक्षण विभाग, कृषि अभियांत्रिकी विभाग, छत्रपती संभाजीनगर
येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प व फळ संशोधन केंद्र, तुळजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि खामगाव (ता.
गेवराई) येथील कृषि विज्ञान केंद्रे, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, परभणी येथील
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी, अंबाजोगाई, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर
येथील विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे, येथील या कार्यालयातील
शास्त्रज्ञानी त्यांच्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून
त्यांच्या गरजेनुसार आणि समस्येनुसार मार्गदर्शन केले.
यावेळी सहयोगी संचालक डॉ
सूर्यकांत पवार, सहयोगी प्राध्यापक डॉ. वीणा भालेराव, सहयोगी कृषी विद्यावेत्ता
डॉ. अरविंद पांडागळे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत प्र. सूर्यवंशी, प्रा.
अरुण गुट्टे, शास्त्रज्ञ डॉ. बी.एम.कलालबंडी, डॉ. वर्षा मारवळीकर,
डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. संजूला भावर, डॉ. एस डी सोमवंशी, डॉ. दीपक कच्छवे, डॉ.
संजय पवार, डॉ. हनुमान गरुड, श्रीकृष्ण झगडे, किशोर जगताप, रामेश्वर ठोबरे,
डॉ अश्विनी बिडवे आदी प्रमुख शास्त्रज्ञांचा सहभाग होता.