Wednesday, April 9, 2025

कृषि महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाहिरी पोवाडा सादरीकरणाचा भव्य कार्यक्रम

 महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजेत... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि





वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय, परभणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहिरी पोवाडा सादरीकरणाचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक ९ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.

महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)  इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच लोकशाहीर श्री. रणजित आशा अंबाजी कांबळे (प्रबोधनात्मक शाहिरी जलसा, कोल्हापूर) उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरूंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकत, महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजेत, असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे या बाबासाहेबांच्या विचाराची आठवण करून देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करत, बाबासाहेबांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. सी. भाग्यवंत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते लोकशाहीर श्री. रणजित कांबळे यांच्या 'महामानवांना समर्पित शाहिरी पोवाडा'. त्यांच्या जोशपूर्ण, स्फूर्तिदायक आणि विचारप्रवर्तक सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले आणि उपस्थितांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा नवा उत्साह निर्माण केला.

कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल व डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांच्या मार्गदर्शनाखाली गठित संयोजन समितीने केले. या समितीत अध्यक्ष प्रेम कांबळे, उपाध्यक्ष गजानन येळणे, सचिव गौरव मानतुटे आणि कोषाध्यक्ष नागेश वसमतकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.