Wednesday, April 9, 2025

"शेतकरी देवो भव:" उपक्रमाअंतर्गत प्रगतशील शेतकरी श्री. विश्वनाथ होळगे यांची यशोगाथा विद्यापीठाच्या मंचावर सादर

 शुद्ध अन्नासाठी सेंद्रिय शेती उपयुक्त.... माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या "शेतकरी देवो भव:" या नाविन्यपूर्ण ऑनलाईन मालिकेचा पाचवा भाग माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ एप्रिल रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या भागात मौजे दापशेड (ता. लोहा, जि. नांदेड) येथील प्रगतशील शेतकरी श्री. विश्वनाथ होळगे यांची नैसर्गिक शेतीतील सातत्य, अनुभव आणि कार्यपद्धती याबाबतची प्रेरणादायी यशोगाथा विद्यापीठाच्या स्टुडिओमधून सादर करण्यात आली. त्यांच्या मुलाखतीद्वारे नैसर्गिक शेतीतील प्रवास, उत्पादनातली सुधारणा, विक्री व्यवस्थापनातील कल्पकता यावर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले की, नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. रासायनिक घटक कमी करून सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यास शेतीचा खर्च कमी होतो व उत्पन्नात वाढ होते. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहे. शुद्ध अन्नासाठी सेंद्रिय शेती उपयुक्त आहे.

सेंद्रिय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर वरिष्ठ संशोधन सहाय्यक सौ. सारिका नारळे यांनी श्री. होळगे यांची मुलाखत घेतली.

मुलाखतीत श्री. होळगे यांनी गांडूळ खत, जीवामृत, बीजामृत, अग्निअस्त्र, दशपर्णी अर्क, गोमूत्र यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर, तसेच एकात्मिक व मिश्र पीक पद्धतींचा प्रभावी वापर याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री व्यवस्थापन अधिक प्रभावी कसे करता येते, हे अनुभवाच्या आधारे सांगितले. शेतीतील सातत्य आणि नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करावा, हे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना समजावले.

या कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांनी श्री. होळगे यांना विविध प्रश्न विचारले, ज्यांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या समारोपात श्री. होळगे यांनी माननीय कुलगुरु, संशोधन संचालक आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे आभार मानले आणि सतत मिळणाऱ्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

"शेतकरी देवो भव:" उपक्रमातून शेतकरी ते शेतकरी संवादाच्या माध्यमातून ज्ञानाची देवाण-घेवाण होत असून, शाश्वत शेतीकडे नेणारा हा एक प्रेरणादायी मार्ग ठरत आहे.