Saturday, April 12, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली मसाला पिकांचे यांत्रिकीकरण व निर्यात संधींवर भर – वनामकृवित विशेष प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागातर्फे "एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान" अंतर्गत मसाला पिके व्यवस्थापन व मूल्यवर्धन यावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉल (हॉल क्र. १८) येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून वसमत येथील सुर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद बोरगड हे होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार व, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, प्रमुख अन्वेषक डॉ. विश्वनाथ खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मसाला पिकांमध्ये यांत्रिकीकरण, प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक कंपनी  निर्मिती, काढणीपश्चात व्यवस्थापन व परदेशी निर्यातीच्या संधींबाबत भर दिला. प्रशिक्षणातील महिलांचा सहभाग विशेष कौतुकास्पद असून, अशा प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्वीकारून उत्पन्नवाढ साधावी, असे ते म्हणाले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी मसाला पिकांचा इतिहास उलगडून सांगत शेतकऱ्यांना विद्यापीठामार्फत मिळणाऱ्या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

प्रास्ताविक विभाग प्रमुख व प्रमुख अन्वेषक डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी केले. त्यांनी प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली.

तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेश क्षीरसागर यांनी मसाला पिकांचे मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन केले. डॉ. सचिन मोरे यांनी हळद पीकाचे अर्थकारण, विपणन व ई – नाम (E-NAM) प्रणाली, डॉ. अनिल ओळंबे यांनी हळद पीक लागवड, डॉ. दिगंबर पटाईत यांनी किड व्यवस्थापन, तर डॉ. आनंद दौंडे यांनी रोग व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली.

श्री. प्रल्हाद बोरगड यांनी सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना, विकास आणि त्यातून शेतकऱ्यांना मिळणारे फायदे यावर मार्गदर्शन केले. जनार्धन आवरगंड यांनी शेतकरी गटांमार्फत मूल्यवर्धन व विक्री व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. महिला शेतकरी श्रीमती अलका डोळसे व मुक्ता झाडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून सूक्ष्म व लघुउद्योगातून स्वयंपूर्णता मिळवण्याचे प्रेरणादायी अनुभव शेअर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशा सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन कु. निकिता दापूरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. एस. आर. बरकुले, डॉ. ए. एम. भोसले, डॉ. एस. जे. सय्यद, डॉ. पंकज जावळे यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

या प्रशिक्षणात रेगाव, धोत्रा, आडगाव (रंजेबुवा), माकणी, मांडाखळी, मिरखेल, शेंद्रा आदी गावांतील सुमारे १२५ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम वारंवार आयोजित करावेत, अशी मागणीही यावेळी व्यक्त केली.