वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून, संशोधन संचालक डॉ खिजर बेग यांच्या पुढाकारातून तसेच
परभणी अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी व जनकल्याण सेवा संस्था यांच्या सहकार्याने मौजे
बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील नामवंत सामाजिक कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार प्राप्त मा.
श्री. चैत्रामजी पवार यांच्याशी विशेष चर्चासत्राचे आयोजन दिनांक ०९ एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सुप्रसिद्ध डॉ. रामेश्वर नाईक यांची विशेष
उपस्थिती होती.
या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मा. पवार यांचे
स्वागत करताना जन, जमीन, जल, जंगल आणि जनावरे या
पंचसूत्रीचा उल्लेख केला आणि असे सांगितले की, या क्षेत्रात
काम करणे हे खूप आव्हानात्मक असून मा. पवार यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.
त्यांच्या कार्याचा देशाने गौरव करून पद्मश्री पुरस्कार दिला, याचा विद्यापीठासही अभिमान आहे. अशा महान व्यक्तिमत्वास परभणी येथील
सुप्रसिद्ध डॉ. रामेश्वर नाईक यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची त्यांची भेट
करून आणली, याबद्दल विद्यापीठ आभार मानते. पुढे बोलताना माननीय कुलगुरूंनी
विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या जलसंधारण, सौरऊर्जा,
पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी असेही सांगितले की,
मा. पवार यांचे अनुभव विद्यापीठाच्या भावी पर्यावरणीय योजनांमध्ये
मार्गदर्शक ठरतील.
चर्चासत्रात पद्मश्री मा. श्री. चैत्रामजी पवार यांनी आपला अनुभव मांडताना
सांगितले की, सुरुवातीस जंगलसंवर्धनातून सुरुवात करत केंद्र शासनाच्या योजनांचा प्रभावी
वापर केला. मोहाच्या फुलांपासून साबण, तेल, मद्य, मनुके आदी प्रक्रिया उद्योग उभारले. मोहाच्या
एका झाडापासून किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. ते पुढे म्हणाले, जवळपास ४४ गावांमध्ये आमचे कार्य विस्तारले आहे, आणि
दोन लाखांहून अधिक मोहाची झाडे ही त्या परिसरातील समृद्धीचे प्रतीक आहे.
तसेच त्यांनी पारंपरिक धान्यांच्या संवर्धनावर भर दिला. नागली, वरई, भगर, राळ या पोषक धान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग
स्थापन करून बियाणे संवर्धन आणि शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने काम केले आहे.
“संवादातून संपर्क, आणि संपर्कातून संघटन निर्माण होते – हे
सूत्र अंगीकारल्यामुळेच आमच्या कार्यात यश मिळाले,” असेही
त्यांनी नमूद केले.
त्यांना वनसंवर्धन व वन्यजीव रक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र
शासनाचा पहिला “महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी पद्मश्री
मा. पवार यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. आनंत लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.
प्रवीण कापसे यांनी मानले.
कार्यक्रमास विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख,
प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.