Thursday, April 24, 2025

वनामकृविच्या नांदेड येथील कृषि महाविद्यालय व कापूस संशोधन केंद्राच्या कामांना मिळाली गती – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत पाहणी व गौरव

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील कृषि महाविद्यालयाच्या प्रस्तावित बांधकामाची माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २४ एप्रिल रोजी पाहणी केली.  यावेळी त्यांनी कृषि महाविद्यालयाच्या सर्व बांधकामाची गुणवत्ता तपासली. विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी गुणवत्ता आणि विविध कामांची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे नोडल अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजीराव शिंदे, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. नरेश जायवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

तसेच, विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राला अखिल भारतीय कापूस सुधार प्रकल्पातर्फे सन २०१८ ते २०२३ या कालावधीत भारतीय कृषि अनुसंधान परिषेदेच्या पंचवार्षिक आढावा समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले. या महत्वपूर्ण कार्याबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कापूस संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

त्याचप्रमाणे, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत कापूस संशोधन केंद्रासाठी राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या निधीतून नवीन इमारतीचे बांधकाम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठीची आज (दिनांक २४ एप्रिल) स्थळ निश्चिती करण्यात आली. या इमारतीसाठी माननीय कुलगुरू यांनी एक आकर्षक, दीर्घकालीन गरजा पूर्ण करणारी आणि ऊर्जा बचत करणारी इमारत निर्माण करण्याची सूचना केली.

यावेळी विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, कृषि महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ. राजेश कदम, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेश जायवार, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. चिंचाणे, कनिष्ठ अभियंता श्री. ढगे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.