Saturday, April 5, 2025

जैविक खत व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमाचा ४० वा भाग दिनांक ४ एप्रिल रोजी संपन्न झाला. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात जैविक शेतीतील खत व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मार्गदर्शन करताना विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी जैविक घटकांच्या वापरामुळे खत खर्चात होणारी बचत आणि पर्यावरण रक्षण यावर भर दिला.

कार्यक्रमात जैविक शेती विषयक तांत्रिक मार्गदर्शन करताना डॉ. हरिहर कौसडीकर यांनी शाश्वत शेतीसाठी मातीची उपयुक्तता, खत व्यवस्थापनाचे शास्त्रीय महत्त्व आणि जैविक घटकांच्या प्रभावी वापराविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, मातीचे नियमित  प्रथःकरण, जैविक घटकांचा वापर आणि सूक्ष्मजीवांद्वारे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवणे या पद्धती रासायनिक खतांवरचा अवलंब कमी करून जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत करतात.

जसे मानवासाठी अन्न हेच औषध आहे, तसेच माती हेच पिकासाठी सर्वोत्तम खत आहे,” असे सांगत त्यांनी जमिनीच्या पोषणासाठी माती परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. अनावश्यक रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढतो, यामुळे शेतकऱ्यांना अधिक कीडनाशकांचा वापर करावा लागतो आणि खर्च वाढतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी आठवड्यातील हवामानाचा अंदाज देत शेतकऱ्यांना योग्य शेती उपाय सुचवले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांचे मोलाचे योगदान लाभले. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह इतर भागांतील शेतकऱ्यांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभाग घेतला. उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली. या कार्यक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे शेतकऱ्यांनी अशा उपयुक्त उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी मागणी केली.