Friday, November 7, 2025

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव उत्साहात संपन्न

 देशभक्तीचा उत्सव विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवली

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात वंदे मातरम्सार्धशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राहूल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विवेकानंद भोसले होते. व्यासपीठावर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, परभणीचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री. भोजवानी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. रविंद्र शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम्गीताच्या सामूहिक गायनाने झाली. मार्गदर्शनपर भाषणात डॉ. राजेश कदम यांनी वंदे मातरम्गीताचा इतिहास सांगत युवकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रनिष्ठेची भावना वृद्धिंगत केली. त्यांनी सांगितले की हे गीत बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी इ.स. १८७५ मध्ये आनंदमठ या कादंबरीसाठी लिहिले असून, स्वातंत्र्य संग्रामात या गीताने भारतीय जनमानसाला प्रेरित केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. विवेकानंद भोसले म्हणाले, ‘वंदे मातरम्हे भारतीय संस्कृतीचा आणि स्वातंत्र्य संग्रामाचा जिवंत वारसा आहे. विद्यार्थ्यांनी या गीतातून प्रेरणा घेऊन समाज आणि राष्ट्रसेवेसाठी पुढे यावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष विखे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी गोरे व प्रियंका बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मधुकर मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा. संदीप पायाळ, श्री. लक्ष्मीकांत राऊतमारे, डॉ. गजानन वसु,  डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. आश्विनी गावंडे,  डॉ. शैलजा देशवेना,  श्री. शंकर शिवणकर, श्री. मगर, श्री. बेडवाल, श्री. राजाराम वाघ, सौ. सुनिता तळेकर आणि श्री. प्रमोद राठोड यांचे विशेष योगदान लाभले.

या प्रसंगी निबंधलेखन, वक्तृत्व व देशभक्तीपर गीतगायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले. वंदे मातरम्च्या जयघोषात कार्यक्रमाचा समारोप झाला.