Wednesday, November 19, 2025

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात उत्साहात संपन्न

 

भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते “पी. एम. किसान सन्मान निधी” योजनेअंतर्गत २१ व्या हप्त्याचे थेट लाभ हस्तांतरण दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तामिळनाडू राज्यातील कोयंबतूर येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना एकूण १८,००० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. यावेळी माननीय पंतप्रधानांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अनुभव आणि यशोगाथा जाणून घेतल्या. तसेच त्यांनी कृषी उत्पादने, विविध पिकांचे नमुने, नवनवीन शेती तंत्रज्ञान आणि कृषी यंत्रसामग्रीचे प्रदर्शन पाहून तेथील नवोन्मेषी उपक्रमांचे कौतुक केले. देशाला संबोधित करताना माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भविष्यातील शाश्वत कृषी विकासासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. आपल्या मातीतली सुपीकता टिकवण्यासाठी, पिकांची गुणवत्ता आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे विद्यापीठाच्या सिम्पोसियम हॉल (हॉल क्र. १८) मध्ये आयोजित करण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री. ए. एस. घोडके यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या प्रेरणादायी भाषणाचा लाभ विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच उपस्थित मान्यवरांनी थेट प्रक्षेपणाद्वारे घेतला.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, शेतकऱ्यांकडे श्रम, परिश्रम आणि मातीवरचे निस्सीम प्रेम सर्व काही असते; परंतु आर्थिक मर्यादा मात्र नेहमीच भेडसावत असतात. अशा वेळी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरतो. पुढे ते म्हणाले की, शुद्ध आणि गुणवत्तायुक्त बियाण्यांची माहिती शेतकऱ्यांना मिळणे अत्यंत आवश्यक आहे. बियाण्यातील फसवणूक टाळण्यासाठी देशपातळीवर कठोर उपाययोजना लागू करण्यात येत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना केवळ शुद्ध, प्रमाणित आणि विश्वासार्ह बियाणेच उपलब्ध होतील. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री. आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे नुकतीच नैसर्गिक शेती परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेतून बियाणे ते विक्रीपर्यंत नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक धोरणे आणि कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नैसर्गिक शेतीमध्ये बीजामृत, जीवामृत, आच्छादन यांसारख्या घटकांवर विशेष भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. नैसर्गिक शेतीतून शाश्वत, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत असल्याचे या परिषदेतील विविध अनुभवांमधून स्पष्ट झाले आहे. मात्र, यासाठी परंपरागत शेतीपद्धतीत काही बदल आवश्यक असून, शेतकऱ्यांनी यासाठी थोडा वेळ आणि प्रयत्न देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यापीठ ‘शेतकरी प्रथम’ या भावनेतून कार्यरत आहे. ‘शेतकरी देवो भवः’ ही वृत्ती अंगीकारून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नैसर्गिक शेतीची तत्त्वे आत्मसात करण्यासाठी नियमित मार्गदर्शन पुरविण्यात येत आहे. यावेळी कुलगुरूंनी शेतीतील नैसर्गिकरीत्या उपलब्ध साधन-सामग्रीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही केले. आज आपण विषमुक्त शेतीच्या संकल्पनेवर कार्य करत आहोत; मात्र त्याचबरोबर शेतकऱ्यांना ‘कर्जमुक्त शेती’ करण्यासही चालना देणे तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच कृषि विभागातील अधिकारी आणि प्रगतशील पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.