Saturday, March 14, 2026

वनामकृवित ‘शिव वृक्ष वाटिका’चे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील उद्यानविद्या विभागाच्या वतीने विद्यापीठ परिसरात ‘शिव वृक्ष वाटिका’ या विशेष उपक्रमाची स्थापना करण्यात आली असून या वाटिकेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दिनांक १३ मार्च २०२६ रोजी संपन्न झाले.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘शिव वृक्ष वाटिका’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करताना पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठ परिसरात विविध औषधी, धार्मिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वपूर्ण वृक्षांची लागवड करून या वाटिकेला शैक्षणिक व संशोधनात्मक महत्त्व प्राप्त होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ विश्वनाथ खंदारे तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ‘शिव वृक्ष वाटिका’च्या फलकाचे अनावरण करून परिसराची पाहणी केली व लागवड करण्यात आलेल्या वृक्षांबाबत माहिती घेतली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वृक्षांचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजण्यास मदत होणार असून विद्यापीठ परिसर हरित व पर्यावरणपूरक बनविण्यासही हातभार लागणार आहे.