Thursday, March 19, 2026

वनामकृवित माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते औषधी व सुगंधी वनस्पती रोपवन प्रकल्पाचा शुभारंभ

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रातील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर जवळील सायळा ब्लॉक (गट क्र. ५०, ५१ व ५४) येथे १०.०० हेक्टर क्षेत्रावर औषधी, सुगंधी वनस्पती तसेच फळझाडांचे रोपवन विकसित करण्यासाठी सन २०२५ ते २०२८ या कालावधीतील तीन वर्षांच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पांतर्गत रोपलागवडीचा शुभारंभ माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दिनांक १९ मार्च २०२६ रोजी करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भूमिपूजन करून वृक्षलागवडीस सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक रोपलागवड करून पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात विद्यापीठात औषधी व सुगंधी वनस्पतींचे स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याचा मानस असून, शेतकरी हिताचे संशोधन, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव तसेच पर्यावरण संतुलन राखणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प सन २०२५ ते २०२८ या कालावधीत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. विलास खर्गखराटे तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या सहायक वनसंरक्षक सायमा पठाण, वन परिक्षेत्र अधिकारी भूषण गजपुरे, वनपाल ए. एम. चंद्रमोरे, एम. आर. काटे, वनरक्षक जी. डी. सावंत आणि निलोफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.