Saturday, January 31, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास मान्यवरांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह यांची दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सदिच्छा भेट झाली. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील हेही उपस्थित होते.

या भेटीदरम्यान मान्यवरांनी केंद्रातील सुरू असलेल्या सेंद्रिय व नैसर्गिक शेतीविषयक संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण उपक्रम, प्रात्यक्षिके तसेच शेतकरी-केंद्रित विस्तार कार्याची माहिती घेतली. केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नवोपक्रमशील उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती ही भविष्यातील शाश्वत शेती व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करून, या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले. पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह यांनीही संशोधन व विस्तार यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यावर भर दिला.

डॉ. आनंद गोरे यांनी या भेटी बाबत मान्यवरांचे आभार मानले, यावेळी केंद्रातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.