राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि पुणे येथील
महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब
सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे दिनांक ९ ते ११
सप्टेंबर २०२६ दरम्यान ‘५४ वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती (जॉइंट
ॲग्रेस्को) बैठक–२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील कृषि
विद्यापीठांमध्ये विकसित करण्यात आलेल्या विविध संशोधन निष्कर्षांचा आढावा घेण्यात
येणार असून, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व कृषि
शिफारशींवर सविस्तर विचारविनिमय केला जाणार आहे.
या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीचा उद्घाटन समारंभ
दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे
रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास
मंत्री माननीय ना. श्री. भरत गोगावले हे होते, कार्यक्रमास
महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना.
श्री. दत्तात्रय भरणे यांनी आभासी माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर
वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सचिव डॉ. परिमल सिंग (भाप्रसे),
पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक
माननीय श्री. राहुल महिवाल (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्यातील
चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि (वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ), माननीय डॉ. संजय भावे (डॉ.
बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ), माननीय डॉ. शरद गडाख (डॉ.
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ) व माननीय डॉ. विलास खर्चे (महात्मा फुले कृषि
विद्यापीठ), महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप
स्वामी, कृषि परिषदेचे सदस्य माननीय श्री. विनायक काशिद,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे
सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटन समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांचा ‘उत्कृष्ट शास्त्रज्ञ’
पुरस्काराने गौरव करण्यात आला. कृषि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले
उल्लेखनीय कार्य, संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना
लाभदायी तंत्रज्ञान व वाण उपलब्ध करून देण्यासाठी दिलेले योगदान तसेच कृषि
संशोधनाला प्रभावी दिशा देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान
प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ. भगवान आसेवार यांना
सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ. भगवान आसेवार यांच्या या सन्मानाबद्दल वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण
संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे,
विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सर्व
महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच विद्यापीठातील सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्यांचे
अभिनंदन केले.
डॉ. भगवान आसेवार यांच्या या गौरवामुळे वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला आणखी एक
मानाचा तुरा लाभला आहे.
यापूर्वीही डॉ. भगवान आसेवार यांनी कोरडवाहू शेती, पीके आणि पीक पद्धती, पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, कृषी हवामानशास्त्र आणि वातावरण बदल या क्षेत्रामध्ये केलेल्या विशेष संशोधनाची दखल घेऊन त्यांना नवी दिल्ली येथी भारतीय कृषी अनुसंधान परिषद द्वारा कोरडवाहू शेती संशोधन आणि त्याचे अवलंबन याकरिता वसंतराव नाईक पुरस्काराने २०१८ मध्ये गौरविण्यात आले.


