Friday, September 11, 2026

शेती आणि निसर्गाशी असलेले नाते जपणारा बैलपोळा वनामकृवित उत्साहात साजरा

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी बैलपोळ्यानिमित्त शेतकरी बांधवांना दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्रातील शेतकरी संस्कृतीतील महत्त्वपूर्ण सण असलेल्या बैलपोळ्यानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र आणि कृषि विद्या विभागासह विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रीय कार्यालयांमध्ये दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी बैलपोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विद्यापीठ परिसरातील बैलांना स्वच्छ धुऊन, रंगीबेरंगी कापड, गोंडे व मणीमाळांनी आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच बैलांच्या शिंगांना विविध रंग लावून पारंपरिक पद्धतीने त्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शेती, बैल, पाऊस, जमीन आणि निसर्ग यांचा परस्परांशी अतिशय घट्ट संबंध आहे. बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकरी निसर्गाशी असलेले आपले नाते जपण्यासोबतच शेतीच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. शेतीच्या कामात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे महत्त्वपूर्ण स्थान असून, त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. बैलपोळ्यानिमित्त त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र आणि कृषि विद्या विभागात अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांच्या हस्ते बैलांचे पूजन करून त्यांना नैवेद्य खाऊ घालण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पशुसंवर्धन विभागातील डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. दत्ता बैनवाड, श्री. शैलेश मुंडे, श्री. प्रशांत गटशिरले, श्री. सोनटक्के, श्री. परमेश्वर गायकवाड तसेच कृषि विद्या विभागातील डॉ. मेघा जगताप, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. आशा चव्हाण, डॉ. ज्योती गायकवाड, श्री. शहाजी ढोले यांच्यासह दोन्ही विभागांतील विद्यार्थी व मजूर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याबरोबरच विद्यापीठाच्या मुख्यालयासह कार्यक्षेत्रातील विविध कार्यालये व प्रक्षेत्रांमध्येही बैलपोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.