Saturday, March 31, 2018

वनामकृवितील पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या वतीने आदिवासी शेतकरी मेळावा संपन्न

आदिवासी शेतक-यांना तुषार व ठिबक सिंचन संचाचे वाटप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या वतीने आदिवासी उपयोजना अंतर्गत दि. ३१ मार्च रोजी आदिवासी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी. आर. शिवपुजे, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, मुख्यशास्त्रज्ञ डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ हेमा सरंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाव्‍दारे राबविण्‍यात येत असलेल्‍या आदिवासी उपयोजनेमुळे आदिवासी शेतक-यांमध्‍ये नवीन कृषि तंत्रज्ञानाबाबत जागृती होत असल्‍याचे मत व्‍यक्‍त करून प्रकल्पातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाव्‍दारे तांत्रिक कार्यशाळाचे आयो‍जन करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या.
मा. डॉ पी आर शिवपूजे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी शेतक-यांनी केवळ शेती उत्पादन वाढवून न थांबता मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग सुरु करावीत तसेच शेतीस पशुपालन व दुध उत्पादानाची जोड देण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी वाई या गावात सन २०१५ पासून विद्यापीठाने राबविलेल्या विविध योजानांची माहिती देऊन मौजे जावरला येथील शेतकऱ्यांना यापुढेही विद्यापीठाकडून तांत्रिक पाठिंबा राहील असे आश्वासन दिले.
जावरला येथील सरपंच भूपेंद्र आडे व वाई येथील शेतकरी श्री दुधाळकर यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठ आदिवासी गावात राबवित असलेल्‍या उपक्रमाबाबत आभार व्‍यक्‍त करून यापुढेहि विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी तांत्रिक साहाय्य करण्‍याची विनंती केली. कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते नांदेड जिल्‍हातील किनवट तालुक्‍यातील मौजे जावरला येथील अकरा आदिवासी शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच तर हिंगोली जिल्‍हातील कळमनुरी तालुक्‍यातील मौजे वाई येथील अकरा आदिवासी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ उदय खोडके यांनी आदिवासी उपयोजना उपक्रमांची माहिती दिली तर सुत्रसंचालन प्रा. गजानन गडदे यांनी केले. तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापर व काळजी याबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमास आदिवासी शेतक-यांसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकिशोर गिराम, प्रभाकर सावंत, अंजली इंगळे, रत्नाकर पाटील, दादाराव भरोसे, देवेंद्र कुरा, प्रकाश मोते, संजय देशमुख आदींनी परिश्रम घेतले.



Friday, March 30, 2018

बौध्दिक स्‍वामित्‍व कायद्याव्‍दारे स्‍वत: पैदासकार शेतकरी पिकांच्‍या वाणाची रॉयल्‍टी मिळवु शकतात....बौध्दिक संपदा सल्‍लागार श्रीमती पल्‍लवी कदम


वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व स्‍पर्धा मंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व वनामकृवि विद्यार्थ्‍यी स्‍पर्धामंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 27 मार्च रोजी पिकांच्‍या वाणांचे पेटंट व शेतक-यांचे हक्‍क संरक्षण याविषयावर पुणे येथील बौध्दिक संपदा सल्‍लागार श्रीमती पल्‍लवी कदम यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात श्रीमती पल्‍लवी कदम म्‍हणाल्‍या की, शेतक-यांचा वाण म्‍हणजे जो शेतक-यांचे पुर्वापार पध्‍दतीने लागवड करून शोधला आहे किंवा शेतक-यांच्‍या शेतावर ज्‍याचा शोध लागतो, अशा पिकांच्‍या वाणाची नोंदणी बौध्दिक स्‍वामित्‍व कायद्याव्‍दारे स्‍वत: पैदासकार शेतकरी करून रॉयल्‍टी मिळवु शकतो. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी बौध्‍दीक स्‍वामित्‍व कायद्याचा अभ्‍यास करावा, या क्षेत्रात सल्‍लागार म्‍हणुन निश्चितच कॅरियर करू शकतील.
प्रास्‍ताविक प्रा. आर व्‍ही चव्‍हाण यांनी तर सुत्रसंचालन प्रा. पी के वाघमारे यांनी केले, आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धामंचाच्‍या सदस्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, March 28, 2018

विद्यार्थ्यांनी स्वत:तील कमतरता ओळखुन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत.....नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद

वनामकृवितील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन 

स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना, मनात दृढ निश्चिय असला पाहिजे. विद्यार्थ्‍यांना स्‍वत: तील सामर्थ्‍य व कमतरतेची जाणीव असली पाहिजे. स्‍वत:तील कमतरता ओळखुन त्‍यावर मात करण्‍यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्‍न करावेत, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 28 मार्च रोजी स्‍पर्धा परिक्षा व व्‍यक्‍तीमत्‍व विकास याविषयावर आयोजित व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर परभणी जिल्‍हा पोलिस अधिक्षक डॉ दिलीप झळके, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री संदिप घुगे, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे सहअध्‍यक्ष डॉ एच व्‍ही काळपांडे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा. श्री. चिरंजीव प्रसाद पुढे म्‍हणाले की, उपलब्‍ध संसाधनांचा योग्‍य वापर व दुरदृष्‍टी ही दोन गुण असलेली व्‍यक्‍ती चांगले नेतृत्‍व करू शकत. डॉ. ए पी जी अब्‍दुल कलाम, डॉ. स्वामीनाथन, डॉ वर्गीस कुरियन आदी शास्‍त्रज्ञामध्‍ये नेतृत्‍व गुण होती, या महान व्‍यक्‍तींच्‍या कार्यांनी व विचारांनी समाजातील अनेक व्‍यक्‍तींचे जीवन प्रभावीत झाले. विद्यार्थ्‍यांनी जाणीवपुवर्क स्‍वत:तील संवाद कौशल्‍य व लिखाण कौशल्‍य विकसित करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.   
तुळजापुर येथील सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री संदिप घुगे आपल्‍या मार्गदर्शनांत म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना वेळेचे नियोजन करणे गरजेचे असुन आपली दिनचर्या निश्चित केली पाहिजे, वायफळ बाबींवर वेळ खर्च करू नये. महाविद्यालयीन जीवनात कोणत्‍याही कायद्याच्‍या कचाटयात अडकु नये, याची दक्षता विद्यार्थ्‍यांनी घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.  
कार्यक्रमात विद्यार्थ्‍यी विचारलेल्‍या स्‍पर्धेपरिक्षेबाबतच्‍या अनेक शंका व प्रश्‍नांना मान्‍यवरांनी उत्‍तरे देऊन समाधान केले. विद्यापीठातील राष्‍ट्रीय छात्रसेनेतील छात्रसैनिक राहिलेले व आज उच्‍चपदावर पोलिस अधिकारी म्‍हणुन कार्यरत असलेले पंडित रेजितवाड, देविदास मुपडे, रामदास निर्दोडे, शशिकांत शेळके, अण्‍णासाहेब पवार आदींचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.
प्रास्‍ताविक शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा एस व्‍ही कल्‍याणकर, डॉ मीना वानखडे, कैलास भाकड, सतिश सुरासे, विजय रेड्डी, सिताराम पवार, अजित पाटील, पुजा मकासरे, मानकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Monday, March 26, 2018

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील बाजरी संशोधन प्रकल्‍प सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र

अखिल भारतीय समन्‍वयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पाच्‍या 53 व्‍या वार्षिक गट बैठकीचे जोधपुर (राजस्‍थान) येथील कृषि विद्यापीठात दिनांक 22 ते 24 मार्च दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाच्‍या अखिल भारतीय सन्‍मवयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पास सन 2017-18 साठी उल्‍लेखनीय संशोधन कार्यासाठी सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र म्‍हणुन सन्‍मानित करण्‍यात आले. जोधपुर कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बलराज सिंग हस्‍ते प्रमाणपत्र व मानचिन्‍ह विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना प्रदान करण्‍यात आले. यावेळी आयसीएआरचे सहाय्यक महासंचालक डॉ आय एस सोलंकी, प्रकल्‍प सन्‍मवयक डॉ सी तारा सत्‍यवती आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील बाजरी संशोधन प्रकल्‍प केंद्रानी लोहयुक्‍त एएचबी-1200 व एएचबी-1269 ही दोन वाण विकसित केलेली असुन या वाणांची राष्‍ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आलेली आहे तसेच हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅट सोबतच्‍या उत्‍कृष्‍ट सन्‍मवयीत संशोधन कार्य, कृषिविद्या व पिक विकृतीशास्‍त्रातील शिफारसी आदी संशोधन कार्याच्‍या योगदानामुळे केंद्रास सन्‍माननित करण्‍यात आले आहे. कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदरिल बाजरी संशोधन केंद्रातील कार्यरत शास्‍त्रज्ञ सहयोगी संशोधन संचालक डॉ एस बी पवार, वरिष्‍ठ पैदासकार डॉ एन वाय सातपुते, डॉ जी पी जगताप, डॉ डि एम लोमटे, डॉ आर सी सावंत, डॉ एस एस घुगे, प्रा. एस बी कदम, डॉ एस आर जक्‍कावाड, डॉ एन आर पतंगे, एस एल माने, बी एन लघाने आदीचे संशोधनात मोलाचे योगदान आहे.

Saturday, March 24, 2018

कृषी पद्व्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या सामाईक परीक्षा सुरळीत प्रारंभ

पुणे येथील महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळा तर्फे महाराष्‍ट्र राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमांत प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्‍यात येते. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठीच्‍या प्रवेशासाठी सदरिल परीक्षेचे आयोजन दिनांक 23 ते 25 मार्चच्‍या दरम्‍यान असुन सदरिल परीक्षांची सुरूवात दिनांक 23 मार्च झाली. या परिक्षेची परिक्षा केंद्रे मराठवाडयात परभणी, बदनापुर, अंबेजोगाई, लातुर या ठिकाणी असलेल्‍या कृषि महाविद्यालयात करण्‍यात आली आहे. दिनांक 25 मार्च रोजी परभणी येथील परिक्षा केंद्रावर एकुण 1532 परिक्षार्थी परिक्षा देणार असुन त्‍यांची आसनव्‍यवस्‍था कृषि महाविद्यालय (परीक्षा आसन क्र. 04010001 ते 0401108), अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय (परीक्षा आसन क्र. 04011009 ते 04011248) व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात (परीक्षा आसन क्र. 04011249 ते 04011447) करण्‍यात आली आहे, असे विद्यापीठ परीक्षा विभागाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.   
सदरिल परीक्षा महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी, उद्यानविद्या, वनशास्‍त्र, सामाजिक विज्ञान, कृषि अभियांत्रिकी, अन्‍नतंत्र, जैवतंत्रज्ञान, मत्‍स्‍यविज्ञान, पशुसंवर्धन व कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन याविषयातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठी राबविण्‍यात येत आहेत.

Thursday, March 22, 2018

माळसोन्ना येथे सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचे रासेयो विशेष शिबिर संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने माळसोन्ना (ता. जि. परभणी) येथे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. दिनांक 19 मार्च रोजी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. हेमांगिनी सरंबेकर, सरपंच सौ. लक्ष्मीबाई पूर्णे, प्रा पी एस चव्हाण, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. अनुराधा लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करतांना डॉ. पी. जी. इंगोले यांनी विद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिकाची शेतक-यांसाठी उपयुक्तता सांगितली तर रासेयोच्‍या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्‍या माध्‍यमातुन समाज प्रबोधन करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना व स्वयंसेवकांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले. शिबिरात महिला, युवक व बालकांचा विकास व कल्याण हा उद्देश ठेऊन विविध उपक्रम राबविण्‍यात आले. शिबिरात डॉ. जया बंगाळे यांनी बालविकासात पालकांची भूमिकायावर मार्गदर्शन केले तर डॉ. जया रोडगे यांनी कृत्रिम दागिने बनविण्याचे प्रात्यक्षिके दाखविली. तसेच डॉ. सुनिता काळे यांनी वस्त्र कलेतून उद्योजकताया विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. फरझाना फारुखी यांनी टोमॅटो सॉस व चिंचेचे लोणचे तयार करण्‍याचे प्रात्यक्षिके सादर केली. सदर शिबिरातील मार्गदर्शन उपयुक्त असल्याचे मनोगत ग्रामस्थांनी व्यक्त केले. शिबिर यशस्वितेसाठी रासेयो स्वयंसेवकांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

कृषि विज्ञान केंद्रे जिल्‍हास्‍तरावरील कृषि ज्ञानाचे मुख्‍य केंद्रस्‍थान.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित अंतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृति आराखडा कार्यशाळा संपन्‍न
देशात साधारणत: 590 पेक्षा जास्‍त कृषि विज्ञान केंद्रे असुन जिल्‍हास्‍तरावर ही केंद्रे कृषि ज्ञानाचे मुख्‍य केंद्रस्‍थान आहेत, यामुळे केंद्रातील विषय विशेषज्ञावर कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराची मोठी तांत्रिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील अकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या दिनांक २२ मार्च रोजी आयोजित वार्षिक कृषि आराखडा कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर पुणे येथील अटारीचे संचालक डॉ लखन सिंग, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि विज्ञान केंद्राच्‍या कृति आराखडाचे नियोजन काळजीपुर्वक करून आराखडयाची प्रभावी व कार्यक्षमरित्‍या अंमलबजावणी करावी. विद्यापीठ विकसित विविध पिकांची वाण व कृषि तंत्रज्ञान प्रसारावर भर द्यावा. येणा-या हंगामात कापसावरील शेंदरी बोंडअळीचा प्रार्दुभाव होऊ नये म्‍हणुन शेतकरी, कृषि विभाग, कापुस व्‍यापारी व कापुस प्रक्रीयादार आदीच्‍या सहकार्याने कार्य करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
पुणे अटारीचे संचालक डॉ लखण सिंग आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, प्रत्‍येक कृषि विज्ञान केंद्रानी आपआपल्‍या भागातील कृषि परिस्थितीकेचा अभ्‍यास करून अनूकुल नवीनतम कृषि तंत्रज्ञानाचा समावेश शेतक-यांच्‍या शेतावर घेण्‍यात येणा-या प्रात्‍याक्षिकांत करावा व त्‍या तंत्रज्ञानाचे परिणाम विश्‍लेषण करावे.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यशाळेत विद्यापीठातील कृषि शास्‍त्रज्ञ व विभाग प्रमुख यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यशाळेत मराठवाडयातील एकरा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम सन्मवयक व विषय विशेषज्ञांनानी सहभाग नोंदविला व वार्षिक कृति आराखडा निश्चित करण्‍यात आला.