Thursday, March 18, 2021

शाश्वत शेतीकरीता शेतकरी बांधवानी शेतीपुरक जोडधंद्याची कास धरावी ........ डॉ. धर्मराज गोखले

वनामकृवित कृषी किटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने आयोजित तुती रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभाग आणि रेशीम संशोधन योजना यांच्या सयुंक्त विद्यामाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्‍कृत कौशल्य  विकास आधारित अनुसूचित जाती (उपयोजना) उपभोगाकरिता तुती रेशीम उद्योग यावर तीन दिवसीय प्रशिक्षनाचे आयोजन 17 ते 19 मार्च दरम्यान  करण्यात असुन प्रशिक्षणाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री संतोष आळसे, प्राचार्य डॉ सय्यद इस्‍माईल, विभाग प्रमुख डॉ.संजीव बंटेवाड, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, शेतीत शाश्‍वतता प्राप्‍त करण्‍याकरिता शेतकरी बांधवानी शेतीपुरक जोडधंद्याची कास धरावी लागेल. रेशीमउद्योग हा शेतकर्यांसाठी आर्थिकदृष्टया फायदेशीर असून सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीपुरक व्‍यवसाया करावा. तुती रेशीम उद्योग, कुक्कुट पालन, मधमाशी पालन, शेळीपालन, डाळ मिल आदी शेतीपुरक व्‍यवसायाचे प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विद्यापीठाने सुरु करण्यात आलेले आहेत. प्रशिक्षणाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे डॉ. गोखले असे आवाहन त्‍यांनी केले.

श्री संतोष आळसे यांनी कृषि विभागा मार्फत सदरील उद्योगासाठी असलेल्या विविध योजना व अनुदान यांची माहिती देऊन त्‍याचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले तर मनोगतात डॉ. सय्यद इस्माईल म्‍हणाले की, बदलत्‍या हवामान परिस्थितीत शेती पुरक जोडधंद्या शिवाय पर्याय नाही. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रेशीम कोष निर्मीती आणि कोष काढणी तंत्रज्ञान या तांत्रिक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

डॉ चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम उद्योगाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजीव बंटेवाड यांनी केले. सुत्रसंचालन डॉ.फारीया खान यांनी केले तर डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विभागातील डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. एम जी जाधव, डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ सदाशिव गोसलवाड, डॉ धीरजकुमार कदम, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बसवराज भेदे, डॉ. अनंत लाड आदीसह प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते. 

Wednesday, March 17, 2021

सेंद्रीय शेतीमध्ये एकात्मिक जैविक कीड व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक…..डॉ. एच. बी. सिंह, वाराणसी

नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्‍या तिस-या दिवशी दिनांक 17 मार्च रोजी बनारस हिंदु विश्वविद्यालय येथील माजी विभागप्रमुख तथा प्राध्यापक डॉ. एच. बी. सिंह, नागपूर येथील नीम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मीकांत पडोळे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी डॉ. वाचस्पती पांडे हे होते. आयोजक डॉ. आनंद गोरे व डॉ. एन. के. भुते यांची उपस्थित होते.

बनारस हिंदु विश्वविद्यालय येथील माजी विभागप्रमुख डॉ. एच. बी. सिंह यांनी सेंद्रीय शेतीत जैविक किटकनाशकांचा वापर यावर मार्गदर्शन केले तर नागपूर येथील नीम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मीकांत पडोळे यांनी पीजीएस - इंडिया लोकल ग्रुपची स्थापना आणि स्थानिक गटांची नोंदणी, पीजीएस-भारत पोर्टलवर शेतक­यांची नोंद ऑनलाईन भरणे यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. अनंत बडगुजर यांनी सेंद्रीय शेतीतील किटक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत कामगंध सापळे, मित्रकीड,  मित्र पक्षी, परभक्षी किटक, जैविक किडनाशक, दशपर्णी अर्क, नीम अर्क, गोमुत्र आदींवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. ज्योती गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. एस. बी. बोरगांवकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. चंद्रकला, कु. व्हिन्यासा, श्री. अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्री. श्रीधर पतंगे, श्री. सतिश कटारे, श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले. सदरिल सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण ग्रामीण भागातील युवक,  युवती,  पदवीधर, प्रगतशील शेतीकरी यांच्यासाठी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण,  गाझीयाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

नैसर्गिक साधसामुग्रीचा योग्य वापर करुन पर्यावरण सुरक्षित ठेवा .... डॉ. एम. एस. कैरॉन

सेंद्रीय शेती वरील ऑनलाईन प्रशिक्षणात मार्गदर्शन

नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्‍या दुस-या दिवसी दिनांक 16 मार्च रोजी नागपूर येथील मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरॉन यांनी “सेंद्रीय शेती रचना आणि पीक नियोजन, पीक फेरपालट आणि इतर कृषी पध्दती” या विषयावर तर रायपूर (गोंदीया) येथील रुची बायो टेक आणि फार्म्सचे डॉ. महेंद्र ठाकूर यांनी “रुची बायो अॅग्रो, गोंदीयाची सेंद्रीय शेती व्यवस्थापनातील यशोगाथा” या विषयावर व्याख्याने झाली. यावेळी आयोजक डॉ. वाचस्पती पांडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश भालेराव यांची उपस्थित होते.

तांत्रिक सत्रात डॉ. एम. एस. कैरॉन यांनी असे सांगितले की, नैसर्गिक साधनसामुग्रीचा योग्य वापर करुन पर्यावरण संतुलीत ठेवणे गरजेचे आहे. तसेच शाश्वत सेंद्रीय शेती ही मातीचे आरोग्य आणि सेंद्रीय कर्ब समतोल ठेवण्यासाठी महत्वाची भुमिका बजावते. तर मार्गदर्शनात डॉ. महेंद्र ठाकूर यांनी म्‍हणाले की, शेतक­यांना उत्पादनात वाढ करण्यासाठी त्यांच्या जमिनीमध्ये सेंद्रीय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असणे आवश्यक आहे. ज्या जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जास्त असते त्या जमिनीच्या उत्पादन हे समतोल राहते व उत्पादीत मालाची गुणवत्ता, रंग, सुवास, ठिकाऊपणा वाढतो.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. राजेश भालेराव, यांनी तर आभार डॉ. विद्यानंद मानवार यांनी मानले. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एस. बी. बोरगांवकर, कु. चंद्रकला, कु. व्हिन्यासा, श्री. अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्री. श्रीधर पतंगे, श्री. सतिश कटारे व श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, March 16, 2021

सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी ….. मा. कुलगुरु डॉ. अशोक ढवण

ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

सेंद्रीय शेतमालास बाजारात मोठया प्रमाणात मागणी आहे. सेंद्रीय शेती संशोधनाबरोबरच उपलब्ध तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. आवश्यक सेंद्रीय निविष्ठा शेतावरच तयार करणे, विविध तंत्रज्ञान पध्दतींचा शेतक-यांच्या शेतावर वापर, सेंद्रीय प्रक्रिया उद्योग यातून ग्रामीण युवकांना रोजगा-या मोठया संधी आहेत, यातुन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्‍यासही मदत होईल, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेले परभणी येथील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १५ मार्च ते २१ मार्च दरम्‍यान सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी गाझीयाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा हे उपस्थित होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, जबलपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. ए.एस. राजपूत, गंगटोक (सिक्किम) येथील राष्ट्रीय सेंद्रीय शेती संशोधन संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. रवि कांत अवस्थी, पुणे येथील कृषि आयुक्तालयातील उपसंचालक श्री. अशोक बाणखेले, आयोजक डॉ. वाचस्पती पांडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. रामानजानेयूलू, डॉ. रणजित चव्हाण आदी उपस्थित होते.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, देशात विविध भागात सेंद्रीय शेती पध्‍दतीत मोठया प्रमाणात विविधता आढळते. सेंद्रीय शेती संशोधनाच्‍या दृष्‍टीने आंतरशाखीय दृष्टीकोन समोर ठेवून काम करणे गरजेचे असुन सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी समन्वय महत्वाचा आहे. सेंद्रीय शेतीबाबतच्‍या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांचे प्रत्‍यक्ष अनुभव महत्वाचे आहेत.

मार्गदर्शनात डॉ. ए. एस. राजपूत म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीत आशिया खंडात भारत आघाडीवर आहे, येत्या काळात सेंद्रीय शेतीसाठी मोठी संधी असुन ग्रामीण विशेष करुन आदिवासी बहूल क्षेत्रात सेंद्रीय शेतीसाठी मोठा वाव आहे. सेंद्रीय उत्पादनासाठी बाजारपेठ तंत्र विकसीत करणे, त्यासाठी विविध पर्याय शोधणे आवश्यक आहे. ओडीसा राज्यात आदिवासी बहूल क्षेत्रात सेंद्रीय शेती ज्याप्रमाणे वाढत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मोठी संधी असल्‍याचे ते म्‍हणाले तर डॉ. आर. के. अवस्थी आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भारत अन्नधान्याची निर्यात करत असुन अन्नधान्यात संपन्नता असल्याने आज सेंद्रीय शेतीत विविध प्रयोग करण्‍याची संधी आहे. विषमुक्त अन्न उत्पादन, कमीत कमी संसाधनांचा वापर, पर्यावरणाचा समतोल राखून केली जाणारी सेंद्रीय शेती एक चांगली शेती पध्दती पुढे आली आहे. सेंद्रीय शेतीत पारंपारिक ज्ञाना सोबतच विज्ञानाची भुमिका महत्वाची आहे.

मार्गदर्शनात श्री. अशोक बाणखेले म्‍हणाले की, महाराष्ट्रात ७.५ लाख हेक्टर क्षेत्र असून राज्यात पीजीएस प्रमाणीकरणाखाली ३७००० हेक्टर तर ३.५ लाख हेक्टर तृतीय पक्षी प्रमाणीकरण झालेले आहे. राज्यात व केंद्र शासनाच्या सेंद्रीय शेतीच्या विविध योजनांचा शेतकरी बंधु भगिनी यांनी लाभ घ्यावा. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून शेतकरी गट व सेंद्रीय शेतीचे क्लस्टर तयार करून केवळ उत्पादन नाही तर बाजारपेठ व्यवस्थापनावर देखील भर देण्यात आला आहे.

गोंदीया येथील रुची बायो टेक आणि फार्म्सचे डॉ. महेंद्र ठाकूर यावेळी बोलतांना सांगितले की, शेतकरी बांधवाना स्वत:ची व संपूर्ण गावाची प्रगती करण्‍याचे सामर्थ्य सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये आहे. यातून पदवीधर युवक, युवती यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. डॉ. जी. व्ही. रामनजानेयुलू यांनी सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना असून सामान्य शेतकरी यामध्ये जोडणे व त्याला पाठबळ देणे गरजेचे आहे असे सांगीतले. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ. वाचस्पती पांडे यांनी नागपुर येथील क्षेत्रीय सेंद्रीय केंद्राच्‍या सेंद्रीय शेतीच्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर वनामकृवितील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण आयोजना मागील भुमिका स्पष्ट केली. तांत्रिक सत्रात डॉ. आनंद गोरे यांचे सेंद्रीय शेतीमध्ये पीक व्यवस्थापन तर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातीलविभाग प्रमुख डॉ. पी. एस. बोडके यांनी हवामान बदलानुरुप सेंद्रीय शेती या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. रणजित चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. आनंद गोरे  यांनी मानले. ग्रामीण भागातील युवक, युवती, पदवीधर युवक, युवती, प्रगतशील शेतीकरी यांच्यासाठी सदरिल सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, संचालक डॉ. गगनेश शर्मा व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन प्रशिक्षणास शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. चंद्रकला, कु. व्हिन्यासा, श्री. अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्री. श्रीधर पतंगे, श्री. सतिश कटारे, श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

Monday, March 15, 2021

वनामकृवी विकसित शेती अवजारे व सौर उपकरणांचा व्यावसायिक निर्मितीसाठी सामंजस्य करार

गुणवत्‍तापुर्ण विद्यापीठ विकसित शेती अवजारे योग्‍य किंमतीत होणार उपलब्‍ध 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशूशक्तीचा योग्य वापर योजने अंतर्गत विकसित शेती अवजारे तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विदूत व अन्‍य ऊर्जा विभागाच्‍या वतीने विकसित करण्‍यात आलेले विविध सौर उपकरणे शेतकर्‍यांच्या पसंतीस पडले असुन महाराष्ट्रातील विविध भागातून त्यांची मागणी होत आहे. ही सर्व अवजारे शेतकरी बांधवाना मूबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्हयातील मे. इन्वेन्टीव्ह सोलूशन्स कंपनीशी विद्यापीठाने व्यावसायीक सामंजस्य करार केला.

सदरिल करारावर दिनांक १५ मार्च रोजी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्‍वाक्षरी करण्‍यात आली. यावेळी संचालक संशोधन डॉ. दत्ताप्रसाद वासकर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, यंत्र विकसित करणार्‍या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे प्रमुख डॉ. राहुल रामटेके, कंपनीचे संचालक व अभियंते श्री प्रशांत पवार, श्री सौरभ जाधव, विद्यापीठातील शास्त्रज्ञ  डी. डी. टेकाळे, ए. ए. वाघमारे, डॉ. मदन पेंडके आदी उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले की, कमी श्रमामध्ये अधिकाधिक शेती काम करण्‍याकरिता विद्यापीठ विकसित विविध शेती अवजारे शेतकर्‍यांना अत्‍यंत उपयुक्‍त असुन त्‍यामुळे उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. या सामंजस्‍य करारामुळे शेतकऱ्यांची यंत्राची मागणी पूर्ण होणार आहे. कंपनीने या यंत्राची गुणवत्ता आणि किंमत योग्य राहील याची काळजी घ्यावी जेणे करून जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल, असे ते म्‍हणाले.

या करारानुसार संशोधना आधारे विकसीत केलेले सौर ऊर्जा आधारित जनावरे / पक्षी घाबरवणारे यंत्र, सौर ड्रायर, बैलचलीत फवारणी यंत्र, काडीकचरा गोळा करणे यंत्र, गादी वाफा करून प्लास्टिक अंथरवने यंत्र, तीन पासेचे फनासाहित कोळपे, ट्रॅक्टरचलीत बूम फवारणी संरचना, ऊस व हळद पिकात भर लावणे यंत्र, बहुदेशीय पेरणीसही फवारणी यंत्र आदी अवाजरांची व्यावसायिक दृष्ट्या कंपनीला निर्मिती करता येणार आहे. यावेळी करारावर विद्यापीठाच्या बाजूने संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. स्मिता सोलंकी व कंपनीच्या वतीने श्री. प्रशांत पवार यांनी स्वाक्षरी केली. 

Tuesday, March 9, 2021

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावात कुटुंबाचे आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांचे मोठे योगदान........ कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृविच्‍या वतीने ऑनलाईन जागतिक महिला दिन महोत्सव साजरा, इतर देशातील संशोधिकांनीही घेतला सहभाग

महिलाच हीच कुटुंबाचा पाया असुन सध्याच्या कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावात कुटुंबाच्या आरोग्‍य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांच्या मोठे योगदान आहे. विद्यापीठ विकसित महिला शेतकरी उपयोगी तंत्रज्ञान तळागाळात पोहच‍विण्‍याचे मोठे कार्य विद्यापीठात कार्यरत असलेल्‍या विविध संशोधन केंद्रे, विद्याशाखेतील व कृषी विज्ञान केंद्रातील महिला शास्त्रज्ञां करीत आहेत, असे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या वतीने ८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्‍य साधुन ऑनलाईन महोत्सवाचे आयोजन करण्यात होते, कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, महिला आर्थिक व विकास महामंडळाचे औरंगाबाद विभागीय सनियंत्रण अधिकारी श्री सिद्धाराम माशाळे हे उपस्थित होते तर श्रीमती उषाताई अशोक ढवण, श्रीमती उज्वला धर्मराज गोखले, श्रीमती सुवर्णा दत्तप्रसाद वासकर, श्रीमती चारुशीला देवराव देवसरकर, श्रीमती दीपिका रणजीत पाटील, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय संशोधिका युक्रेन येथील नॅशनल इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी प्राध्यापिका डॉ. नतालिया ऑर्लेंको, अल्जेरिया येथील फरहीत अब्बास युनिव्हर्सिटीच्‍या डॉ. रायमा लाबार्ड, कॅनडा येथील क्लिअरपाथ, रोबोटिक्सच्‍या डॉ. एरिका इवांस आदींनी विशेष सहभाग घेतला.

संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांनी महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा देऊन आजची स्त्री अबला न राहता सबला होऊन एक शक्तीच्या रूपात पुढे येत असल्‍याचे म्‍हणाले. आंतरराष्‍ट्रीय संशोधिका डॉ. नतालिया ऑर्लेंको, डॉ. रायमा लाबार्ड, डॉ. एरिका इवांस यांनी भारतीय महिलांचे विविध क्षेत्रात मोठे योगदान असल्‍याचे म्‍हणाल्‍या.

मार्गदर्शनात श्रीमती उषा अशोक ढवण यांनी प्रत्येक आईने आपल्या पाल्यावर मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता समान संस्कार करण्‍याचे आवाहन केले तर श्रीमती दीपिका रणजित पाटील यांनी महिलांच्या मुलगी, बहीण,पत्नी, आई अशा प्रत्येक भूमिकेचे महत्त्व विशद केले.

विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दीपा राणी देवतराज यांनी महिलांमध्ये आव्हाने स्वीकारण्याची व ती उत्कृष्टपणे पेलण्याची क्षमता अधिक प्रमाणात दिसून येते आणि त्याचा उपयोग त्यांनी स्वतः साठी करून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन करून त्‍यांनी मुलींना तथा महिलांना सद्यपरिस्थितीत करिअर मधील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी महिलांचे हक्क आणि अधिकार व त्यांच्या पुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करतांना कुटुंबात प्रत्येक स्त्रीला ती आई असो अथवा पत्नी असो, तिला सन्मानाने वागवण्यात यावे अश्‍या म्‍हणाल्‍या.

प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी डिजिटल तथा यांत्रिकीकरण माध्यमातून प्रगत शेती तथा महिलांसाठी नाहेप प्रकल्पाचे योगदान याविषयी माहिती दिली. मविम परभणी जिल्हा समन्वयक श्रीमती नीता अंभोरे यांनी ग्रामीण, तळागाळातील, निरक्षर-सुशिक्षीत, सर्व स्तरातील महिलांना उद्योजकीय विचारातून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी वरिष्ठ शास्त्रज्ञा प्रा. नीता गायकवाड, डॉ अविनाश काकडे, श्री तांझिम खान आदींनी विशेष परिश्रम घेतले. सदर ऑनलाईन कार्यक्रमास महिला उद्योजिका, प्राध्यापक, पालकवर्ग, सामुदायिक विज्ञान पदवीपूर्व व पदव्यूत्तर विद्यार्थी,बहुसंख्येने सहभागी झाले.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्‍त मजुर महिलाच्‍या स्‍पर्धेा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालात दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील मजूर महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा आणि रांगोळी स्पर्धा यांचा समावेश होता. स्पर्धेत एकूण दहा मजूर महिलां  सहभागी झाल्या होत्या. संगीत खुर्ची स्पर्धेत लक्ष्मीबाई गायकवाड तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत आणि रांगोळी स्पर्धेत भारत (वर्षा) खोबे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. प्राचार्य डॉ. जयश्री झेंड आणि डॉ जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ माधुरी कुलकर्णी, प्रा. मेधा उमरीकर, डॉ. शंकर पुरी, डॉ विद्यानंद मनवर आदींनी कार्याक्रमाचे नियोजन केले होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी संगीता नाईक, शीतल मोरे, आलीम शेख, राम शिंदे आदींनी सहकार्य केले. स्पर्धे दरम्‍यान संपूर्णपणे कोविड नियमांचे पालन करण्यात आले होते.