Tuesday, June 23, 2015

कृषि विद्यापीठ व कृषि विभागाने समन्वयाने विस्तार कार्य करावे ......प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत आयोजीत दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन
शेतक-यांसाठी कृषि विद्यापीठाने पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने सुरक्षित व कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित केले असुन त्‍याच्‍या विस्‍तारासाठी कृषि विभाग व कृषि विद्यापीठ यांनी समन्‍वयाने कार्य करावे, या विस्‍तार कार्यात सातत्‍य असावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तुर व हरभरा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला (क्रॉपसॅप) प्रकल्‍पांतर्गत दि २३ व २४ जुन रोजी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व कृषि विद्यापीठातील जिल्‍हास्‍तरीय समन्‍वयक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री साहेबराव दिवेकर, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, पिकांमधील विविध कीड व रोगाच्‍या प्रादुर्भावाबाबत पुर्वानुमान काढुण त्‍याबाबत शेतक-यांपर्यंत योग्‍य वेळी उपाय योजनाबाबत सल्‍ला पोहचविल्‍यास पीकांचे होणारे मोठे नुकसान टाळता येऊ शकते. याबाबत क्रॉपसॅप प्रकल्‍प निश्चितच यशस्‍वी ठरला आहे.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि विभागाने विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाबाबताचे शेतक-यांचे अनुभव व तंत्रज्ञान अवलंबतांना येणा-या अडचणी विद्यापीठास वेळोवेळी कळवाव्‍यात जेणेकरून कृषि शास्‍त्रज्ञ त्‍यादृष्टिने संशोधन करतील. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले म्‍हणाले की, क्रॉपसॅप प्रकल्‍पातील किड व रोगाबाबत सल्‍लामुळे मोठया प्रमाणावर शेतक-यांचा फायदा झाला असुन देश व राज्‍य पातळीवरील अनेक पारितोषिके या प्रकल्‍पास प्राप्‍त झाले आहेत. गेल्‍या वर्षी मराठवाडयातील साधारणत: १४४ गावे ही किड व रोग जास्‍त संवेदनशील असल्‍याचे आढळुन आले असुन यावर्षी या गावांवर जास्‍त लक्ष देण्‍यात येणार आहे. यावेळी कृषि उपसंचालक श्रीमती आर जी शिंदे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी क्रॉपसॅप प्रकल्‍पाची माहिती देतांना सांगितले की, सोयाबीन पिकासाठी २९ सप्‍टेबर पर्यंत व कापुस पिकासाठी १३ नोब्‍हेंबर पर्यंत सल्‍ला देण्‍यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ द्यानंद मोरे यांनी तर आभार प्रदर्शन तालुका कृषि अधिकारी बी आर काकडे यांनी केले. याप्रकल्‍पातंर्गत मराठवाडयात साधारणत: बारा हजार हेक्‍टर साठी एक किड सर्व्‍हेक्षक कार्य करणार असुन एकुण २४४ किड सर्व्‍हेक्षक कार्यरत राहणार आहे. दर आठवड्या दोन वेळा शेतक-यांना विविध माध्‍यमाव्‍दारे सल्‍ला देण्‍यात येणार आहे. हा सल्‍ला मोबाईल एसएमएस व्‍दारे प्राप्‍त होण्‍यासाठी शेतक-यांनी कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्‍यात आले. दोन दिवस चालणा-या प्रशिक्षणात सोयाबीन, कापुस, तुर व हरभरा आदी पिकांचे लागवड तंत्रज्ञान, किड व रोग व्‍यवस्‍थापन, अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, तण व्‍यवस्‍थापन आदी विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी डॉ बी व्‍ही भेदे, डॉ ए जी बडगुजर, डॉ कुलधर, शिवलाड, अनिलराव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कृषि विभाग व विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण