तुर व हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव
वेळीच व्यवस्थापन करण्याचे वनामकृविचे आवाहन

सद्यस्थितीत तुर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून हरभरा पिक रोप अवस्थेत आहे. तसेच मागील 7-8 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे व तुरीवरील घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. ही स्थिती तुर व हरभऱ्यावरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीच्या वाढीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून येत आहे. अशातच या अळीने तुरीवरील कळया व फुले फस्त करण्यास सुरुवात केली आहे. कीडींचा प्रादुर्भाव कळया, फुले लागल्यापासून शेंगापर्यंत आढळून येतो, त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. हरभऱ्यावर देखील घाटेअळीचा प्रादुर्भाव पीकाच्या कोवळया पानावर आढळून येत आहे. सुरुवातीस लहान अळया कोवळी पाने, कळया व फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागताच अळया घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडतात व आपले डोके आत खूपसून दाणे खातात.सदरिल किडीचे व्यवस्थापन पुढील
प्रमाणे करावेहरभरा पिक एक महिण्याचे झाल्यावर पिकापेक्षा अधिक उंचीच्या आकाराचे प्रति हेक्टर 50 पक्षी थांबे लावावेत. पिकाच्या प्रति मिटर ओळीत 1 ते 2 अळया किंवा प्रति कामगंध सापळयात 8 ते 10 पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी समजून पुढील उपाय करावेत.- पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. 250 एल. ई. विषाणूची 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी आणि त्यामध्ये राणीपाल (नीळ) 100 ग्रॅम टाकावा.- जर कीडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही
20 मि.ली. किंवा क्विनालफॉस 20 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रॉल 18.5 एस सी 3 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर स्प्रेसाठी (पेट्रोल पंप) किटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे. किटकनाशकाचा वापर आलटून पालटून गरज पडल्यास 10 दिवसाच्या अंतराने करावा.अशा प्रकारे हरभऱ्यावरील घाटेअळी / हेलीकोव्हर्पा अळीचे व्यवस्थापन वेळीच करण्याचे आवाहन विस्तार शिक्षण
संचालक डॉ. बी. बी. भोसले व कृषि कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे.
