Tuesday, April 2, 2024

अन्नतंत्र महाविद्यालय परभणी येथे प्रेरणादायी अतिथी व्याख्यानाचे आयोजन

 हवामान बदलानुरूप अन्न तंत्रज्ञानातील विशेष कौशल्य मिळवावे... डॉ.उदय खोडके


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अन्न तंत्र महाविद्यालय परभणी येथे दर महिन्याला महाविद्यालयातील माजी विद्यार्थी यांना बोलावून अन्न तंत्रज्ञान विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर तथा आचार्य पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावरील अन्न तंत्र विषयामध्ये संशोधन व अद्यावत तंत्रज्ञान विषयी प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध करून उद्योगातील कृषी-प्रक्रिया संधी समजाविल्या जातात. या अनुषंगाने दिनांक १ एप्रिल रोजी प्रेरणादायी अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे येथील अल्कोहोल टेक्नॉलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. बी. बी. गुंजाळ यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. बी बी गुंजाळ यांना अल्कोहोल टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये जवळपास ४० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असुन त्यांनी वसंत दादा साखर कारखाना मांजरी पुणे येथे कार्यरत असताना विविध प्रकारचे मद्य निर्मिती उद्योग, वाईन टेक्नॉलॉजी, आणि अन्न तंत्रज्ञान विषया मध्ये मार्गदर्शक तथा कन्सल्टंट म्हणून कार्य केलेले आहे. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर बी क्षीरसागर, माजी प्राचार्य प्रा. पी एन सत्वधर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी विभाग प्रमुख डॉ.एस. एस. थोरात, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात बोलताना संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी जागतिक हवामान बदलाच्या अनुषंगाने अन्न तंत्रज्ञान विषयांमधील संधी आणि त्यासाठी आवश्यक विशेष कौशल्य मिळविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अन्न उत्पादन, संरक्षण, गुणवत्ता नियंत्रण आणि अन्न सुरक्षा या मुद्यावरती विशेष भर दिला,
याप्रसंगी डॉ. बी. बी. गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना अन्नतंत्रज्ञान विषयातील प्रक्रिया उद्योगासाठी उपलब्ध संधी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव सांगितले तसेच अन्न प्रक्रिया व मुल्यवर्धन, आयात, निर्यात आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी व विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीसाठी अंगीकारावायाचे गुण नमूद केले.
प्रास्तविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर बी क्षीरसागर यांनी महाविद्यालयातील चालू घडामोडी तसेच विद्यार्थी निगडित यशाबाबत  माहिती दिली. कार्यक्रमात डॉ. एस.एस. थोरात यांनी प्रश्न-उत्तर मालिकेचे नेतृत्व केले, यातून विद्यार्थ्यांना विषयाची सखोल प्राप्ती झाली. हा कार्यक्रम विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी अन्न तंत्रज्ञान आणि कृषी-प्रक्रिया क्षेत्रात भविष्यातील प्रयत्नांना प्रेरणा देणारा ठरला. शेवटी महाविद्यालयाच्या परंपरेप्रमाणे डॉ. बी बी गुंजाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण सहयोगी डॉ.प्रीती ठाकूर यांनी केले आणि आभार प्रदर्शन आचार्य पदवी विद्यार्थी संग्राम वांडेकर यांनी मानले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा. हेमंत देशपांडे, डॉ. कैलास गाडे, डॉ. व्हि.डी. सुर्वे, तसेचे विविध विभागाचे प्राध्यापक डॉ.भारत आगरकर, डॉ.अनुप्रिता जोशी, डॉ.सुरेंद्र सदावर्ते, डॉ. गिरीश माचेवाड, आणि पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीचे विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षण सहयोगी डॉ. एन एम देशमुख, डॉ.देसाई, डॉ.सय्यद जुबेर, डॉ. ए पी खापरे आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.