Friday, May 3, 2019

वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांची मौजे मांडाखळी येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्राला भेट व मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी इंगोले, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी आर देशमुख, श्री पी एस चव्हाण आदींनी दिनांक 01 मे रोजी मौजे मांडाखळी (ता जि परभणी) येथे शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतीनिष्ठ शेतकरी श्री. रमेश राऊत, शेख मोबीन, श्री. शिळवणे, अ. नय्युम व श्री. पंडीत थोरात (खानापुर) आदींची उपस्थिती होती.
दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यात मौजे मांडाखळी येथील शेतकरी शेख मोबीन यांनी टरबुजाचे व श्री मुंजाजी शिळवणे यांनी ऊसामध्ये खरबुजाचे आंतरपीक घेवून विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल डॉ. इंगोले साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजीपाला उत्पादक शेतकरी श्री. रमेश राऊत यांच्‍या शेततळेमुळे एक हजार संत्रा व सीताफळाची झाडे जगवत असल्याचे सांगितले. श्री. राऊत यांनी एवढ्या कमी पाण्यातही संत्रा बागेत त्याच पाण्यावर कारली, दोडके, गवार, मिरची, कोथिंबीर आदी पिकांचे आंतरपीक घेऊन निव्‍वळ नफा वाढवता येतो याचे उत्‍तर उदाहरण सादर केले.
मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले म्हणाले की, शेतक-यांनी उन्हाळी पिके व फळबागा वाचविण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा, जेणे करून जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल जमीन थंड राहील. विद्यापीठ आपल्या पाठीशी असुन तांत्रिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. आळसे मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, मांडाखळी व परिसरात संत्रा पिकाची लागवड वाढत आहे, परंतु या परिसरातील ज्‍या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, त्‍या जमिनीतील संत्रा बागा जास्त काळ टिकणार नाही, मातीपरीक्षण करून चुनखडीचे प्रमाण 12 टक्के पेक्षा कमी असेल तरच लागवड करावी, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. सेंद्रिय शेतीकडे असलेला शेतकऱ्यांचा कल पाहता सेंद्रिय निष्ठा घरच्या घरी उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे सेंद्रिय खते बाजारातून विकत घेणे परवडत नाही त्यासाठी पशुधन जोपासणे गरजेचे असल्याचे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले. श्री. चव्हाण म्हणाले की शेतीला फळबागेची जोड असणे आवश्यक असल्‍याचे सांगितले. परिसरातील विविध शेतक-यांच्‍या शेतीस मान्‍यवरांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.