Monday, December 21, 2020

वनामकृवित रक्‍तदान शिबिर संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने  राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक 21 डिसेंबर रोजी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर शासकीय रक्‍तपेढीचे प्रमुख डॉ उदय देशमुख, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जयश्री झेंडे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, डॉ जगदीश जहागिरदार, डॉ कल्‍याण आपेट आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरास कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी प्रत्‍यक्ष भेट देऊन रक्‍तदात्‍यांना प्रोत्‍साहीत केले.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, रक्‍तदान हे सर्वश्रेष्‍ठ दान असुन एक रक्‍तदाता तीन व्‍यक्‍तीचे प्राण वाचु शकतो. सद्यस्थिती राज्‍यात रक्‍ताचा तुडवटा जाणवत आहे, परिस्थितीत राज्‍यभर रक्‍तदान शिबीरांचे आयोजन करण्‍यात येत आहे, परंतु विविध संस्‍थांनी एकाच वेळी रक्‍तदान शिबिर न ठेवता, टप्‍प्‍याटप्‍पानी विद्यापीठानेही रक्‍तदान शिबिर घेतल्‍यास नियमित रक्‍त पुरवठा होईल. सामाजिक बांधिलकी म्‍हणुन ज्‍यांना शक्‍य असेल त्‍यांनी रक्‍तदान करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

डॉ उदय देशमुख म्‍हणाले की, रक्‍त देण्‍याची गरज नियमितपणे थॅलेसेमिया, गरोदर महिला, अनेमिया, अपघातात जखमी आदी रग्‍नांना जास्‍त असते. त्‍यामुळे वर्षभर नियमित रक्‍ताची गरज पाहता, वारंवार व नियोजनबध्‍दपणे रक्‍तदान शिबिर आयोजित करणे आवश्‍यक आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा संजय पवार यांनी केले तर आभार डॉ महेश देशमुख यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील 75 पेक्षा जास्‍त अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी रक्‍तदान केले.