Tuesday, April 14, 2020

वनामकृविच्‍या ऑनलाईन संवादास शेतक-यांचा वाढता प्रतिसाद


सद्याच्‍या कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर देशात व राज्‍यात लॉकडाऊन असल्‍यामुळे शेतकरी बांधवाशी संवाद साधण्‍याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ ऑनलाईन साधनाचा उपयोग करित आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक 13 एप्रिल रोजी फळबाग व्‍यवस्‍थापन या विषयावर झुम क्‍लाऊड मिटिंग संपन्‍न झाली. संवाद मध्‍ये औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ एम बी पाटील यांनी मोंसबी, आंबा या पिकावर मार्गदर्शन करतांना रोपांची निवड ते विक्री व्‍यवस्‍थापनाबाबत माहिती दिली तर डॉ बी एम कलालबंडी यांनी फळबागेतील पाणी, खत व्‍यवस्‍थापन यावर माहिती दिली. फळपिकांतील किंडीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी प्रा डी डी पटाईत यांनी मार्गदर्शन केले तसेच कापुस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ ए एस जाधव यांनीही येणा-या हंगामात कापुस पिकांच्‍या पेरणीबाबत मार्गदर्शन केले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्‍तरे दिली. मिटींगचे प्रास्‍ताविक यु एन आळसे यांनी केले. मिटिंग नियोजन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख व माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ यु एन आळसे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ एस जी पुरी यांनी केले. संवादामध्‍ये विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ प्रा व्ही बी ढाकणे, डॉ कच्‍छवे, प्रा दीप्ती पाटगांवकर, उपविभागीय कृषि अधिकारी श्री बी एस कच्‍छवे, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी श्री माणिक रासवे, श्री पंकज क्षीरसागर यांच्‍यासह परभणी, हिंगोली, लातुर, उस्‍मानाबाद, यवतमाळ आदी जिल्‍हयातुन 40 हुन अधिक शेतकरी सहभागी झाले होते.