Thursday, June 4, 2020

कृषि हवामानशास्‍त्रातील अद्यायवत तंत्रावर ऑनलाईन राष्‍ट्रीय कार्यशाळा संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत सीडीकेएस विभागाच्‍या वतीने कृषि हवामानशास्‍त्रातील अद्यायवत तंत्र यावर ऑनलाईन राष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २६ मे ते २ जुन दरम्‍यान करण्‍यात आले होते. दिनांक २ जुन रोजी सदरिल प्रशिक्षण वर्गाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ  अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय मौसम विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. के. के. सिंग, हैदराबाद येथील क्रीडातील अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्राचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस के. बल, अहमदाबाद येथील सॅक इसरोचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. विमलकुमार भट्टाचार्य, वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉअशोक ढवण  म्‍हणाले की, हवामान विभागाच्‍या हवामान अचुक अंदाजामुळे वातावरणातील येणा-या संकटाची अचुक माहिती देण्‍यात येत आहे. सद्या  विशेषत: पावसात पडणारे खंड, अवकाळी पाऊस व गारपीट अशा घटनांची तीव्रता वाढत आहे. या संकटाचा पुर्व सुचनामुळे अगोदरपासून सतर्कता साधता येत असुन होणारे संभव्‍य नुकसान कमी करण्‍यासाठीं मदत होत आहे. सध्या हवामान बदल विषयक हवामानाचा देण्यात येणारा अंदाजाचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. अंदाजात अधिक अचुकता आणण्‍यासाठी हवामानशास्‍त्रातील अद्यायवत तंत्राचा अवलंब करण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कार्यशाळेच्‍या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्‍हणून आनंद कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अे. एम. शेख यांची उपस्थिती होती. माजी कुलगुरू मा डॉ. अे. एम. शेख आपल्‍या भाषणात आजच्‍या बदलत्‍या हवामानात सुक्ष्‍म वातावरणाचे अवलोकन करण्‍यासाठी या अदयावत साधनांची नितांत आवश्‍यक असल्‍याचे सांगुन बदलत्‍या हवामानावर आंतर शाखीय विषय तज्ञांना सोबत घेऊन अभ्‍यास करावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिली.

कार्यशाळेत डॉ. के. के. सिंग, डॉ. विमलकुमार भट्टाचार्य, डॉ. एस के. बल, केरल  कृषि विद्यापीठाचे कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. बी अजित कुमार, मुंबई येथील गणेश टेक्नॉलॉजीचे संचालक श्यामल पाल, हरियाणा येथील एमटेक सोल्युशनचे प्रमुख अजित प्रसाद आदींनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यशाळेत सहभागी निवडक प्रशिक्षणार्थीनी आपले मनोगत व्यक्त केली.

कार्यशाळेत भारतीय अवकाश संशोधन संस्‍था, भारतीय हवामानशास्‍त्र विभाग, प्रादेशिक हवामपनशास्‍त्र विभाग, मुंबई, कृषि विद्यापीठ आदी संस्‍थेतील शास्‍त्रज्ञांनी कृषि हवामानशास्‍त्रावरील विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजक कृषी हवामान तज्ञ डॉ. के. के डाखोरे यांनी कार्यशाळेचा आढावा सादर केला. प्रास्‍ताविक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु एम खोडके यांनी केले.  डॉ. गोपाल यु. शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विना भालेराव यांनी केले तर आभार सचिन कराड यांनी मानले. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी डॉ. एस. डी. कदम, श्री. सचिन कराड, डॉ. स्‍वाती मुंडे, डॉ. अनिकेत वाईकर, श्रीमती अपूर्वा देशमुख आदींचे तांत्रिक सहकार्य लाभले.